computer

१६०८ कोटी रुपयांच्या बिटकॉइन्सचा मालक पण पासवर्ड विसरला....नक्की काय आहे प्रकरण ?

बिटकॉइनबद्दल कुतूहल दिवसेंदिवस वाढत आहे. ज्यांनी पाच सात वर्षांपूर्वी बिटकॉइन घेऊन ठेवलेत त्यांचा तर मोठा फायदा झाला आहे. बिटकॉइन हाताशी असणे म्हणजे अलिबाबाची गुहाच सापडली असे वातावरण सध्याच्या काळात आहे. 

आता हे बिटकॉईन काय कॅश किंवा डॉलर्सच्या रुपात नसतात. हे आभासी चलन आहे. म्हणजेच इंटरनेटवर बिटकॉइन असतात. आता याच कारणाने बिटकॉइनच्या एका मालकाची चांगलीच गोची झाली आहे. पासवर्ड विसरल्यामुळे त्याचे बिटकॉइन लॉक झाले आहेत.

स्टीफन थॉमस नावाचा हा प्रोग्रॅमर आहे. त्याच्याकडे असलेल्या बिटकॉईन्सची किंमत ही तब्बल १६०८ कोटी एवढी आहे. त्यांना आयर्नकी नावाची एक हार्ड ड्राइव्ह उघडण्यासाठी पासवर्डची गरज आहे. 

ही आयर्नकी युजरला पासवर्ड ओळखण्याच्या १० संधी देतो. त्यानंतर कायमसाठी त्यांचे बिटकॉइन ब्लॉक होत असते. थॉमस काही वर्षांपूर्वी आपला पासवर्ड विसरला होता. त्याने ज्या कागदावर पासवर्ड लिहिला होता तो कागद देखील हरवला. त्यानंतर त्याने ८ वेळा प्रयत्न करून पाहिले. पण त्याला यश आले नाही.

आता त्याच्याकडे दोन संधी उरल्या आहेत. या दोन संधीत जर त्यांना पासवर्ड आठवला नाही, तर त्यांचे १६०८ कोटी कायमचे जातील. थॉमस सांगतो की, 'पलंगावर पडल्या पडल्या काहीतरी नवी स्ट्रॅटेजी आठवून मी कॉम्प्युटरवर बसत असे. नंतर ते फेल झाल्यावर पुन्हा मी हताश होत असे.' 

थॉमस हा काही वर्षांपूर्वी बिटकॉइनकडे आकर्षित झाला होता. थॉमस सांगतो की बिटकॉइनवर कुठल्या सरकार किंवा संस्थेचे नियंत्रण नसते. २०११ साली त्याने बिटकॉईनवर माहिती देणारा एक विडिओ बनवला होता. हे बघून खुश झालेल्या एका बिटकॉइन वापरकर्त्याने त्याला 7002 बिटकॉइन दिले होते. 

पण हे बिटकॉईन ज्या डिजिटल लॉकरमध्ये ठेवले होते, त्याचा पासवर्ड तो विसरला. तेव्हापासून त्याला आपल्या बिटकॉईन्सचा कुठलाही वापर करता आला नाहीये. पण दिवसेंदिवस बिटकॉईन्सची किंमत वाढत आता तब्बल १६०८ कोटींपर्यंत ते गेले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार थॉमस हा बिटकॉईनचा पासवर्ड हरवलेला एकटा नाही जवळपास २०% बिटकॉईन धारक हे असेच आहेत. 

थॉमसने सध्या तरी आयर्नकी सेफ ठेवली आहे. जर उद्या कुणी काही उपाय घेऊन आला तर नशीब फळेल या आशेवर तो आहे. पण एवढी मोठी रक्कम ब्लॉक झाल्यावर त्याला कशी झोप लागत असेल हा देखील प्रश्नच आहे.

 

आणखी वाचा :

पासवर्ड हरवल्याने लोकांचे १००० कोटी अडकले !!! वाचा हा आगळावेगळा किस्सा

सबस्क्राईब करा

* indicates required