computer

परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग ११: जखमी अवस्थेतही उपचार न घेता ६० रणगाडे उध्वस्त करणारा वीर 'लेफ्टनंट कर्नल अर्देशिर तारापोर'

परमवीर चक्राचे पराक्रमी या लेखमालेच्या आजच्या भागात १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धात देशासाठी बलिदान देणारे लेफ्टनंट कर्नल अर्देशिर तारापोर यांच्या शौर्याची कथा सांगणार आहोत. 

तारापोर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९२३ रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांनी आपल्या सैन्य जीवनाची सुरुवात १९४२ साली हैदराबाद सेने ७ व्या इंफंट्रीपासून केली होती. १९६५ साली भारत पाकिस्तान युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी तारापोर यांची पदोन्नती लेफ्टनंट कर्नल म्हणून झाली होती. पाकिस्तान या युद्धात मोठ्या तयारीने उतरला होता. शत्रूने २ लाख ६० हजारची इंफंट्री, २८० विमाने आणि ७५६ रणगाडे युद्धात उतरविले होते. इकडे भारत देखील पूर्ण तयारीत होता. तारापोर यांना या युद्धात भारतीय सैन्याचे कमांडिंग ऑफिसर म्हणून पाठवण्यात आले होते. 

सैन्याने ११ सप्टेंबर १९६५ ला लेफ्टनंट कर्नल तारापोर यांच्या नेतृत्वाखाली तुकडीला फिलोरा भागावर ताबा मिळवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आपल्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठी तारापोर यांनी आपल्या रणगाड्यांसोबत फिलोराच्या दिशेने मार्गक्रमण केले. लवकरच सियालकोट सेक्टरमधील फिलोरा त्या युद्धातील सर्वात मोठ्या रणगाड्यांच्या युध्दाचा साक्षीदार बनणार होता. आपले मजबूत साहस घेऊन पुढे सरकणाऱ्या भारतीय सैन्यावर दबा धरून बसलेल्या शत्रूने अचानक हल्ला केला.

तारापोर यांनी अचानक झालेल्या हल्ल्याला मोठ्या शौर्याने परतवून लावले. त्यांनी यावेळी दाखवलेले युद्धकौशल्य अफाट होते. शत्रूचा हा हल्ला अयशस्वी झाला होता. शत्रूला पाणी पाजल्यावर तारापोर आपल्या सहकाऱ्यांसोबत फिलोराच्या दिशेने पुढे सरकले. तारापोर आणि त्यांच्या तुकडीला रोखण्यासाठी शत्रुसैन्य सतत रणगाड्यांमधून बॉम्बवर्षाव करत होते.

शत्रूने केलेल्या या बॉम्बहल्ल्यात तारापोर प्रचंड जखमी झाले. त्यांना उपचारासाठी परत बोलविण्यात आले, पण त्यांनी परत जाण्यास नकार दिला. तारापोर एकेक पाऊल पुढे सरकत होते. शत्रूने पूर्ण ताकत लावून देखील १६ सप्टेंबर १९६५ रोजी तारापोर यांनी जसोरन आणि बटूर डोग्रांडी भागावर ताबा मिळवला. तारापोर यांनी फक्त एक भाग जिंकला असे नव्हे, तर सातत्याने शत्रूने हल्ला करून देखील ते आपल्या सैन्यासाठी रस्ता तयार करत निशाण्यावर जाऊन पोहोचले. या काळात त्यांनी शत्रूचे एक दोन नाहीतर तब्बल ६० टॅन्कस उध्वस्त केले.

देशाचा हा एवढा पराक्रमी सुपुत्र ज्याने शत्रूला गुडघ्यावर आणले आणि शत्रूने प्रचंड प्रयत्न करून देखील धारातीर्थी न पडलेला हा योद्धा रणगाड्याला लागलेला आगीत मात्र शहीद झाला. पण त्यांनी दाखवलेल्या असामान्य शौर्याने देशाच्या विजयाचा पाया रचला गेला होता. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र देऊन गौरविण्यात आले होते.

सबस्क्राईब करा

* indicates required