जिनिव्हा करार काय आहे ? या कराराप्रमाणे अभिनंदन वर्तमानला कसं वागवण्यात यायला हवं ?

काल दिवसभराच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच, नव्हे, आम्हाला खात्री आहे की तुम्ही कान देऊन ऐकल्याच असतील. आपल्या हवाई दलाच्या कोसळलेल्या मिग 21 च्या वैमानिकाला 'अभिनंदन वर्तमान'ला पाकिस्तानाने ताब्यात घेतले आहे. त्याच्या सुटकेचा मोठा प्रश्न भारतासमोर आहे. भारत सरकारने त्याची सुखरूप सुटका व्हावी असे पाकिस्तानी उच्चायुक्तांना सांगितले आहे आणि सोबत दोन्ही देशांना जिनिव्हा करार लागू होतो आहे असेही वारंवार बजावले आहे.
काय आहे जिनिव्हा करार ?
जिनीव्हा करार म्हणजे त्या शहराचा काहीतरी संदर्भ या करारात असणार हे झालेच पण आम्हा भारतीयांना जिनीव्हा कराराचे मूळ आमच्याच इतिहासात सापडेल कदाचित !!
आठवा तो शाळेच्या पुस्तकातला सिकंदर आणि पौरसाचा धडा ! पौरस सिकंदराचा युध्दकैदी होता आणि जेव्हा त्याला विचारले गेले " तुला कसे वागवावे " तेव्हा पौरसाचे उत्तर होते की " एक राजा दुसर्या राजाला जसे वागवेल तसे " !!
जिनीव्हा करार युध्दबंद्यांना कसे वागवावे, या प्रश्नाचे उत्तर ही असेच देतो "युध्दबंदी माणूस आहे, त्याला माणसासारखेच वागवावे ?”
(हेन्री दुनांट)
जिनीव्हा कराराचा उगम झाला आहे मेमरीज ऑफ सोल्फेरानो या ‘हेन्री दुनांट’ या व्यापाऱ्याने लिहिलेल्या पुस्तकातून !! १८५८ ते १८६२ च्या दरम्यान इटलीत झालेल्या एका महाभयंकर युद्धानंतर. युद्धभूमीवर तळमळत पडलेल्या सैनिकांचे हाल बघून ‘हेन्री दुनांट’च्या मनात अतीव करून दाटून आली आणि त्यातूनच पुढे या पुस्तकाचा जन्म झाला. या पुस्तकातल्या संकल्पना इतक्या गाजल्या की त्यातूनच पुढे जिनिव्हा परिषद (करार) आणि आंतरराष्ट्रीय रेड-क्रॉस सोसायटीचा जन्म झाला.
या विचारधारेतून २२ ऑगस्ट १८६४ रोजी स्वित्झर्लंड सरकारने अनेक युरोपियन आणि अमेरिकन देशांची एक परिषद भरवली. या परिषदेत सामील झालेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांनी पहिल्या जिनिव्हा कराराचा मसुदा बनवून त्यावर सह्या केल्या.
त्यानंतर या मसुद्या मध्ये वेळोवेळी भर टाकण्यात आली. उदाहरणार्थ, १९०६ साली ३५ देश या करारात सामील झाले. अशा ४ परिषदा आणि त्यात मंजूर झालेले करार सोबत ३ शिष्टाचाराचे मसुदे जोडण्यात आले. या संपूर्ण कराराला जिनिव्हा करार असे समजले जाते.
हा करार काही देशांनी पूर्णतः अंगिकारला आहे, तर काही देशांनी शिष्टाचाराचे काही मसुदे स्वीकारले आहेत किंवा गाळले आहेत. सद्य परिस्थितीत भारत आणि पाकिस्तान यांनी ४ जिनिव्हा करार अंगीकृत केले आहेत, पण शिष्टाचाराचे मसुदे मान्य केलेले नाहीत.
सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की जिनिव्हा करार हा फक्त युद्धात पकडलेल्या युद्धबंद्यांच्या बाबतीत वापरला जातो. अतिरेकी कारवायात अटक करण्यात आलेल्या कैद्यांना जिनिव्हा करार लागू होत नाही. उदाहरणार्थ, अभिनंदन वर्तमान या वैमानिकाला जिनिव्हा कराराप्रमाणे वागणूक देणे बंधनकारक आहे. कसाब सारख्या अतिरेक्याला किंवा भविष्यात अजहर मसूद सारखा अतिरेकी भारताच्या तावडीत सापडला तर जिनिव्हा करार लागू होणार नाही.
जिनिव्हा करारानुसार अभिनंदन वर्तमानला कसं वागवण्यात यायला हवं ?
या करारानुसार अटक केलेल्या युद्धकैद्यानी त्याचे नाव आणि सर्व्हिस नंबर इतकीच माहिती शत्रू सैन्यापुढे द्यायची असते. यानंतर उच्च लष्करी अधिकाऱ्यापुढे युद्धकैद्याला हजार करून त्यानंतर त्याची रवानगी हॉस्पिटल मध्ये केली जाते. वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा अहवाल बनवला जातो आणि पुढील बोलणी होईपर्यंत त्याला तुरुंगात ठेवले जाते.
भारताची भरीव कामगिरी
१९७१ च्या भारत पाकिस्तानच्या युद्धानंतर पाकिस्तानचे जवळजवळ १,००,००० सैनिक भारताच्या ताब्यात होते. जिनिव्हा करारानुसार भारताने त्यांचे संरक्षण केले. सिमला करारानंतर या सर्वांना सुरक्षितपणे आणि सन्मानाने पाकिस्तानात रवाना करण्यात आले. भारताची जबाबदारी केवळ इतकीच मर्यादित नव्हती. बांगलादेश मधील मुक्तीसेनेपासून पाकिस्तानी युद्धकैद्यांना संरक्षण देण्याचं कार्यही भारताने केलं होतं. आशिया खंडात भारत हा असा एकच देश असावा ज्याने युद्धा दरम्यान संपूर्ण मानवी अधिकाराचे पालन केले आहे.
आता पाहूयात युद्धाचे १० प्रमुख नियम.
१. सामान्य नागरिक, वैद्यकीय मदत देणारे आणि मदत कार्य करणारे यांचे संरक्षण करावे.
२. जखमी सैनिक किंवा कैदी यांचे संरक्षण ही त्या त्या देशाची जबाबदारी आहे.
३. सामान्य नागरिकांना लक्ष्य करून त्यांना त्रास देणे, मारणे, हल्ला करणे हा वॉर क्राईमच्या (युद्ध गुन्हेगारी) अंतर्गत धरला जाईल.
४. सामान्य नागरिकांचा जीव वाचवणे त्यांच्या घरादाराचे संरक्षण करणे, जीवनावश्यक सोयीसुविधांचे रक्षण करणे.
५. आजारी किंवा जखमी व्यक्ती कोणत्याही देशाच्या असोत, त्यांना मदत करणे अनिवार्य आहे.
६. वैद्यकीय पथक डॉक्टर, नर्सेस, हॉस्पिटल, अॅम्ब्युलन्स यावर कोणताही देश हल्ला करणार नाही.
७. युद्धबंद्यांचा छळ किंवा त्यांना हीन दर्जाची वागणूक देणे हे या कराराला मान्य नाही.
८. कैद्यांना अन्नपाणी वेळेवर मिळणे आणि त्यांच्या जिवलगांशी संपर्क साधण्यास मदत करणे.
९. युद्धात वापरल्या जाणाऱ्या शस्त्रास्त्रांवर आणि रणनीतीवर बंधने घालणे. उदाहरणार्थ, WMD (Weapon of mass destruction) म्हणजे अण्वस्त्र, विषारी वायू, जैविक शस्त्रांचा वापर न करणे.
१०. युद्धादरम्यान बलात्कार किंवा कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार न करणे.
आतापर्यंत मिळालेल्या बातमीनुसार अभिनंदन वर्तमानला जिनिव्हा कराराप्रमाणे वागणूक मिळत आहे. परंतु त्याची सुटका पुढे होणाऱ्या राजकीय वाटाघाटींवर अवलंबून असेल.