computer

Met Gala महोत्सव काय आहे आणि का भरवला जातो हा महोत्सव ??

मंडळी, काल पूर्ण दिवस प्रियांका चोप्राच्या पिंजारलेल्या केसांची चर्चा होती. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की तिने असा लुक का केला होता आणि ती होती तरी कुठे. आपल्या भारतीयांना फक्त प्रियांकाचा लुक दिसला, पण काल दिवसभरात असे अनेक सेलिब्रिटीज होते ज्यांनी असाच विचित्र अवतार धारण केला होता.

काल संपूर्ण जगाने या लोकांन ट्रोल केलं आणि त्यांच्यावर मिम्स बनवले. आज या मागचं कारण पण जाणून घेऊया.

मंडळी, या सगळ्यांमागे आहे Met Gala फॅशन महोत्सव. मनोरंजन, राजकारण, व्यवसाय, फॅशन अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील देशविदेशातील सेलिब्रिटीज दरवर्षी या महोत्सवाला हजेरी लावतात. प्रत्येक वर्षाची एक विशेष थीम असते. यावर्षाची थीम होती “Camp: Notes on Fashion ”. या थीम मध्ये असलेला Camp हा शब्द एका विशिष्ट फॅशन पद्धतीला दिलेलं नाव आहे. हा प्रकार विचित्र फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. यावर्षीची थीम Camp असल्या कारणाने सगळे सेलिब्रिटी विचित्र अवतारात होते. आता समजलं प्रियांकाचे केस तसे का होते ते ?

Met Gala महोत्सव काय आहे ?

Met Gala मधला met हा शब्द आलाय Metropolitan या शब्दावरून तर gala चा अर्थ होतो उत्सव. Metropolitan Museum of Art हे अमेरिकेतलं सगळ्यात मोठं आर्ट म्युझियम आहे. या म्युझियमला the Met असंही म्हटलं जातं. या म्युझियमच्या तर्फे हा महोत्सव भरवला जातो म्हणून या महोत्सवाला Met Gala म्हणतात.

या म्युझियमच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी गोळा करण्याच्या हेतूने दर वर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी Met Gala महोत्सव भरवला जातो. महोत्सवात येण्यासाठी जे तिकिटाचे दर लावले जातात त्यातून हा निधी मिळतो. याखेरीज याच दिवसपासून इन्स्टिट्यूटचं ‘वार्षिक फॅशन प्रदर्शन’ सुरु होतं. १९७१ साली पहिला Met Gala महोत्सव भरला होता त्यानंतर आजतागायत ही परंपरा पुढे सुरु आहे.

आजच्या घडीला या महोत्सवाला एक मोठं रूप मिळालं आहे. या कारणाने Met Gala ला “the party of the year,” आणि “the Oscars of the East Coast” या नावाने पण ओळखलं जातं. एखाद्या पुरस्कार सोहळ्याप्रमाणे महोत्सवात येण्यासाठी रेड कार्पेट अंथरला जातो. या महोत्सवात जाणं हे प्रतिष्ठेचं पण मानलं जातं.

काल जसं कपड्यांमुळे Met Gala चर्चेत होता तसंच दरवर्षी काही ना काही कारणाने Met Gala गाजत असतो. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची सध्याची पत्नी मेलानिया यांना याच महोत्सवात प्रपोज केलं होतं.

तर मंडळी, कशी वाटली ही माहिती ? आवडली असेल तर नक्की शेअर करा !!

सबस्क्राईब करा

* indicates required