computer

परमवीरचक्राचे पराक्रमी - भाग ८: कारगिल युद्धात मोलाची भूमिका असणारे कॅप्टन विक्रम बात्रा!!

कारगिल युद्धात मोलाची कामगिरी बजावून अतिशय कठीण परिस्थितीत देशाला विजय मिळवून देणाऱ्या सैनिकांचा देशातील नागरिकांना नेहमी अभिमान वाटत आला आहे. याच सैनिकांपैकी एक कॅप्टन विक्रम बात्रा यांच्या शौर्याची गाथा आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. 

कॅप्टन बात्रा यांचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे झाला होता. त्यांच्या सैन्य जीवनाची सुरुवात ६ डिसेंबर १९९७ रोजी भारतीय सेनेच्या १३ जम्मू काश्मीर रायफल्स मधून केली होती. त्याच काळात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांचा वेष धारण करून आलेल्या पाकिस्तानी सैन्यामध्ये संघर्ष सुरू होता.

कॅप्टन बात्रा यांची कमांडो ट्रेनिंग संपून त्यांची नेमणूक कारगिल युद्ध क्षेत्रात करण्यात आली होती. १ जून १९९९ रोजी कॅप्टन विक्रम बात्रा यांनी आपल्या युनिट सोबत शत्रूसैन्याविरुद्ध मोर्चा सांभाळला होता. सुरुवातीला बात्रा यांनी हम्प आणि रॉक नॉबच्या शिखरावर ताबा मिळवत शत्रू सैन्याला नामोहरम केले होते. 

हा पराक्रम करेपर्यंत विक्रम बात्रा लेफ्टनंट होते, पण त्यांची कामगिरी बघून त्यांना कॅप्टन करण्यात आले व त्यांची नियुक्ती श्रीनगर लेह नजिक ५१४० पॉईंटला मुक्त करून त्याठिकाणी तिरंगा फडकविण्याची जबाबदारी देण्यात आली. कॅप्टन बात्रा यांनी दुर्दम्य साहस आणि शौर्य दाखवत २० जून १९९९ च्या पहाटे ५१४० पॉईंट शत्रूपासून मुक्त केले. 

कॅप्टन बात्रा यांना आता दुसरे लक्ष देण्यात आले ते म्हणजे ४८७५ पॉईंटवर ताबा मिळवणे. बात्रा यांना वरिष्ठांकडून आलेल्या संदेशात लिहिले होते, 'ये दिल मांगे मोर!' कॅप्टन बात्रा आता आपल्या सहकाऱ्यांना घेऊन नव्या मोहिमेवर निघाले. 

आता युद्ध ऐन भरात आले होते, समोरासमोर तुफान गोळीबार सुरू होता. या दरम्यान एक गोळी बात्रा यांचे सहकारी नविन यांच्या पायाला लागली. शत्रूंनी ही संधी साधत नविन यांना मारण्यासाठी अजून जास्त गोळीबार सूरु केला. पण तेवढ्यात कॅप्टन बात्रा त्यांना ओढून दुसऱ्या बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू लागले. हे प्रयत्न करत असताना एक गोळी येऊन थेट त्यांच्या छातीत घुसली. त्यांनी 'जय माता दी' चा उद्घोष केला. 

भारत मातेचा हा वीर सुपुत्र धारातीर्थी पडला होता. कॅप्टन बात्रा यांच्या या साहस आणि शौर्यासाठी त्याना परमवीर चक्र प्रदान करण्यात आले. कॅप्टन बात्रा यांच्या आयुष्यवर आधारित एलओसी- कारगिल हा सिनेमा 2003 साली आला होता. यात अभिषेक बच्चनने बात्रा यांची भूमिका साकारली होती. 

आता बात्रा यांच्या आयुष्यावर आधारित अजून एक चित्रपट शेरशाह या नावाने तयार होत आहे. शेरशाह हे कॅप्टन बात्रा यांचे युध्दावेळी कोडनेम होते. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा बात्रा यांची भूमिका साकारणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required