computer

१,४१,००० बुद्धिबळाच्या सोंगट्यांनी साकारले महेंद्रसिंग धोनीचे मोझेक पोट्रेट....

आपल्या भारताला कला, क्रिडा, शास्त्र ह्याचा अमूल्य असा वारसा लाभलाय. भारतातील अनेक प्रतिभावंत कलावंत आपल्या अभूतपुर्व कलेतून आपल्या भारताचं नावं जगाच्या इतिहासात कोरत असतात. आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील विश्वविक्रमवीर, 'आबासाहेब शेवाळे' हेही त्यापैकी एक. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने १५ मार्च २०१९ रोजी २०१८-१९ च्या सर्वोत्कृष्ट १०० मधे आबासाहेब शेवाळेंची निवड केली आली आहे. 'आबासाहेब शेवाळे' ह्यांनी यापूर्वी तीन विश्वविक्रम केले आहेत.

आबासाहेब हे पुशपिन्सपासुन मोझेक पोट्रेट बनवण्यात सुप्रसिद्ध आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांचे त्यांनी पुशपिन्सपासुन मोझेक पोट्रेट बनवले आहेत ज्यात महेंद्रसिंग धोनी, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि अनेक दिग्गजांचा सहभाग आहे. त्यांच्या ह्या पुशपिन्स पोट्रेटसची नोंद लिम्का बुकमधे नोंदवली आहे. ह्याशिवाय त्यांनी कागदी पिशव्यांपासुन बनवलेल्या शिवाजी महाराजांच्या मोझेक पोट्रेटला युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स मधे स्थान मिळालंय. ऑक्टोबर २०१८ मध्ये विराट कोहलीच्या सर्वात मोठ्या मातीच्या पणत्यांपासून बनवलेल्या मोझेक पोट्रेटची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे.

आता आबासाहेब शेवाळे आणि त्यांची टीम सज्ज झाली आहे आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्ड्ससाठी!! यावेळी त्यांनी चक्क बुद्धिबळाच्या सोंगट्यांपासून एक अद्वितीय कलाकृती साकारायचं अवघड काम हाती घेतलंय. या नव्या भव्यदिव्य मोझेक पोट्रेटसाठी तेवढ्याच भव्यदिव्य माणसाची निवड झाली आहे. ती व्यक्ती म्हणजे आपला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी.

निमित्त आहे वर्ल्डकपचं. एकापाठोपाठ एक सामने जिंकत आपली भारतीय टीम सेमीफायनल मध्ये जाऊन धडकली आहे. याखेरीज येत्या ७ जुलै रोजी आपल्या माहीचा वाढदिवस देखील आहे. असे दोन्ही औचित्य साधुन त्याला शुभेच्छा देण्यासाठी ही कलाकृती साकारण्यात येणार आहे.

ही कला सादर करण्यामागे आबासाहेब शेवाळे  ह्यांच्यासोबतच मोलाचे सहकार्य वर्ल्ड  रेकॉर्ड् होल्डर आर्टिस्ट चेतन राऊत, मुकेश साळुंखे, संदीप बोबडे याचबरोबर ऋषिकेश झगडे, ऋषिकेश माने, मिलिंद भुरवणे, स्वप्निल खाडे, रुपेश तांडेल, अशा अजुन 22 मुलांनी दिवस रात्र कंबर कसून सुमारे 13 दिवस मेहनत घेतली आहे.

सुमारे १,४१,००० लाल, काळ्या, फिकट पांढ-या, निळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा विविध रंगांच्या सोंगट्यांचा वापर केला गेला आहे. तसेच ह्या पोट्रेटची लांबी 30 फुट आणि रूंदी 20 फुट आहे. ह्या अद्वितीय कलाकृतीसाठी  वेगवेगळ्या क्षेत्रातील 30 हून अधिक कलाकारांनी त्यांचं स्वत:चं कसब पणाला लावुन ते पुर्णत्वास नेण्यास संपुर्ण प्रयत्न केलेत.

बुद्धीबळ...मन शांत ठेवुन डोक्याने खेळला जाणारा खेळ. ज्यासाठी स्थिर बुद्धी आणि एकाग्र चित्त ठेवावं लागतं. प्रतिस्पर्ध्याला गाफील ठेवून त्याला शह देऊन त्याच्यावर मात करणे हा ह्या खेळाचा मुख्य उद्देश्य असतो. पण तुम्हाला माहीतेय का बुद्धीबळामधे आपण जसं शह आणि मात देऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचा आवडता खेळ क्रिकेटमधेही पायचीत करू शकतो, तेही समोरच्या खेळाडूला गाफील ठेवुन! बुद्धीबळ आणि क्रिकेटमधील हे मुख्य साधर्म्य आहे! अनेक क्रिकेट खेळाडूंना स्टंप च्या मागून चेकमेट करणारा 'माही' हा असंख्य क्रिकेट प्रेमीच्या गळ्यातील ताईत आहे. क्रिकेटच्या शिरपेचातील मनस्वी  राजाला आबासाहेब शेवाळेंनी दिलेली  ही मानवंदना!

स्थळ: कोरम मॉल, ठाणे पश्चिम.

पूर्ण आर्टवर्क सादरीकरण दिनांक: 01 जुलै  2019 ते 14 जुलै 2019

वेळ: सकाळी १० ते रात्री १०.