computer

बार्बी डॉलने मुंबईच्या मानसी जोशीच्या सन्मानार्थ बाहुली आणलीय? काय आहे मानसीची कहाणी?

बार्बी डॉल... तिने फॅशन आयकॉन म्हणून पाच दशके गाजवली. ‘अटकर बांधा, गोरा गोरा खांदा’ अशी बार्बी सुरवातीची बरीच वर्षे कचकड्याच्या बाहुलीसारखी होती. पण ती जगभरातल्या मुलींच्या दृष्टीने केवळ एक बाहुली नाही, तर मैत्रीण आणि मार्गदर्शकही आहे. ती किशोरवयातल्या मुलींच्या स्वप्नांचं, आकांक्षाचं मूर्त रूप आहे.

बार्बी हे ‘टीन एजर्स मॉडेल’ असल्याने तिच्या माध्यमातून मुलींना मुली सर्व क्षेत्रात पुढं जाऊ शकतात, त्यांचं ‘बाई’ असणं त्यांच्या प्रगतीच्या आड येत नाही हा खूप महत्त्वाचा संदेश दिला गेला. यासाठी बार्बीला डॉक्टर, अंतराळवीर, खेळाडू, शेफ, आर्किटेक्ट म्हणून सादर केलं गेलं. 'यु कॅन बी एनिथिंग' ही बार्बीची टॅगलाईन खूप गाजली. बार्बी आणि कर्तृत्ववान स्त्रिया यांच्यातला हा संबंध कायम राहिला. काही वर्षांपूर्वी बार्बीची निर्मिती करणाऱ्या मॅटेल या कंपनीने कोणत्याही क्षेत्रात विशेष कर्तृत्व दाखवणाऱ्या स्त्रियांचा सन्मान करण्याची एक अनोखी पद्धत सुरू केली. ती म्हणजे त्यांच्यावर आधारलेलं बार्बीचं मॉडेल लॉन्च करणं. मानसी जोशी ही पॅरा बॅडमिंटन प्लेयर नुकतीच या बहुमानाची मानकरी ठरली आहे.

मानसी जोशी मुंबईची. के. जे. सोमय्या कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पूर्ण केलेली. लहानपणापासून आपली बॅडमिंटनची आवड जोपासणारी. अगदी सहा वर्षांची असल्यापासून ती आपल्या वडिलांबरोबर बॅडमिंटन खेळायची. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला एका चांगल्या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरीही मिळाली. सगळं काही सुरळीत चाललं होतं. मात्र २०११ मध्ये झालेल्या एका अपघाताने तिच्या आयुष्याला वेगळंच वळण दिलं. त्या अपघातात तिला आपला एक पाय गमवावा लागला. त्यानंतर त्यातून सावरण्यासाठी तिने पुन्हा बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. त्याच दरम्यान तिची भेट नीरज जॉर्ज या पॅरा बॅडमिंटन खेळाडूशी झाली. त्याने तिला इंडियन पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत भाग घेण्याविषयी सुचवले. थोडी द्विधा झाली तरी तिने स्पेनमधल्या टूर्नामेंटमध्ये भाग घेतला. त्यानंतर मात्र तिने व्यावसायिक स्तरावर पॅरा बॅडमिंटन खेळण्याचं ठरवलं.

त्यानंतर २०१९ मध्ये मानसी जोशीने स्वित्झर्लंडच्या बासेल येथे पॅरा-बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत पहिले महिला एकेरीचं सुवर्णपदक जिंकलं. जून २०१९ पर्यंत मानसी जोशी एसएल 3 एकेरी गटात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होती. तेव्हापासून तिला अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. या सन्मानाने मानसी जोशीची गणना भारतीय आणि जगभरातील प्रेरणादायक महिलांच्या गटात झाली आहे. मानसी जोशीने मिळालेल्या अनुभवांचा उपयोग करून इतर स्त्रिया आणि पॅरा ऍथलिट्सना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बार्बीच्या शीरोजच्या बाहुल्यांच्या मालिकेमध्ये दीपा कर्मकारनंतर ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे.

 

 

लेखिका : स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required