computer

बाहुल्यांनी भरलेल्या या बेटाचं रहस्य काय ? 'अॅॅडव्हेन्चर' आवडणाऱ्या प्रत्येकाने हे वाचायलाच हवं !!

भुताटकीने भरलेल्या जागी जाण्यात एक वेगळंच साहस असतं. असं साहस आवडणाऱ्यांसाठी आम्ही आज एका नवीन जागेची माहिती घेऊन आलो आहोत. मेक्सिको सिटी पासून जवळच असलेल्या Xochimilco canals भागात 'La Isla de la Munecas' नावाचं  बेट आहे. असं म्हणतात या बेटावर पछाडलेल्या बाहुल्या राहतात. बेटावर जिथे नजर जाईल तिथे जागोजागी बाहुल्या लटकवलेल्या दिसतात राव. या बाहुल्या तिथे कशा आल्या? त्यांना तिथे कोणी लटकावलं? यासाठी वाचूया या  बेटाची दंतकथा. 

आज ज्याला डॉल्स आयलंड म्हणतात ते १९५० च्या आधी एक साधारण बेट होतं. या बेटावर 'डॉन जुलिअन सॅन्टा बरेरा' हा मेक्सिको सिटी भागात राहणारा माणूस  सहलीसाठी आला होता. तो बेटावर असताना एक मुलगी किनाऱ्याजवळ पाण्यात बुडून मेली. तिच्या मृत्यूच्या काही दिवसांनी या  बेटाच्या दिशेने एक बाहुली वाहत आली. सॅन्टा बरेराला वाटलं या बाहुलीत त्या मुलीचं भूत आहे. त्याने पुढे जे केलं तिथूनच या बेटाचं आणि त्याचं नशीब बदलून गेलं. 

त्याने मुलीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ती बाहुली झाडावर लटकावली. यानंतर तिथे वाहून येणारी प्रत्येक बाहुली तो याच प्रकारे झाडावर किंवा इतरत्र लटकवू लागला. पाहता पाहता संपूर्ण बेट या बाहुल्यांनी भरून गेलं. एकदा लटकावल्यानंतर त्यांच्याकडे सॅन्टा बरेराने लक्ष दिलं नाही. त्यामुळं बाहुल्यांवर धूळ आणि कोळ्यांचं जाळं चढत गेलं. त्यामुळे लहान  मुलांच्या खेळण्यातल्या त्या बाहुल्या भीतीदायक आणि विकृत दिसू लागल्या. 

असं म्हणतात सॅन्टा बरेरा हा इसम वेडा होता. या बेटावर वास्तव्य करण्यासाठी  त्याने आपल्या पत्नी व मुलांपासून फारकत घेतली होती. तो स्वतःला बेटाचा 

'केरटेकर' (काळजी घेणारा) समजायचा. जेव्हा बाहुल्या वाहून येत नसत, तेव्हा तो कचऱ्यातून किंवा नदीच्या आजूबाजूच्या भागातून बाहुल्या उचलून आणू लागला. बाहुल्यांचं हे साम्राज्य त्याने का उभं केलं हे अजूनही गूढ आहे. 

२००१ साली सॅन्टा बरेराचा या बेटावरच गूढ मृत्यू झाला. गूढ यासाठी की, तोसुद्धा त्याच जागी बुडून मेला जिथे ती मुलगी मेली होती.  या बेटावर राहणारा तो एकमेव माणूस होता. तो गेल्यानंतर हे बेट आता संपूर्णपणे बाहुल्यांचं झालं आहे. 

१९९० साली सॅन्टा बरेरा हयात असताना बाहेरच्या जगाला पहिल्यांदा या बेटाबद्दल समजलं. तेव्हा या गूढ बेटाबद्दल माहिती बाहेर पडली. 

पण ही माहिती सॅन्टा बरेराकडून आलेली आहे. ही कथा अनेकांना खोटी वाटते. एवढंच काय सॅन्टा बरेराच्या कुटुंबियांना सुद्धा खोटी वाटते !! खरंच तिथे कोणा मुलीचा मृत्यू झाला होता का? की हा त्याचा निव्वळ भास होता? किंवा आणखी काही? राव, या अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरं सॅन्टा बरेरासोबतच वाहून गेली. 

कथा काहीही असो, पण डॉल्स  आयलंडने पर्यटकांना  भुताटकीने भरलेला नवीन 'डेस्टिनेशन' दिला आहे.  सॅन्टा बरेराच्या मृत्यूनंतर त्याला आणि त्या अज्ञात मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पर्यटकांची रीघ लागली. पर्यटक आजही  आपल्याकडच्या बाहुल्या या बेटावर लटकावून जातात. पण रात्री या बेटावर चिटपाखरू फिरकत नाही. 

राव, तुम्हाला सुद्धा असा भन्नाट अनुभव घ्यायला आवडत असेल तर La Isla de la Munecas बेटाला नक्की भेट द्या!! काय म्हणता?

सबस्क्राईब करा

* indicates required