एबी डिवीलीयर्सच्या जर्सीवर त्याच्याऐवजी चक्क एका भारतीयाचं नाव? कोण आहे तो पठ्ठ्या?

आयपीएलचा हंगाम सुरू झाला आहे. तीन मॅचेसही होऊन गेल्या. पहिल्या मॅचनंतर चेन्नईच्या विजयाने चेन्नई समर्थक आनंद व्यक्त करत आहेत, तर मुंबई समर्थक आम्ही दरवर्षी पहिली मॅच देवाला देतो म्हणत आहेत. मिम्स, जोक्सचा पाऊस सुरू झाला आहे.
पण या सर्वांमध्ये एबी डिवीलीयर्सने मात्र सर्वांचे लक्ष स्वतःकडे खेचून घेतले आहे. त्याने ट्विटरवर एक फोटो पोस्ट केलाय. फोटोत त्याने अर्थातच त्याच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीमची जर्सी घातली आहे. पण यात त्याच्या नावाच्या जागी चक्क परितोष पंत असे नाव दिसत आहे. साहजिकच सर्वांना आश्चर्य वाटेल, डिव्हीलियर्सने भारतात स्थायिक व्हायचा निर्णय घेतला की काय? असे देखील वाटू शकते. पण भारतात स्थायिक होण्यासाठी नाव बदलण्याची गरज नाही.
सर्वांचा लाडका डिव्हिलियर्स लोकांना 'एबीडी' म्हणूनच आवडतो. पण या नाव बदलामागील कारण जाणून घेतल्यानंतर एबीडीबद्दल असलेला सर्वांचा आदर दुणावेल. डिवीलीयर्सच्या जर्सीवर नाव झळकलेला परितोष पंत हा कोविड योद्धा आहे. त्याने लॉकडाऊन काळात गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे महत्वाचे काम केले होते. त्याच्याबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी अबीडीने जर्सीवर त्याचे नाव घेतले आहे. एवढंच नाही तर त्याने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम हँडलचं नाव बदलून 'परितोष पंत' ठेवलं आहे. ट्विट करून त्याने परितोष पंत यांच्या कार्याला सलाम केला आहे.
I salute Paritosh,who started ‘Project Feeding from Far’ with Pooja & fed meals 2 needy during the lockdown. I wear his name on my back this season 2 appreciate their challenger spirit
— Paritosh Pant (@ABdeVilliers17) September 20, 2020
Share your #MyCovidHeroes story with us#WeAreChallengers #RealChallengers#ChallengeAccepted
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर टीमने #mycovidheroes उपक्रम सुरू केला आहे. कोरोना काळात महत्वाचे योगदान देणाऱ्या कोविडयोध्दयांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा हा उपक्रम आहे. खेळाडूंच्या जर्सीवर कोविड योध्यांची नावे असलेली जर्सी आयपीएल मॅच आणि प्रॅक्टिस मॅच दोन्ही वेळी घालणे हा देखील या उपक्रमचाच एक भाग आहे.