computer

गोष्ट भारतातल्या प्लेगवर लस शोधणाऱ्या आणि त्यासाठी स्वतःवरच प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञाची!!

अठराव्या शतकाच्या शेवटी जेव्हा आजच्यासारखी जेट विमानं नव्हती, तेव्हा हजारो मैल दूर अंतरावरून कोण कुठला युक्रेनमधला एका शिक्षकाचा मुलगा रशियातून बाहेर पडून पॅरीसला लुई पाश्चरच्या हाताखाली शिक्षण काय घेतो,भारतात येऊन लाखो लोकांचे जीव काय वाचवतो, पदरी लांच्छन घेऊन युरोपात माघारी काय जातो आणि अंगावर आलेलं किटाळ खोटं आहे हे सिध्द करून पुन्हा भारतातल्या प्लेगच्या रोग्यांना वाचवायला भारतात काय परत येतो.. ही सगळी कहाणी एखाद्या हिंदी सिनेमात शोभेल अशी आहे असं नाही वाटत तुम्हाला? 

पण वाचकहो, ही एक सत्यकथा आहे आणि सध्याच्या 'कोरोनाग्रस्त' जगाने वाचावीच अशी आहे! चला तर आज पुन्हा एकदा ओळख करून घेऊ या 'हाफकीन इन्स्टिट्यूट' च्या डॉ. वाल्डेमार हाफकीन यांच्या समर्पित आयुष्याची!

डॉ. हाफकीन यांचा जन्म १८६० साली युक्रेनच्या एका ज्यू कुटुंबात झाला. इथे ज्यू हा उल्लेख का केला आहे असा जर प्रश्न मनात आला असेल तर,  त्याचे कारण असे की जगभर पसरलेल्या ज्यूंना त्याकाळी अनेक संकटांचा सामना करावा लागायचा. विशेषतः स्थानिक लोकांच्या द्वेषाला सामोरे जावे लागायचे. 'पोग्राम' म्हणजे झुंडशाहीला सामोरे जावे लागायचे. अशा वातावरणात वाढलेल्या डॉ. हाफकीन यांना अगदी नावापासून सुरुवात करून अनेक बदल आयुष्यात करावे लागले. रशियात स्थायिक असल्याने त्यांचे मूळ नाव रशियन शैलीचे व्लादिमीर आरोनोवीच खावकीन (च्यावकीन)असे होते. युरोपात शिक्षणासाठी आल्यावर ते झाले वाल्डेमेर हाफकीन!!

(बालपण)

डॉ. हाफकीन यांचे सुरुवातीचे  संशोधन एकपेशीय सूक्ष्म जीवाणूंवर होते. त्यांच्या या क्षेत्रातील कामगिरीमुळे युग्लेनीड जीनस च्यावकीनीआ या एकपेशीय जीवाणूच्या नावासोबत 'च्यावकीनीआ' हे विशेषण जोडले गेले. ते दिवस रशियातल्या राजकीय धामधुमीचे होते. तत्कालीन झारची हत्या झाल्यावर रशियात बुध्दीजीवी लोकांवर संक्रांत आली. हाफकीन यांना कशीबशी स्थलांतराची परवानगी मिळाली आणि ते रशियाबाहेर पडून स्वित्झर्लंडला पोहचले. थोड्याच दिवसात त्यांना नव्याने स्थापन झालेल्या लुई पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला. पण विद्यार्थी म्हणून नव्हे, तर लायब्ररीयन म्हणून!! काही काळातच संशोधनात भाग घेण्याचीही त्यांना संधी मिळाली.

त्या काळचे जग वारंवार येणार्‍या कॉलर्‍याच्या साथीने त्रस्त होतं. जर्मन शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉश यांनी कॉलर्‍याच्या जंतूंचा शोध लावला होता. पण लस बनवण्यात त्यांना पुरेसे यश मिळाले नव्हते. डॉ. हाफकीन यांनी कॉलर्‍याची लस बनवली. पण प्रश्न होता की ती वापरायची कोणावर? शेवटी ती लस स्वतःलाच टोचून घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. काही दिवसांतच हे सिध्द झालं की हाफकीन यांची लस कॉलर्‍याला रोखू शकते. या बातमीने वैद्यकीय जगात खळबळ निर्माण झाली. पण हाफकीन यांचे गुरू आणि वरिष्ठ सहकारी मेश्नीकॉव्ह आणि लुई पाश्चर हे दोघेही त्यांच्या यशाबद्दल साशंक होते. साहजिकच त्यावेळच्या युरोपियन वैद्यकीय जगताने पण फारशी दखल घेतली नाही. आता एकच मार्ग शिल्ल्क होता तो म्हणजे ही लस यशस्वीरित्या काम करते आहे हे सिध्द करण्यासाठी जेथे वारंवार कॉलर्‍याची साथ येते अशा देशात जाणे आणि त्यावेळी असा देश म्हणजे भारत!

भारतात येण्यासाठीसुध्दा हाफकीन यांना बर्‍याच खटपटी कराव्या लागल्या. शेवटी एका ब्रिटिश उमरावाच्या मदतीने त्यांना भारतात प्रवेश मिळाला. 

प्रवेश मिळाला खरा, पण लशीचे उत्पादन करणार कुठे आणि कसे हा एक प्रश्न होताच. पण नेमकी तेव्हा कलकत्त्याला कॉलर्‍याची साथ जोरात होती. डॉ. हाफकीन कलकत्त्याला पोहचले. सुरुवातीला या लशीबद्दल जरा साशंकता होती. पण काही दिवसांतच या लशीचे फायदे लोकांच्या लक्षात आले. साथ आटोक्यात आली. ही साथ संपते ना संपते तोच १८९६/९७ साली मुंबईत प्लेगची साथ जोरात सुरु झाली. मुंबईच्या गव्हर्नरने हाफकीन यांना तातडीने बोलावून घेतले. 

ते मुंबईत आले. पण तोपर्यंत ब्युबॉनीक प्लेगची लस कोणीच बनवली नव्हती. डॉ. हाफकीन यांना कॉलर्‍याचा अनुभव होता. पण प्लेगसाठी संशोधन करून लस बनवण्यापासून तयारी करावी लागणार होती. शेवटी ग्रँट मेडीकल कॉलेजच्या एका कोपर्‍यात प्रयोगशाळा उभी राहीली. तीन महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर लस तयार करण्यात त्यांना यश आले. हा तीन महिन्यांचा काळ अत्यंत तणावाचा होता. त्यांचे दोन मदतनीस कामाच्या रेट्यामुळे पळून गेले, तर एक मानसिकरित्या खचून गेला. सरतेशेवटी १८९७ च्या जानेवारी महिन्यात प्लेगवर नियंत्रण करू शकेल अशी लस तयार झाली. पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला, ही लस टोचून घेणार कोण? पुन्हा एकदा डॉ. हाफकीन यांनी स्वतःवरच पहिला प्रयोग करण्याचे निश्चित केले. पहिली लस त्यांनी टोचून घेतली. आता जेलमधल्या काही कैद्यांवर प्रयोग करण्याचे ठरवले गेले, काही अपवाद वगळता सर्वच स्वयंसेवक कैद्यांना लस लागू पडली. 

आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की प्रयोगाच्या प्रत्येक पायरीवर अडथळे येत गेले. वैद्यकीय जगताचा अविश्वास, प्रयोग करण्याच्या साधनांचा अभाव, अथक परिश्रम आणि मानसिक तणाव या सगळ्याचा सामना करत डॉ. हाफकीन यांचे संशोधन चालूच राहिले. याच दरम्यान त्यांच्या कॉलर्‍याच्या लशीची किर्ती रशियापर्यंत पोहचली होती, पण रशियन सरकार हाफकीनवर नाखूश होते. तरीपण हाफकीन यांना शोधत दोन रशियन डॉक्टर भारतात पोहचले. लस बनवण्याची पध्दत शिकून ते रशियाला पोहचले. रशियामधल्या कॉलर्‍यांच्या रुग्णांना एक मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर ही लस रशियात लिंफा हॅवनीका (रशियन भाषेत 'फ'च्या जागी 'व' येतो) नावाने प्रसिध्द झाली.

यानंतर मात्र डॉ. हाफकीन यांच्या उपचारांना जनतेकडून प्रतिसाद मिळायला लागला. सर सुलतान शहा म्हणजे तिसरे आगाखान या खोजा मुस्लीम गृहस्थांनी त्यांच्या तात्पुरत्या प्रयोगशाळेला खूश्रू लॉज हा भायखळ्याचा बंगला वापरायला दिला. प्रयोगशाळा उभी करून दिली. हजारो आगाखानी मुस्लीमांनी डॉ. हाफकीन यांची लस टोचून घेतली. 

ज्या वाचकांना हाफकीन इंस्टीट्यूट परळला आहे हे माहिती आहे, त्यांना प्रश्न पडला असेल की भायखळ्याची प्रयोगशाळा परळला कधी आली? त्यामागे पण एक रंजक इतिहास आहे. आज परळला जेथे हाफकीन आहे तेथे आधी मुंबईचा गव्हर्नर राहत असे. सातवा एडवर्ड जेव्हा भारत भेटीस आला, तेव्हा आठवडाभर या बंगल्यातच वास्तव्याला होता. आजही या इमारतीत जुना दरबार हॉल बघायला मिळतो. पण त्यानंतर वारंवार येणार्‍या कॉलर्‍याच्या साथीत एका गव्हर्नराची पत्नी मरण पावल्यावर गव्हर्नराचा बंगला मलबार हिलला बांधण्यात आला. हे रिकामे झालेले गव्हर्नर हाऊस १८९९ डॉ.  हाफकीन यांच्या प्रयोगशाळेला देण्यात आले. या प्रयोगशाळेचे प्लेग रीसर्च लॅबोरेटरी असे नामकरण करण्यात आले. पुढची तीन वर्षे या प्रयोगशाळेत हाफकीन यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज सुरु झाले, पण पुन्हा एकदा दैवाने दगा दिला आणि डॉ हाफकीन यांना इंग्लंडला परत जावे लागले. 

त्याचं असं झालं की १९०२ साली भारतातल्या एका खेड्यात हाफकीन यांनी बनवलेली लस टोचल्यावर १९ नागरिक धनुर्वाताने मरण पावले. हा दोष या लशीचा आहे असे गृहित धरून एक चौकशी आयोग नेमण्यात आला. हाफकीन यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना प्लेग रीसर्च लॅबोरेटरी सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले. त्यांना भारत सोडून जावे लागले. मधल्या काळात डॉ. लिस्टर यांनी पुन्हा नव्याने या प्रकरणाची चौकशी केली. हाफकीन यांच्या सहाय्यकाने योग्य काळजी न घेतल्याने लस दूषित झाली आणि त्यामुळे १९ जणांचा मृत्यू झाला हे सिध्द झाले. १९०७ साली अनेक शास्त्रज्ञांनी पण हाफकीन निर्दोष असल्याची ग्वाही दिली आणि हाफकीन निर्दोष असल्याचे सिध्द झाले. पण परळच्या प्रयोग शाळेत जागा नसल्याने ते कलकत्त्याला गेले आणि आपल्या संशोधनात रममाण झाले. १९१४ साली निवृत्त होऊन ते कायमचे स्वित्झर्लंड येथे स्थायिक झाले.

१९२५ साली परळच्या प्लेग रीसर्च इन्स्टिट्यूटचे नामकरण हाफकीन इन्स्टिट्यूट असे करण्यात आले.  हाफकीन इन्स्टिट्यूट आज जगातील अव्वल दर्जाची प्रयोगशाळा मानली जाते. या संस्थेत आता केवळ लशीचे उत्पादन होते असे नाही, तर सर्पदंशावरची सर्व औषधे इथेच बनतात. भारत सरकारने १९६४ साली त्यांचा स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. 
वाचकहो, एखाद्या आजाराच्या औषधामागे किती तपस्या असते हे सांगण्याचा या लेखाचा उद्देश आहे.

मनुष्यप्राण्यावर गेली हजारो वर्षे विविध आजारांनी आक्रमण केले. प्रत्येक आक्रमण निवारण्यासाठी देवदूत पण आपल्या वाट्याला आले. काय सांगावं, असाच एखादा देवदूत येईल आणि आपल्याला करोनापासून संसक्षण देईल!! तुम्हाला काय वाटतं ते जरूर सांगा!!

सबस्क्राईब करा

* indicates required