computer

ओशोंच्या मृत्युनंतर गेले ३२ वर्षेही न उलगडलेले गूढ !!

मृत्यू साजरा करायचा असतो, मृत्युला घाबरण्यासारखं काहीही नसतं’ असं म्हणणाऱ्या अध्यात्मिक गुरु रजनीश “ओशो” यांच्या मृत्यूला  १९ जानेवारी रोजी ३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या मृत्युनंतर त्यांना नैसर्गिक मृत्यू आला की त्यांच्या मर्जीतल्या काही खास लोकांनी त्यांना संपवलं,अशा विवादाचे वादळ अजूनही घोंगावते आहे.

त्यांच्या अनेक शिष्यांचा असा संशय आहे की रजनीश यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. हे सर्व काही हजारो कोटींची मालमत्ता ताब्यात घेता यावी म्हणूनच घडले असावे, असा त्यांचा संशय आहे. या संशयाला पुष्टी देणारी अनेक कागदपत्रं आणि अनेकांच्या प्रत्यक्ष साक्षी देखील उपलब्ध आहेत. मुंबई हायकोर्टात त्यांचे एक शिष्य योगेश ठक्कर यांनी दाखल केलेला खटला अजूनही चालूच आहे. १९ जानेवारी १९९० रोजी दुपारी १ वाजता काय घडले आणि त्यानंतर गेल्या ३४ वर्षांत काय घडले याचा आढावा आज बोभाटाच्या लेखात घेऊया.

१९ जानेवारीच्या दुपारी रजनीश  यांचे शिष्य आणि डॉ. गोकुल गोकाणी यांना ओशोंच्या आश्रमातून फोन आला. त्यांना ताबडतोब इमर्जन्सी किट आणि लेटरहेड घेऊन येण्यास सांगण्यात आले. डॉ. गोकाणी आश्रमात पोचल्यानंतर ओशोंचे शिष्य अम्रितो (जॉन अॅड्र्यू) त्यांना भेटले आणि म्हणाले की ‘ओशो देह सोडून निघाले आहेत’. हे ऐकल्यावर डॉ. गोकाणींना रडू आवरेनासे झाले. पण अम्रितो त्यांना म्हणाले, ‘ओशोंना असा निरोप देऊ नका’.

डॉ. गोकाणी यांनी हायकोर्टात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पुढे असे म्हटले आहे की  ५ वाजता ते ओशोंच्या जवळ गेले तेव्हा अम्रितो आणि जयेश (मायकल ओब्रायन) ओशोंच्या देहाजवळ उभे होते. अम्रितोने त्यांना सांगितले की, ‘आताच ओशो त्यांचा देह सोडून गेले आहेत आणि तुम्ही त्यांच्या मृत्यूचा दाखला द्या’. ओशोंचे शरीर तेव्हाही उबदार होते. याचा अर्थ असा की मृत्यू होऊन फारसा वेळ झाला नव्हता. डॉ. गोकाणींच्या मनाला छळणारे प्रश्न अनेक होते.

(डॉ. गोकाणी)

१. ओशोंचा मृत्यू जवळ आला आहे, हे लक्षात येऊनही शिष्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न  का केला नाही?

२. त्यावेळी ओशोंच्या आश्रमात अनेक डॉक्टर्स त्यापैकी कोणालाही का बोलावण्यात आले नाही?

३. त्यांना हॉस्पीटलमध्ये का हलवण्यात आले नाही?

४. ओशोंच्या मृत्यूचे खरे कारण काय होते?

(अम्रितो [जॉन अॅड्र्यू])

डॉ. गोकाणींनी जेव्हा रजनीश यांना तपासले तेव्हा त्यांच्या तोंडातून ओकारी झाल्याचे दिसत होते. या ओकारीचा काही अंश त्यांच्या बाहीवरही सांडलेला दिसत होता. असे असेल तर मृत्यूचे नक्की कारण काय होते? त्याचवेळी अम्रितो आणि जयेश यांनी डॉ. गोकाणींना सांगितले की ओशोंचा मृत्यू हृदयविकाराने झाला आहे असे लिहा. जेणेकरून पोस्टमॉर्टेम करावे लागणार नाही. आता पुन्हा एक नवीन प्रश्न असा उद्भवतो की त्याचवेळी डॉ. गोकाणींनी असे लिहिण्यास नकार का दिला नाही.

ओशोंनी देहत्याग केल्याचा निरोप त्यांच्या आतील वर्तुळातील फक्त २१ सदस्यांनाच कळवण्यात आला.  त्यांना देखील ओशोंचे दुरून दर्शन घेण्यास सांगण्यात आले. ओशोंच्या मृत्यूबद्दल कोणीही चर्चा करू नये अशी ताकीदही त्यांना देण्यात आली. थोड्याच वेळाने त्यांच्या मृत्यूची जाहीर घोषणा करण्यात आली आणि तासाभरातच ओशोंचे दहनही आटपून घेण्यात आले. पुन्हा एक नवीन प्रश्न उभा राहतो की त्यांचे दहन  करण्याची इतकी घाई का करण्यात आली?

(जयेश [मायकल ओब्राय])

ओशोंच्या आईंना त्यांच्या मृत्यूची बातमी सांगण्याची जबाबदरी सचिव निलम हिच्यावर सोपवण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या आईंचे उस्फुर्त उद्गार असे होते, “नीलम, त्यांनी त्याला मारलेले आहे”. आई असे का म्हणाली असेल? हा पण प्रश्न आहे. त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दुपारी एक वाजता ओशोंच्या मृत्यूची चिन्हे दिसू लागताच त्यांच्या आईला का सांगण्यात आले नाही?    

(ओशो आणि त्यांच्या आई)

ओशोंच्या मृत्यू नंतर आश्रमाची स्थावरजंगम मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी त्यांचे मृत्युपत्र असल्याचा दावा करण्यात आला. हे मृत्युपत्र ओशोंनी १९८९ साली केले होते, पण अमेरिकेतील कोर्टात ते २०१३ साली उपलब्ध करण्यात आले. त्यामुळेच हे मृत्यूपत्र नकली असल्याचा ठक्कर यांचा दावा आहे. ठक्कर यांनी या मृत्युपत्राच्या प्रती दिल्ली, जर्मनी आणि इटली येथील तज्ञांसमोर ठेवले. सोबत ज्या पुस्तकावरून ओशोंच्या सहीची कॉपी करण्यात आली ते पुस्तक सुद्धा देण्यात आलं. सर्व तज्ञांच्या मते मृत्युपत्रावरची सही फोटो कॉपी करण्यात आलेली आहे.

अमेरिकन तुरुंगात असणाऱ्या ओशोंच्या पट्टशिष्या आनंदशीला यांनी पण त्यांचे पुस्तक ‘dont kill him’ मध्ये असे अनेक प्रश्न विचारले आहेत.

योगेश ठक्कर यांच्या मते हे सर्व काही घडले ते केवळ आश्रमाच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठीच. ओशोंच्या मृत्युनंतर शेकडो कोटी रुपये OSHO International Foundation या trust मधून OSHO International Meditation Resort या खाजगी कंपनीकडे वळवण्यात आले.

ऑक्टोबर १९८५ मध्ये अमेरिकन सरकारने अनेक वेगवेगळे आरोप लावून ओशोंची अमेरिकेतून हकालपट्टी केली होती. त्यावेळेस अमेरिकन सरकारला भीती वाटावी इतका दबदबा ओशोंचा होता. याच दरम्यान अमेरिकेत ओशोंना अटक झाली तेव्हा तुरुंगात असताना थॅलीयम नावाच्या किरणोत्सर्गी पदार्थाचे इंजेक्शन देण्यात आले होते असाही कयास आहे.  थॅलीयमच्या विषप्रयोगामुळेसुद्धा ओशोंचा मृत्यू झाला असावा. एकूण बघता ओशो या व्यक्तिमत्वाचे गूढ मरणानंतरही तसेच राहिले.  

सबस्क्राईब करा

* indicates required