computer

सुखवस्तू जोडपं पोहे उपमा का विकत आहे ? कारण वाचून कौतुक कराल !!

मुंबईच्या एका जोडप्याचं त्यांच्या चांगुलपणासाठी कौतुक होतं आहे. ते करत असलेलं काम बघून तुम्ही पण नक्कीच कौतुक कराल. चला तर त्यांची गोष्ट वाचूया.

दिपाली भाटीया नावाच्या महिलेने फेसबुकवर या जोडप्याची गोष्ट सांगितली आहे. कांदिवली स्टेशनच्या बाहेर हे दोघेही पोहे, उपमा, पराठा, इडली विकतात. बुधवारच्या सकाळी काही खाण्यासाठी दिपाली बाहेर पडली तेव्हा तिला स्टेशनच्या बाहेर हा स्टॉल दिसला.

स्टॉलवर जे दोघे काम करत होते त्यांच्या चेहऱ्यावरून ते पोहे, उपमा विकणारे वाटत नव्हते. दिपालीने चौकशी केल्यावर त्या जोडप्याने खरी गोष्ट सांगितली. “आमच्या स्वयंपाकीणबाईंनी बनवलेले पदार्थ आम्ही विकण्याचं काम करतो” असं त्यांनी उत्तर दिलं

त्यांचं नाव आहे अश्विनी आणि अंकुश शहा. दोघेही एका खाजगी कंपनीत काम करतात. त्यांच्या स्वयंपाकीणबाई आता ५५ वर्षांच्या आहेत आणि त्यांच्या पतींना अर्धांगवायूचा झटका आलेला आहे. त्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून अश्विनी आणि अंकुशने आपलं काम सांभाळून स्टॉलची जबाबदारी उचलली. रोज सकाळी ४ ते १० वाजेपर्यंत स्टॉल चालवायचा आणि त्यानंतर नोकरीवर जायचं असा त्यांचा दिनक्रम आहे.

मंडळी, आजच्या धावत्या जगात परक्यांसाठी वेळात वेळ काढून मदतीचा हात देणं खरंच कौतुकास्पद आहे. हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत.