computer

मध्यप्रदेशच्या चहा विक्रेत्याची मुलगी फायटर विमानाची पायलट झाली...कौतुक तर झालंच पाहिजे !!

"म्हारी छोरीयाँ छोरोंसे कम है के?" या प्रश्नाचं उत्तर बऱ्याच ठिकाणी नकारार्थीच दिसतं. मुली मुख्यतः पुरुषांच्या म्हटल्या जाणाऱ्या क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत आहेत आणि काही गोष्टी फक्त पुरुष करू शकतात हा गैरसमज मोडून काढत आहेत. यावर आम्ही याआधीही काही लेखांच्या माध्यमातून प्रकाश टाकला आहे. आज अशाच एका कर्तृत्ववान लेकीची गोष्ट तुमच्या भेटीला घेऊन येत आहोत.

गोष्ट आहे मध्य प्रदेशातल्या एका छोट्याशा खेड्यातली. नीमच जिल्ह्यातलं तारापूर-उमेदपुरा असं त्या गावाचं नाव. एक चहा विकून उदरनिर्वाह करणारा मनुष्य आपल्या तीन मुलांना कसेबसे शिकवून दिवस काढत होता. तर त्याच्या मुलीने काय कर्तृत्व गाजवावं? तर तीने चक्क फायटर विमानाची पायलट बनून दाखवले आहे!!! आंचल सुरेश गंगवाल तिचं नाव आहे!!

हैदराबाद येथे झालेल्या दीक्षांत समारंभात तिचा सन्मान करण्यात आला. नीमचच्या बस स्टँडवर सुरेश गंगवाल यांचं चहाचं दुकान आहे. आंचल एयरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्टमध्ये मे २०१८ ला यशस्वी झाली होती. लगोलग ती फायटर विमानांच्या प्रशिक्षणासाठी हैद्राबादला गेली होती. आंचलची एक बहीण हॉलीबॉल खेळाडू आहे.

आंचल सांगते की २०१३ ला उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरात भारतीय वायूसेनेनं केलेलं मदतकार्य पाहून मला वायुसेनेत जायची तीव्र इच्छा निर्माण झाली होती. आंचलने याआधी अनेक पदेसुद्धा भूषविली आहेत. ती मध्य प्रदेश पोलीस खात्यात पोलीस उपनिरीक्षक होती. तिथे राजीनामा देऊन श्रम निरीक्षक म्हणून जॉईन झाली. काही महिने काम करून ते पददेखील तिने सोडले. त्यानंतर तिची निवड एयरफोर्स कॉमन ऍडमिशन टेस्टमध्ये झाली. निवड होणारी ती मध्य प्रदेशची एकमेव मुलगी होती. इथंपर्यंत पोचण्यासाठी तिला बरेच श्रम करावे लागले. तिला २४ दिवसांत ९ किलो वजन कमी करायचे होते. तर या पोरीने ३ दिवस चक्क पाणीसुद्धा प्यायले नव्हते. आपल्याला बऱ्याच वेळा या लोकांचे यश दिसते पण त्यामागे जीवतोड मेहनत असते हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.

आपल्या मुलीच्या यशाबद्दल बोलताना सुरेश गंगवाल म्हणतात की, "या सर्व प्रवासात आम्हाला खूप अडचणी आल्या. पण आम्ही ठरवले होते, की कशाही परिस्थितीत मुलांना शिकवायचे आणि आज त्याचेच फळ आम्हाला मिळाले आहे. पुढे जाऊन ते असेही म्हणाले की फादर्स डेच्या दिवशी यापेक्षा चांगली भेट मला काय असू शकते?"

 

आणखी वाचा :

अंतरा मेहता : भेटा महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला फायटर पायलटला !!

स्त्रियांना या ७ गोष्टी करण्याची परवानगी नव्हती!! काही परवानग्या तर गेल्या १० वर्षांत मिळाल्या आहेत..

महिलांच्या ड्रेसला १८ व्या शतकापासून या कारणामुळे खिसे नाहीत !!

सबस्क्राईब करा

* indicates required