computer

जपानच्या या बेटावर आहे मांजराचं राज्य...का आहे मांजरांना एवढं महत्व ? वाचा ३०० वर्ष जुना इतिहास !!

१७०० ते १८०० च्या आसपास जपानच्या ताशीरोझिमा बेटावर मांजर पहिल्यांदा आणली गेली. आज या बेटावर मांजरींची संख्या माणसांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे. याला कारणही तसंच आहे. मांजरीला जगात कुठेही नसेल एवढं महत्व या बेटावर आहे. मांजर म्हणजे पवित्र आणि मांजर म्हणजे ‘शुभ अशी समजूत आहे. चला तर या बेटावर मांजर स्पेशल का याचं उत्तर शोधूया ?

ताशीरोझिमा बेटावर १७०० च्या मध्यात रेशीम तयार होत असे. समस्या अशी होती की या बेटावर उंदरांचा सुळसुळाट फार होता. ही समस्या सोडवण्यासाठी मग मांजर आणली गेली. मांजरींनी उंदरांच्या संख्येवर नियंत्रण आणलं. जेव्हा उंदीर कमी पडले तेव्हा मांजरी कोळ्यांच्या जाळ्यातले उरले सुरले मासे खाऊन जगू लागल्या. त्याच काळात बेटावरच्या मच्छिमारांच्या समुदायात अशी समजूत पसरली की मांजर आहे म्हणून आपल्या गळाला जास्त मासे लागतात. या समजुतीमुळे मांजरींना महत्व आलं. पुढे मच्छिमारांनी मांजरीच्या ‘गुड लक’ साठी बेटाच्या मध्यभागी एक मंदिर (नेको-जिंजा) सुद्धा बांधलं. हे मंदिर आजही बेटावरच्या आकर्षणाचं केंद्र आहे.

काळ बदलला तसा बेटावरील बहुसंख्य लोक बेट सोडून निघून गेले. मागील पाच दशकात बेटावरील लोकसंख्या १००० वरून १०० पेक्षा खाली उरली आहे. बहुसंख्य नागरिक हे ६५ पेक्षा जास्त वयाचे आहेत.

आजही मांजरींना बेटावर पवित्र मानलं जातं. कोणत्याही नागरिकाने मांजर घरात बंदिस्त ठेवू नये असा अलिखित नियम आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मांजरींचा झुंड खुलेआम बेटावर फिरत असतो. नागरिक व पर्यटक खाण्याच्या वस्तू व दुध मांजरींसाठी ठेवून जातात. बेटावर असलेल्या मंदिरात पर्यटक मांजरीच्या संबंधित चित्र किंवा इतर वस्तू ठेवतात. मांजरींना या बेटावर काहीच कमी नाही राव. एकप्रकारे ताशीरोझिमावर मांजरींचं राज्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

 

 

आणखी वाचा :

तुम्हाला मांजरी बद्दल या १६ गोष्टी माहित आहेत का ?

बंगाली वाघांपेक्षा मोठं मांजर सापडलं

गोष्ट अंतराळात गेलेल्या मांजरीची, माहितेय का तुम्हांला? सोबत तिचा व्हिडिओही पाहा...

हजारो इंटरनेट युझर्सना या ओंडक्यांमध्ये सापडेना झालीय एक मांजर...

सबस्क्राईब करा

* indicates required