computer

फोटो स्टोरी : रस्त्यावर इजिप्शियन ममी विकणारा हा माणूस इजिप्तच्या इतिहासाच्या नष्ट होण्याचा इतिहास सांगतोय !!

रस्त्याच्या कडेला चणे फुटाणे विकतात तसं एक माणूस इजिप्शियन ममी विकत बसला आहे. हे चित्र विचित्र वाटतं ना? पण आम्ही जर तुम्हाला सांगितलं की हा माणूस तर फक्त विकतोय, काही लोकांनी इजिप्शियन ममी औषध म्हणून विकल्या तर काहींनी कोळशाच्या जागी ममी जाळून रेल्वे चालवल्या.

थांबा, हा काय प्रकार होता? चला तर हा प्रश्न घेऊनच आजच्या फोटोस्टोरीची सुरुवात करू. आजचा विषय आहे “इजिप्शियन ममी विकणे आहे.’

गोष्टीची सुरुवात होते १८०० च्या सुरुवातीच्या काळात. नेपोलियन बोनापार्ट या फ्रान्सच्या महान सेनानीने जग जिंकायचं ठरवलं होतं. त्याने इजिप्तवर हल्ला करून इजिप्त ताब्यात घेतला होता. या घटनेनंतर युरोपियन लोक इजिप्तच्या इतिहासात मोठ्या प्रमाणात रस घेऊ लागले. परिणामी इतिहासाचा बाजार झाला.

आज इजिप्शियन ममी म्हटलं की आपल्याला म्युझियममध्ये काचेत बंद ठेवलेला सांगाडा आठवतो. त्याकाळी ममीला एवढा मान नव्हता. वरती फोटोत दिसत असलेल्या माणसाप्रमाणे अनेक स्थानिक इजिप्शियन लोक रस्त्यावर ममी विकत असायचे. युरोपियन लोकांना ममी म्हणजे सो कुल वाटण्यापूर्वीपासून असा बाजार भरायचा, पण युरोपियन आल्यानंतर हा एक मोठा व्यवसाय झाला. 

ममी विकत घेऊन मोठाल्या पार्ट्या दिल्या जायच्या. या पार्ट्यांमध्ये मोठ्या जमावासमोर ममी उघडून दाखवली जायची आणि यावेळी माणसांचा हलकल्लोळ सुरु असायचा. दारू मौजमजा, नाचगाणी आणि हे सगळं त्या इजिप्शियन ममीसाठी, असा विचित्र प्रकार पाहायला मिळायचा. ज्यांना अख्खी ममी परवडायची नाही ते मुंडकं, हात, पाय असे सुटे अवयव विकत घ्यायचे.

ममी विकत घेऊन श्रीमंतीचं प्रदर्शन भरवण्याशिवायही ममीचे वेगवेगळे उपयोग होते. त्यातला एक उपयोग म्हणजे ममीचं बारीक चूर्ण करून ते औषध म्हणून घ्यायचं. हे चूर्ण औषध म्हणून काम करतं हे एवढं पक्कं झालं होतं की बाजारात चूर्णाला मोठ्या प्रमाणात मागणी आली. प्रचंड मागणी म्हणजे भेसळ आलीच. ममीच्या जागी गरीब, बेघर लोकांचे मृतदेहही ममी म्हणून विकले गेले. 

प्राचीन इजिप्शियन लोक मेलेल्या माणसाचं शरीर जतन करण्यासाठी आतले अवयव काढून टाकायचे. त्यासाठी एक विशिष्ट डांबरासारखा पदार्थ भरला जायचा. असं म्हणतात की आज जो अस्फाल्ट किंवा डांबर मिळतो त्यापेक्षा पुरातन इजिप्शियन डांबरात औषधी गुणधर्म होते. या कारणाने देखील ममीजची मागणी वाढली होती.

ममीचा पुढचा उपयोग शेतीसाठी होता. औद्योगीकरणाच्या प्रचंड लाटेत इजिप्शियन ममीज उकरून काढण्यात आले. यात माणसांपासून ते पुरातन प्राण्यांपर्यंत सगळ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि त्यांना ब्रिटन, जर्मनीला पाठवण्यात आलं. तिथे या ममीजचा वापर शेतात खत म्हणून करण्यात आला. 

या दरम्यान ममी ब्राऊन नावाच्या रंगाची मागणी वाढली. तसं पाहता ममी ब्राऊनचा इतिहास १७ ते १६ व्या शतकापर्यंत मागे जातो. गंधरस आणि ममीजचं चूर्ण वापरून हा रंग तयार केला जायचा. हे मिश्रण मेकअप करण्यासाठीही वापरलं जायचं. चित्रकारांच्या मते बिटूमन (डांबर) आणि ममीचं चूर्ण एकत्रित करून जो रंग तयार होतो तो ऑईल पेंटमध्ये मिसळल्यास चित्राला तडे जात नाहीत आणि रंग लवकर वाळत नाही.  

जसा ममीजचा वापर झाला तसा त्यांना झाकण्यासाठी वापरलेल्या कापडाचाही वापर झाला. हे कापड अमेरिकेला पाठवण्यात यायचं. अमेरिकेत त्याचा कापड तयार करण्यासाठी वापर व्हायचा. प्रसिद्ध लेखक मार्क ट्वेन म्हणतात की इजिप्तमध्ये कोळशाच्या जागी ममीज जाळून रेल्वे धावायची. 

२० च्या शतकाच्या सुरुवातीला ममीजची संख्या आटली. तोवर इजिप्तच्या लोकांनी प्रेतांची तळघरं, थडगे सगळे उकरून काढले होते. तेही पुरलं नाही तेव्हा मेलेल्या माणसांची, प्राण्यांची ममीज तयार करण्यात आली. यातकित्येक लोक दुर्धर आजारांनी ग्रस्त  होते. त्यांना मातीत पुरलं जायचं. त्यांच्यात डांबर भरलं जायचं आणि खरीखुरी ममी वाटेल असं त्यांना तयार केलं जायचं.

इतिहास आणि भांडवलशाही जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं हे इजिप्शियन ममीजच्या परिस्थितीवरून दिसून येतं. या सगळ्या धामधुमीत इजिप्तचा मोठा इतिहास नष्ट झाला हे मात्र खरं.

सबस्क्राईब करा

* indicates required