computer

फोटो स्टोरी : हिटलरला मूकपणे विरोध करणाऱ्या या तरुणाची कथा सांगते प्रत्यक्ष युद्धापलिकडचंही भयावह वास्तव!!

आजपर्यंत वेगवेगळ्या माध्यमांत हा फोटो तुम्ही पाहिला असेल. हजारो लोक हिटलरला त्याच्या प्रसिद्ध 'हिटलर सॅल्यूट' मधून मानवंदना देत असताना हा पठ्ठ्या हाताची घडी घालून शांतपणे त्याचा निषेध करत होता. हा फोटो बंडखोरी आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची वृत्तीचं प्रतीक मानला जातो. फोटो बघून तुम्हाला प्रश्न पडला असेलच की हा माणूस कोण होता, सगळे हिटलरच्या बाजूने असताना हा त्याच्या विरुद्ध का होता आणि त्याचं पुढे काय झालं?

आजच्या फोटोस्टोरीच्या भागात आपण या माणसाला भेटणार आहोत. त्याची पूर्ण कथा वाचून तुम्हाला त्याच्याबद्दल आत्मीयता तर वाटेलच, पण त्याची कथा मनाला चटका लावून जाईल.

या तरुणाचं नाव होतं ‘ऑगस्ट लॅन्डमेसर’. ज्या फोटोबद्दल आपण बोलत आहोत, तो १९३६ सालचा आहे. या फोटोमागच्या कथेची सुरुवात १९३१ सालापासून होते. ऑगस्टने १९३१ साली वयाच्या २० व्या वर्षी नोकरीच्या आशेने नाझी पक्षात प्रवेश केला होता. पक्षात प्रवेश मिळवल्यानंतर लगेचच त्याला ऑशविट्झ येथील ज्यूंच्या हत्येसाठी स्थापन केलेल्या छळछावणीत नोकरी मिळाली.

(ऑगस्ट लॅन्डमेसर)

पुढे १९३४ साली ऑगस्ट ‘एरमा एकलर’ या ज्यू मुलीच्या प्रेमात पडला आणि इथेच त्याच्या आयुष्याला नवीन वळण मिळालं. हिटलर आणि नाझी पक्षाचा ज्यू द्वेष तर जगप्रसिद्ध आहेच. आधी त्यांना दुय्यम नागरिकाचा दर्जा देण्यात आला आणि नंतर सरळ त्यांच्या नृशंस हत्याकांडाला सुरुवात झाली. अशा परिस्थितीत एका जर्मन मुलाने ज्यू मुलीशी लग्न करण्याची कल्पना कशी खपवून घेतली जाईल? १९३५ सालच्या सप्टेंबर महिन्यात जर्मन-ज्यू विवाहास कायदेशीर बंदी आणली गेली. ऑगस्ट आणि एरमाच्या लग्नाला नामंजूरी देण्यात आली. दोघांनी कायदा न जुमानता एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

(एरमा एकलर)

ऑगस्ट आणि एरमा एकलर यांच्या नात्याबद्दल नाझी पक्षाला समजल्यानंतर ऑगस्टची लगेचच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात एरमा एकलरच्या पोटी मुलीचा जन्म झाला.

फोटो मागची गोष्ट

१९३६ साली जर्मनीच्या हॅम्बर्ग बंदरात The Horst Wessel नावाच्या नव्या जहाजाचं अनावरण करण्यात आलं होतं. यावेळी तिथे हिटलर स्वतः हजर होता. जहाजाचं अनावरण झाल्यानंतर तिथे जमलेल्या लोकांनी मानवंदना देण्यासाठी 'हिटलर सॅल्यूट' दिला. नाझी जर्मनीत हिटलर सॅल्यूट करण्याचे कायदेशीर नियम होते. उजवा हात पुढे करून "Heil Hitler!" असा जयघोष केला जायचा. जर्मन भाषेत ह्याला "sieg heil" म्हणत. हिटलरविषयी आदर दाखवण्यासाठी हिटलर सॅल्यूट देणं बंधनकारक होतं. नियम मोडल्यास त्या व्यक्तीला तुरुंगवास व्हायचा.

तर, सगळे हिटलरला मानवंदना देत असताना ऑगस्ट मात्र हाताची घडी घालून उभा होता. पुढच्या काळात जेव्हा ही घटना एक दंतकथा बनली तेव्हा त्याच्याबद्दल माहिती देताना असं म्हटलं जाऊ लागलं की, त्याने हिटलर सॅल्यूट केला नाही म्हणून त्याला जीवे मारण्यात आलं. पण हे खरं नाही. त्याचा अंत एवढ्या सहजासहजी झाला नाही, हे त्याचं आणि त्याच्या पत्नीचं दुर्दैव होतं.

१९३७ साली एरमा एकलरच्या पोटात दुसरं मूल असताना या दोघांनी डेन्मार्कमार्गे पळून जाण्याचा प्रयत्न केला. सीमेवरच दोघांनाही पकडण्यात आलं. ऑगस्टवर त्याकाळच्या कायद्यानुसार Rassenschande हा आरोप लावण्यात आला. Rassenschande म्हणजे जर्मन वंशाचा अनादर किंवा बदनामी करणे.

कायदा एरमाला ज्यू समजत असला तरी तिच्यात जर्मन आणि ज्यू दोन्ही वंशांच रक्त होतं. या गोंधळामुळे तिचा जीव काहीकाळ वाचला. ऑगस्टला एका वर्षातच निर्दोष म्हणून मुक्त करण्यात आलं, पण एरमाला कायमचं सोडण्याची त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली. याला ऑगस्टने नकार दिला आणि एरमाकडे परतला. हे समजल्यानंतर १९३८ साली त्याला पुन्हा अटक झाली.

यावेळी एरमालाही अटक झाली. तोपर्यंत तिने दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता. दोन्ही मुलांना ते अनाथाश्रमात सोपवणार होते. पण मोठी मुलगी इंग्रीडचा जन्म जर्मन-ज्यू विवाह बंदी कायद्याच्या अगोदर झाल्याने तिला आजीआजोबांकडे सोपवण्यात आलं आणि दुसरी मुलगी आयरेनला अनाथाश्रमात नेण्यात आलं

ऑगस्ट तुरुंगात गेला. तिथे त्याला मजुरी करावी लागली. एरमाची एका छळछावणीतून दुसऱ्या छळछावणीत फरपट होत राहिली. पुढे जेव्हा १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं तेव्हा एरमाचा गॅस चेंबरमध्ये मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूचं नेमकं वर्षही कुणाला माहित नाही. तिने आपल्या आईला पाठवलेलं शेवटचं पत्र १९४२ सालचं आहे.

१९४१ साली ऑगस्टला मुक्त करण्यात आलं. तो जर्मनीच्या वाह्न्मुंड येथे नोकरी करू लागला. त्या दरम्यान तो सोन्या पास्टचेन्को नावाच्या रशियन मुलीच्या संपर्कात आला. त्याने आपल्या मुलींना शोधण्यात यश मिळवलं. ऑगस्टने दोन्ही मुलींची सोन्याशी ओळख करून दिली, पण त्यांना कधीच एकत्र येता आलं नाही. १९४४ साली ऑगस्टला युद्धावर पाठवण्यात आलं. तिथे तो बेपत्ता झाला आणि युद्ध संपल्यानंतर १९४९ साली त्याला अधिकृतपणे मृत घोषित करण्यात आलं.

मोठी मुलगी इंग्रीडला मिळालेली मृत्यूची बातमी धाकट्या आयरेनपर्यंत पोचायला वेळ लागला. तिला ती बातमी १९९४ साली समजली. तोपर्यंत तिला आशा होती की आपला बाबा जिवंत आहे आणि तो परत येईल. आयरेनने १९९८ साली आपली हकिकत सांगणारं A Family Torn Apart by "Rassenschande," हे पुस्तक लिहिलं.

युद्धाच्या इतिहासात कोणीतरी जिंकतं आणि कोणाचा तरी पराभव होतो, पण सामान्य लोक नेहमीच पराभूत होत आले आहेत. ऑगस्ट, एरमा आणि त्यांच्या दोन मुलींची झालेली फरफट हेच दाखवून देतं.

सबस्क्राईब करा

* indicates required