लाफिंग बुद्धा आणि त्याची भलीमोठी झोळी...वाचा ही नक्की काय गोष्ट आहे !!

मंडळी, आज आम्ही लाफिंग बुद्धाची गोष्ट घेऊन आलो आहोत. जाडजूड, हसऱ्या डोळ्यांचा लाफिंग बुद्धा घरोघरी पाहायला मिळतो, पण त्याच्याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. मुळात तो खरोखर होऊन गेला का ? हा प्रश्न आपल्याला पडतो. राव, तो खरंच होऊन गेला आणि तो खरोखर लाफिंग म्हणजे हसऱ्या स्वभावाचा बुद्ध होता. चला तर जाणून घेऊया लाफिंग बुद्धाची खरी गोष्ट.

स्रोत

लाफिंग बुद्धाचं खरं नाव होतं होतेई किंवा पु-ताई. तो झेन बुद्धिस्ट परंपरेतला भिकू होता. आजपासून जवळजवळ १००० वर्षांपूर्वी चीनच्या भागात तो होऊन गेला. त्याला मैत्रेयी म्हणजे पुढचा बुद्ध म्हणून मान्यता मिळाली होती. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने आयुष्यभर कोणत्याही उपदेशाशिवाय लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखवला.

त्याला लाफिंग बुद्धा ही ओळख कशी मिळाली याची कथा फार चुरस आहे. तो कोणत्याही गावात जायचा आणि तिथल्या मुलांना मिठाई व खेळणी वाटायचा. झोळी रिकामी झाली की झोळी खाली ठेवून आकाशाकडे बघत नुसता हसत सुटायचा. त्याचं पाहून गावातली लोकही हसायची. त्यांच्या एकत्रित हसण्याने गावात हास्याची लाट यायची. तसा लाफिंग बुद्धा दिसायलाही थोडा विनोदीच होता. आपल्याला तो मूर्तीत दिसते तसाच तो खरोखर लठ्ठ आणि हसऱ्या चेहऱ्याचा होता. त्याला पाहून कोणाच्याही चेहऱ्यावर सहज हास्य उमलत असे.

गावागावात फिरून तो याच पद्धतीने लोकांना हसवायचा. त्याच्या या स्वभावामुळे तो सहजच लोकप्रिय झाला. असं म्हणतात की तो फार क्वचित बोलायचा. एकदा त्याला कोणीतरी त्याच्या अजब पद्धतीविषयी विचारल्यावर तो म्हणाला ‘मी मुलांना मिठाई वाटतो ते त्यांना हे दाखवून देण्यासाठी की तुम्ही जेवढं जास्त इतरांना द्याल, तेवढंच तुमच्याकडे ते फिरून येईल.’ त्याची एकच शिकवण होती जेव्हा कधी तुम्हाला एखादी समस्या भेडसावत असेल तेव्हा तुमच्या समस्यांना बाजूला ठेवा आणि हसा, खूप हसा!!

हसण्यावर लाफिंग बुद्धाचा भलताच विश्वास होता. त्याने संपूर्ण आयुष्य या प्रकारे हसण्यात घालवलं. जेव्हा त्याच्या जायची वेळ आली तेव्हाही त्याने जाताजाता आपला मिश्कील स्वभाव दाखवून दिला.

असं म्हणतात, की हातोई बुद्धाला जेव्हा समजलं की त्याची जाण्याची वेळ आली आहे तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून आपल्या मृत्युनंतर आपल्या देहाला लगेचच अग्नी द्यावा ही इच्छा व्यक्त केली. झेन परंपरेत मृतांना अग्नी देण्याची परंपरा नाही त्यामुळे त्याच्या या आदेशामुळे सगळेच चकित झाले. त्याच्या इच्छेप्रमाणे जेव्हा त्याच्या देहाला अग्नी देण्यात आला तेव्हा अचानक त्याच्या प्रेतामधून फटाके फुटू लागले. लोककथेनुसार लाफिंग बुद्धाने आपल्या खिशात भरपूर फटाके लपवून ठेवले होते. अशा प्रकारे त्याने जाताजातही लोकांना आपल्या व्यक्तिमत्वाने चकित करून सोडलं.

तर मंडळी पुढच्यावेळी जेव्हा तुम्ही कधी लाफिंग बुद्धाच्या मूर्तीकडे पाहाल तेव्हा लाफिंग बुद्धाची शिकवण लक्षात ठेवायला विसरू नका. खूप हसा, हसण्यासाठी पैसे थोडीच लागतात !!!

सबस्क्राईब करा

* indicates required