computer

शास्त्रज्ञ चक्क ‘शी’ डोनेट करायला का सांगत आहेत भौ ?

आजवर आपण रक्तदान, अवयवदान, देहदान आणि नेत्रदान  याबद्दल ऐकले होते.  विकी डोनर पाहून आपण स्पर्म डोनेशनबद्दलही जागरूक झालो होतो. पण आज एक भन्नाट प्रकार आम्ही घेऊन आलो आहोत. या प्रकारचे नाव आहे विष्ठादान. आता शी ला विष्ठा म्हटलं म्हणून ती काही पवित्र होत नाही.  काय किळस आली म्हणता?? अहो, आधी समजून तर घ्या ना, विष्ठादान  काय प्रकार आहे आणि कशासाठी वापरली जाते तुमची विष्ठा.. 

तर काय आहे मंडळी, तुम्ही दान केलेली विष्ठा ही एका चांगल्या कामासाठी वापरली जाणार आहे. आता आपले सायंटिस्ट लोक नेहमी काही तरी नवनवे शोध लावत असतात. तर त्यांनी एक नवीन उपचार पद्धती शोधून काढली आहे. या उपचार पद्धतीत आतड्यांमध्ये असलेल्या विकारांवर उपचार म्हणून, चांगले बॅक्टरिया असलेली विष्ठा वापरली जाणार आहे.

तसा हा प्रकार किळसवाणा वाटू शकतो. पण यामुळे खरंच जर एखादा रुग्ण बरा होत असेल तर काय वाईट आहे? तुम्ही जर विचार करत असाल की आजपासून परसाकडला जाताना एक बाटली घेऊन जाऊया आणि स्वच्छ भारत अभियानात सामिल होऊ या, तर थांबा. तुमच्या-माझ्यासारख्या सोम्यागोम्याची विष्ठा या प्रयोगासाठी चालणार नाही. तर यासाठी परफेक्ट विष्ठा मिळणे आवश्यक असते. आपल्या आतड्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया/bug  असतात. हा प्रकार प्रत्येक माणसांसाठी वेगळा असतो. चांगल्या बॅक्टरिया असलेल्या विष्ठेचे प्रत्यारोपण करून खूप काळापासून बरे न झालेले असे पोटाचे आणि आतड्याचे विकार बरे केले जाऊ शकतात.

 

(विष्ठेचे प्रत्यारोपण)

तशी ही उपचार पद्धती एकदम नवीन आहे. पण आजवर झालेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये केलेल्या प्रयोगांचे निकाल उत्तम आहेत. पुढे चालून ही पद्धती अधिक सक्षम करण्याचा डॉक्टर लोकांचा प्रयत्न आहे. तर मग मंडळी, या विष्ठादानाची डिमांड दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. मग तुमच्या-पैकी कोणकोण सुपर-पू डोनर व्हायला तयार आहात???

 

 

आणखी वाचा :

बिल गेटस यांनी 'शी'ने भरलेली बरणी स्टेजवरून का दाखवली ??

अशी असते अंतराळात टॉयलेटची व्यवस्था !!

सबस्क्राईब करा

* indicates required