f
computer

१०० वर्षांपूर्वीचं प्रेत चक्क डोळे उघडतं म्हणे... विज्ञानाने उलगडलं कोडं !!

इटलीच्या सिसिली भागातल्या भूगर्भात एका मुलीचा मृतदेह जतन करून ठेवण्यात आला आहे. या मुलीचा मृत्यू १९२० साली म्हणजे आजपासून १०० वर्षापूर्वी झाला होता. तिचा मृतदेह एवढ्या चांगल्या प्रकारे जतन करण्यात आलाय की ती १०० वर्षापूर्वी होऊन गेली यावर सहजासहजी विश्वास बसणार नाही.

पण ती या गोष्टीसाठी प्रसिद्ध नाही. तर, या भागाला भेट देणारे लोक म्हणतात की तिच्या चेहऱ्याकडे फार काळ बघत राहिल्यास तिच्या डोळ्यांची उघडझाप होते. हा भुताटकीचा प्रकार वाटतो ना ? पण विज्ञानाने याचं उत्तर शोधलं आहे.

हे उत्तर जाणून घेण्यापूर्वी या मुली विषयी जाणून घेऊया.

या मुलीचं नाव आहे रोसालिया लोम्बार्डो. तिला अवघं २ वर्षाचं आयुष्य मिळालं. न्यूमोनियाने तिचा जीव घेतला. या गोष्टीचं मारिओ लोम्बार्डो म्हणजे तिच्या वडिलांना फारच दुःखं झालं. त्यांनी आपल्या मुलीला दफन करण्याऐवजी त्या काळातल्या प्रसिद्ध अशा Embalmer (मृतदेह जतन करणारा तज्ञ) कडून तिच्या मृतदेहाचं जतन करून घेतलं.

हा Embalmer होता अल्फ्रेडो सालाफिया. मृतदेहांना योग्यरीतीने जतन करण्यात त्याचा हातखंडा होता. यासाठी तो इतिहासात इतका प्रसिद्ध आहे की त्याच्या नावाचं आपल्याला विकिपीडिया पेजही मिळतं.

तर या अल्फ्रेडो सालाफियाने रोसालियाच्या मृतदेहाला एका खास रसायनाने जतन केलं. त्याचं उत्कृष्ट काम आपण पाहू शकतोच. या खास रसायनाने ती आजही जशीच्या तशी दिसते. सिसिली भागात या ममीला “स्लीपिंग ब्युटी” म्हणतात.

रोसालियाच्या कथेभोवती भुताटकी निर्माण होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे तिला जतन करण्यासाठी वापरण्यात आलेलं रसायन. २००९ पर्यंत विज्ञानाला अल्फ्रेडोने वापरलेल्या रसायनाचा पत्ता लागला नव्हता. अल्फ्रेडोने स्वतःच्या हातांनी लिहिलेल्या वृतांतात हा फॉर्म्युला आढळला. त्याने फॉरमॅलीन, झिंक लवण, अल्कोहोल, सॅलिसिक ऍसिड आणि ग्लिसरीनचं मिश्रण वापरलं होतं.

तिच्या डोळ्यांचं रहस्य

आता वळूया आपल्या मुद्द्याकडे. विज्ञान म्हणतं की रोसालियाचे उघडझाप करणारे डोळे फार काही नसून दृष्टीभ्रम आहे. तिला ज्या काचेच्या पेटीत ठेवण्यात आलंय तिथे प्रवर्तित होणाऱ्या प्रकाशामुळे तिचे डोळे उघडलेले वाटतात. खरी गोष्ट तर अशी आहे की तिचे डोळे अर्ध्या उघडलेल्या अवस्थेत आहेत. प्रकाशाच्या स्थितीनुसार तिच्या पापण्या हलल्याचा भास होतो.

तर मंडळी, हे विज्ञान सांगतं, पण लोकांचा यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. तुम्हाला काय वाटतं ?

 

 

आणखी वाचा :

पापण्यांची उघडझाप तुमच्याबद्दल काय सांगत असते ?? जाणून घ्या विज्ञानाचं उत्तर !!

सबस्क्राईब करा

* indicates required