एका तासात थाळी संपवा आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट जिंका....पुण्याच्या हॉटेलची ऑफर ऐकली का?

एका तासात थाळी संपवा आणि रॉयल एन्फिल्ड बुलेट जिंका. ही कोणती फसवी जाहिरात नाहीये. खरोखरच पुण्याच्या एका हॉटेलच्या मालकाने ही ऑफर दिली आहे. आतापर्यंत तुम्ही एकावर एक मोफत किंवा कोणत्या ठराविक वेळी येऊन खाल्यास इतके टक्के सवलत अश्या जाहिराती वाचल्या असतील. पण पुण्यातल्या खवय्यांसाठी या हॉटेलने बक्षिसात चक्क बुलेटची सुस्साट ऑफर दिली आहे.
तुम्ही जर मांसाहारी प्रेमी असाल तर तुमच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. वडगाव मावळमधील शिवराज हॉटेलने ही भन्नाट ऑफर दिली आहे. अतिभव्य ‘बुलेट थाळी’ असं या थाळीच नाव असून, ही ४ किलो वजनाची मांसाहारी थाळी आहे. एका तासात ही संपवून दाखवली तर १,६५,००० बुलेटचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. ही अर्थात एकट्याने संपवायची आहे. या थाळीची किंमत रु. २५०० इतकी आहे.
बुलेट थाळीत काय असेल? या थाळीत दोन-चार नव्हे, तर तब्बल बारा पद्धतीच्या वेगवेगळ्या डिश आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी चार किलो मटण आणि तळलेले मासे वापरले जातात. विशेष म्हणजे ही थाळी तयार करण्यासाठी ५५ जण कार्यरत असतात. यामध्ये पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोळंबी बिर्याणी, चिकन मसाला, चिकन तंदूरी, सुके मटण, मटण मसाला या डिश आहेत.
या हॉटेलचे मालक अतुल वाईकरांनी सांगितलं, "कोरोनाकाळानंतर ग्राहकांचा प्रतिसाद थंड होता. हा ओघ वाढवण्यासाठी काही नवीन योजना करायचा विचार होता. त्यातून या थाळीची कल्पना आली." हॉटेलच्या वरांड्यात वाईकर यांनी पाच शानदार रॉयल एन्फिल्ड बुलेट्स ठेवल्या आहेत. हॉटेलबाहेरील बॅनर, मेन्यूकार्ड अशा सर्वच ठिकाणी बुलेट थाळी स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच फेसबुक पेजवरही माहिती देण्यात आली आहे.
बुलेट थाळीबरोबरच स्पेशल रावण थाळी, मालवणी फिश थाळी, पैलवान मटण थाळी, बकासूर चिकन थाळी आणि सरकार मटण थाळी या सहा थाळ्या तुम्हाला इथे चाखायला मिळतील. या थाळीची चव घेण्यासाठी आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तिथे बरीच गर्दी होत आहे. यापूर्वीही या हॉटेलमध्ये रावण थाळीची ऑफर होती. ही आठ किलोची थाळी चार जणांनी मिळून संपवायची आणि ५००० चे बक्षीस घेऊन जायचे.
बुलेट थाळीलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सोलापूरच्या सोमनाथ पवार यानी एक तासात थाळी संपवून पहिली बुलेट जिंकली आहे. तुम्हीही नॉनव्हेजचे चाहते असाल तर भेट देऊन बघा. खवय्ये मित्रांसाठी ही माहिती जास्तीच जास्त शेयर करा.