आता वडापाव कागदात बांधून दिला तर दंड भरावा लागेल !! काय आहे नवीन नियम ??

मंडळी, वडापाव पार्सल पाहिजे म्हटल्यावर वडेवाला काय करतो ? तर, कागदाच्या गठ्ठ्यातून एक कागद काढतो त्यात वडा, पाव, मिरच्या वगैरे टाकून ते आपल्याला देतो. हे अगदी सहज घडतं. आपल्याकडे वर्तमानपत्राचा याही पद्धतीने वापर केला जाती, पण हे या पुढे चालणार नाही. कारण तसा नवा कायदाच येतोय राव.
FSSAI (Food Safety Standard Authority of India) आणि IIP (Institute of Packaging) यांनी केलेल्या चाचणीत असं आढळून आलं आहे, की रिसायकल केलेलं प्लास्टिक, वर्तमानपत्र, आणि कागदी पिशव्या यांच्या वापरामुळे अन्नपदार्थ दुषित होतं. या चाचणीत शरीरास हानिकारक असणारी रसायनं आणि धातू आढळून आले आहेत.
मंडळी, वर्तमानपत्र आणि कागदी पिशव्यांवर निर्बंध येणार हे फार पूर्वीपासून बोललं जात होतं. याची कारणंही तशीच आहेत. FSSAI ने सांगितल्याप्रमाणे कागद किंवा वर्तमानपत्र छापताना वापरण्यात येणारा रंग आणि शाई अन्न पदार्थात उतरल्याने कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो. याखेरीज पचनक्रियेवरही परिणाम होऊ शकतो.
मग आता तुम्ही म्हणाल प्लास्टिक नाही, कागदही नाही मग पॅकिंगला वापरायचं काय ? तर त्यासाठी एक पर्याय FSSAI ने सुचवला आहे. वरील तिन्ही गोष्टींना पर्याय म्हणून एक विशिष्ट प्रकारचा कागद सुचवण्यात आलेला आहे. हा कागद रिसायकल केलेला असतो व फारसा महागही नसतो. या कागदाचे प्लेट्स आणि रॅपर्स अन्नपदार्थ पॅक करण्याकरिता वापरता येऊ शकतात. FSSAI ने पर्यावरण आणि आरोग्य या दोन गोष्टी समोर ठेवून हा पर्याय सुचवला आहे.
येत्या १ जुलै पासून हा नियम लागू होणार आहे. या नियमाची अंमलबजावणी कठीण असल्याने काही महिन्यांचा अवधी देण्यात येतोय. त्यानंतर जर नियम मोडला तर दंड भरावा लागेल हे वेगळं सांगायला नको...
तर मंडळी, आता तुम्ही सांगा, हा नियम तुम्हाला पटला का ??