या दोन बहिणी मुलं होऊन सलूनमध्ये काय करत आहेत? जाणून घ्या या हिकमती मुलींची गोष्ट!

दंगल मध्ये तुम्ही गीता-बबिताला बघितलं असणार, आज अशाच दोन धाकड बहिणींबद्दल जाणून घेऊया. नाही आम्ही कुस्तीगीर बहिणींबद्दल बोलत नाही आहोत. आज आपण बोलणार आहोत आयुष्याशी दोन हात करणाऱ्या बहिणींबद्दल.
उत्तर प्रदेश येथील १८ वर्षांची ज्योती कुमारी आणि १६ वर्षांची नेहा यांनी मिळून ४ वर्ष मुलगा असण्याचं नाटक केलं आहे. त्यांना असं का करावं लागलं ? चला जाणून घेऊया.
२०१४ साली ज्योती आणि नेहा यांच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होतं त्यांचं सलून. वडील आजारी पडल्याने उत्पन्न थांबलं. गरिबी तर पाचवीला पुजलेली होती.
अशा परिस्थितीत या दोन मुलींनाच घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागली. त्यांनी वडिलांच्या जागी सलून मध्ये काम सुरु केलं. पण येणारे ग्राहक दोघींशी गैरवर्तणूक करत. अखेर याला कंटाळून दोघींनी स्वतः मध्ये बदल केला.
त्यांनी आपले केस कापले, कपड्यात बदल केला आणि नावही बदललं. दीपक आणि राजूच्या रूपाने त्यांनी नव्याने काम सुरु केलं. त्यांच्या गावातील मंडळींना सोडून याबद्दल कोणालाच पत्ता नव्हता. त्यानंतर त्यांचं सलून पूर्ववत चालू लागलं. दोघी सकाळी अभ्यास करायच्या आणि संध्याकाळी सलून चालवायच्या. रोजच्या ४०० रुपयांच्या कमाईने त्यांनी आपलं घर चालवलं.
आज ४ वर्षांनी त्यांनी आपल्या नाटकावर पडदा टाकलेला आहे. नेहाने म्हटलं की, त्यावेळी आम्ही इतरांना घाबरायचो, पण आज आम्ही इतका आत्मविश्वास कमावला आहे की आम्ही कोणालाही घाबरत नाही. आता जवळजवळ सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल समजलं आहे. दोघीही आपल्याबद्दल सांगायला कचरत नाहीत. एव्हाना त्यांनी केसही वाढवायला सुरुवात केली आहे.
दोघींच्या शिक्षणाचं म्हणाल तर ज्योती पदवीधर झाली आहे आणि नेहा अजून शिकत आहे. त्यांच्या वडिलांना दोघींचा अभिमान वाटत आहे. ही बातमी बाहेर पडल्यानंतर शासनातर्फे दोघींचा सत्कार करण्यात आला.
मंडळी, मुलींना मिळणारी वागणूक या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित होते. या गोष्टीने तरी समाजात बदल घडेल अशी आपण आशा करूया !!
जाता जाता :
अफगाणिस्तानातल्या तालिबान बहुल प्रदेशातही लहान मुली असे मुलांचे कपडे घालून बाहेर कामाला जातात आणि घर चालवतात. तिथं स्त्रियांना पुरुषाशिवाय बाहेर फिरण्याची किंवा काम करण्याची परवानगी नसते. असं काम करणाऱ्या मुलींवरचं ब्रेडविनर नावाचं पुस्तक प्रसिद्ध आहे