जगातली पहिली वेंडिंग मशीन तब्बल २००० वर्षापूर्वी तयार झाली होती??

मंडळी, वेंडिंग मशीन आता सगळीकडे दिसते. म्हणजे आत योग्य त्या किंमतीचं नाणं टाकलं की हवी ती वस्तू मशीनमधून खाली पडते. तुमच्या ऑफिसमध्ये असलेली कॉफी मशीन पण एक वेंडिंग मशीनच आहे. याखेरीज सार्वजनिक ठिकाणी सॉफ्ट ड्रिंक, चहा, स्नॅक्स विकत देण्यासाठी वेंडिंग मशीन्स ठेवलेल्या असतात. वेंडिंग मशीनमुळे माणसाचं काम कमी होतं आणि ग्राहकालाही झटपट वस्तू मिळते.
मंडळी, आजच्या लेखात आपण वेंडिंग मशीनचा इतिहास जाणून घेणार आहोत. हा इतिहास आहे तब्बल २००० वर्षापूर्वीचा. चला तर इजिप्तला जाऊया.
२००० वर्षापूर्वी म्हणजे इसवीसनाच्या पहिल्या शतकात एक इंजिनियर महाशय होऊन गेले. त्यांच नाव होतं हिरो ऑफ अलेक्झांड्रिया (Heron of Alexandria). त्यांना हिरो म्हणूनच जग ओळखतं. त्यांनी त्याकाळी बऱ्याच नवनवीन गोष्टींचा शोध लावला होता. मंदिरासाठी ऑटोमॅटिक दरवाजे, आग लागल्यावर पाणी सोडणारे यंत्र, एवढंच काय त्याने वाफेचं इंजिन बनवण्याचा उद्योगही केला होता. त्याने लावलेल्या महत्वाच्या शोधांमध्ये जगातल्या पहिल्या वेंडिंग मशीनचा पण समावेश होतो.
त्याकाळी इजिप्तच्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी हातपाय धुण्याची पद्धत होती. यासाठी लागणारं पाणी पुजारी द्यायचा, पण प्रत्येक भक्ताला पाणी देणं वेळखाऊ होतं आणि पुजाऱ्यासाठी अडचणीचं होतं. पुढे चालून हे पाणी मंदिराच्या दारावर ठेवलं जाऊ लागलं. लोक स्वतःहून पाणी घेत. पण झालं असं की लोक प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापरत आणि पाण्याचा अपव्यय होई.
आपल्या ‘हिरो’ने या समस्येला झटक्यात सोडवलं. त्यांनी एक अशी मशीन तयार केली जिच्यात नाणं टाकल्यानंतर एका ठराविक प्रमाणात पाणी बाहेर यायचं. ठराविक प्रमाण पूर्ण झाल्यावर पाणी आपोआप बंद व्हायचं. हीच मशीन आजच्या सगळ्या वेंडिंग मशीनची पूर्वज आहे.
मंडळी, आजच्या सारखा त्याकाळी पेटेंट हा प्रकार नव्हता, त्यामुळे हिरो ऑफ अलेक्झांड्रिया यांचं नाव या मशीनसोबत रजिस्टर्ड नाहीय. मात्र इतिहासाची पाने चाळल्यावर त्यांच्याविषयी माहिती मिळते.