computer

फोटो स्टोरी : बाइक्सना रथ जोडून तयार केलेल्या 'मोटार चॅरीयट'चा थरारक इतिहास !!

रोमन सैनिकासारखा वेश, हातात घोड्याचा लगाम, पण घोड्याच्या जागी बाईक्स आणि थोडं लक्ष देऊन बघितलं तर समजेल की, जो रथ दिसतोय तो रथ नसून चक्क दारू साठवण्याचं पिंप आहे. हा काय प्रकार आहे?

आजच्या फोटोस्टोरीचा हाच तर विषय आहे.

फोटो दिसणाऱ्या या गाडीला इंग्रजीत Motorcycle Chariot म्हणतात. मराठीत काय म्हणायचं? आम्ही त्याला ‘मोटार रथ’ नाव देतोय. हा मोटाररथ १०० वर्षांपूर्वी चांगलाच प्रसिद्ध होता. १९२० साली सुरुवात होऊन १९३० सालापर्यंत मोटाररथाने जगाला वेड लावलं होतं. मग हा मोटाररथ कुठे गेले? त्यांची सुरुवात कशी झाली होती? चला तर आजच्या फोटो स्टोरीमध्ये या मोटार रथाची पूर्ण कथा वाचूया.

Motorcycle Chariot उर्फ मोटार रथ जवळजवळ १०० वर्षापूर्वी १९२० ते १९३० सालाच्या दरम्यान जगभर प्रसिद्ध होते. त्यांचा वापर मुख्यत्वे स्पर्धेसाठी व्हायचा. Motorcycle Chariot Racing नावाचा रेसिंगचा वेगळा प्रकारच त्याकाळी अस्तित्वात होता. आजच्या मोटार रेसिंग स्पर्धेचा हा सर्वात जुना प्रकार होता असं म्हटलं तरी हरकत नाही.

याची सुरुवात खरं तर प्राचीन रोमन साम्राज्यात आहे. रोमन साम्राज्यात रथांच्या शर्यती व्हायच्या. बलदंड घोडे जुंपलेले रथ आणि तेवढ्याच बलदंड सारथ्यांची ही स्पर्धा असायची. या स्पर्धेत जीवाला धोका तर असायचाच, पण याच कारणाने स्पर्धकांमध्ये चढाओढ असायची आणि प्रेक्षकही तुफान गर्दी करायचे. आधुनिक काळात जेव्हा मोटार बाइक्स आल्या तेव्हा घोड्यांची जागा या बाइक्सनी घेतली.

दारूचं पिंप कापून रथ तयार केला जायचा. रथाला जोडलेली चाकं समोरच्या दोन बाइक्सना जोडलेले असायचे. रोमन काळाची आठवण म्हणून सारथी रोमन योद्ध्यांच्या वेशात असायचा. सुरुवातीच्या काळात एकच बाईक असायची आणि रथात एक माणूस, तर बाईक चालवण्यासाठी दुसरा असे दोनजण स्पर्धेत असायचे. पुढच्या काळात एकापेक्षा जास्त बाइक्स आल्या आणि रथाचा लगाम पूर्णपणे सारथ्याच्या हातात आला. यासाठी बाईकमध्ये बदल करण्यात आले.

आपण आज ज्या फोटोबद्दल बोलत आहोत त्यात दोन बाइक्स दिसत आहेत आणि त्यांच्या नियंत्रणासाठी सारथ्याच्या हातात लगाम दिसत आहेत. हा आधुनिक लगाम दोन्ही बाइक्सच्या हँडलबारना जोडलेला दांडा असायचा. या दांड्याच्या आधारे दोन्ही बाइक्स नियंत्रित करता यायच्या. ही व्यवस्था तयार होण्यापूर्वी चामड्याचे लगाम वापरून बाईक नियंत्रित केली जायची.

काही महाबलींनी हिम्मत दाखवून ४ बाइक्स जुंपलेले रथही चालवले. हा फोटो पाहा.

अमेरिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीयन देशांमध्ये Motorcycle Chariot Racing स्पर्धा प्रसिद्ध होत्या. प्राचीन घोड्यांच्या रथात जसा जीवाला धोका होता तसाच याही स्पर्धेत होता. पण लोकांचं भरपूर मनोरंजन व्हायचं. खास करून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड देशांत या स्पर्धांना प्रचंड मोठा प्रेक्षकवर्ग होता.

या स्पर्धा बंद का पाडल्या?

या प्रश्नाला उत्तर नाही. १९३० सालापर्यंत मोटार रथांची स्पर्धा संपुष्टात आली. पण आजही काही लोकांनी मोटार रथ आणि त्यांच्या आठवणी जिवंत ठेवल्या आहेत. आज स्पर्धा होत नसल्या तरी मोटार रथ पूर्णपणे संपुष्टात आलेले नाहीत. उदाहरणासाठी हा व्हिडीओ पाहा.

काही प्रथा आणि परंपरा मजेशीर असतात, त्यामागची कारणं आणि कथाही तितक्याच रंजक असतात हे ही तितकंच खरं!!

सबस्क्राईब करा

* indicates required