‘कुछ तो गडबड है दया !!!’ वाचा मँगलोरच्या ‘गडबड आईस्क्रीम’ बद्दल !!

कर्नाटकच्या मंगलोर भागाची ओळख काय असं जर तुम्ही विचारलंत, तर एका आईस्क्रीमचं नाव नक्की कानावर पडेल - गडबड आईस्क्रीम. आता तुम्ही म्हणाल हा काय प्रकार आहे ब्वा? असं कुठे नाव असतं का? राव, आपल्याकडे पण ‘अळूचं फदफदं’ नावाची प्रख्यात डिश आहेच की. असो....

स्रोत

तर, आईस्क्रीमच्या नावात जरी गडबड असली तरी स्वादाच्या बाबतीत कोणतीच गडबड नाही. ही एक साधारण आईस्क्रीम डिश आहे, पण सोबत एक ट्विस्ट असल्याने त्याचं नाव गडबड पडलं. तो ट्विस्ट काय आहे ते समजून घेऊया गडबड आईस्क्रीमच्या जन्म कथेसोबत. 

तर, त्याचं काय आहे या आईस्क्रीमचं नाव पडलं कन्नड शब्द ‘गडीबिडी’ वरून. या शब्दाचा अर्थ होतो ‘गोंधळ’!! आता येऊन जाऊन अर्थ एकच राव. नावाप्रमाणेच ही आईस्क्रीम गोंधळातून तयार झाली. याबद्दल २ कथा प्रसिद्ध आहेत.

पहिली कथा-

स्रोत

इथं कथा दोन असल्यातरी गडबड आईस्क्रीम उडुपीच्या डायना रेस्टॉरंटमध्येच जन्माला आली यात दुमत नाही. तर एके दिवशी काय झालं, डायना रेस्टॉरंटमध्ये एक ग्राहक आला. त्याने आईस्क्रीम मागवलं, पण ते आईस्क्रीम त्याला काही आवडलं नाही बुवा. मग त्याने वेटरला बोलावून दोन खडे बोल सुनावले. वेटर निमूटपणे गेला आणि घडलेला प्रकार शेफला पुढे कथन केला. शेफनं एक शक्कल लढवली. त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या उरलेल्या आईस्क्रीम्स एकत्र करून त्यांचीची खिचडी तयार केली. वरून ड्रायफ्रूट, जेली, सॉस इत्यादी गोष्टी ओतल्या. वेळ मारून नेण्यासाठी या डिशचा जन्म झाला. पण काय आश्चर्य, त्या ग्राहकाला हा नवीन प्रकार भलताच आवडला. पुढे रेस्टॉरंटने आपल्या पदार्थांच्या यादीत ‘गडबड आईस्क्रीम’ या नवीन पदार्थाचा समावेश करून घेतला.

दुसरी कथा

स्रोत

पहिल्या  कथेप्रमाणे इथंही डायाना रेस्टॉरंटचे संस्थापक मोहनदास पै हे ‘गडबड’चे खरे जनक आहेत. एकदा त्यांच्या मित्रांचा एक ग्रुप रेस्टॉरंटमध्ये आला. त्यांनी आईस्क्रीमची ऑर्डर दिली. पण आईस्क्रमसाठी लागणारे काही फ्लेव्हर्स संपले होते. मग मोहनदास पै यांनी तिथे उपलब्ध असलेले सगळे फ्लेव्हर्स एकत्र करायला सांगितलं. अशा प्रकारे ‘गडबड आईस्क्रीम’ तयार झाली. काही दिवसांनी मित्रांचा तोच ग्रुप पुन्हा आला आणि त्यांनी त्याच आईस्क्रीमची मागणी केली. यानंतर गडबड आईसक्रीमला रेस्टॉरंट मध्ये कायमचं स्थान मिळालं.

मंडळी, तुम्ही जर उडुपी किंवा मँगलोर भागात गेलात तर गडबड आईस्क्रीम चाखायला विसरू नका बरं. सेल्फी तेवढा आम्हाला पाठवून द्या !!

 

आणखी वाचा :

जगातली १० सर्वात महागडी आईस्क्रीम्स

आईस्क्रीम संपले म्हणून लग्न मोडलं

सबस्क्राईब करा

* indicates required