विम्बल्डन: पहा सेरेना विलियम्स ने पहिल्याच फेरीत रडत रडत स्पर्धा सोडली तो क्षण

काही खेळाडू त्यांच्या खेळाच्या चाहत्यांव्यतिरिक्त इतर लोकांमध्येही लोकप्रिय असतात. सचिन तेंडुलकर, रोनाल्डो ही झाली काही उदाहरणादाखल नावे. सेरेना विल्यम्सदेखील टेनिस चाहत्यांव्यतिरिक्त इतर लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र तिच्या फॅन्ससाठी सध्या एक वाईट बातमी आहे.

विम्बल्डन स्पर्धा सुरू झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सेरेना विल्यम्स स्पर्धेतून बाहेर गेली. ७ वेळा चॅम्पियनपद भूषवलेली सेरेना या स्पर्धेत आपला पहिला सामनाही पूर्ण करू शकली नाही. सामना सुरू असताना झालेल्या दुखापतीमुळे तिला सामना अर्धवट सोडावा लागला. अर्ध्यावर सामना सोडावा लागल्यामुळे तिच्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंमुळे मात्र जगभर तिच्याबद्दल लोकांना वाईट वाटत आहे.

सेरेनाचा सामना बेलारूसची अलेक्झांड्रा सासनोविक सोबत होता. सेरेना तिला सहज हरवेल असाच सगळ्यांचा अंदाज होता. पण तिचे नशीब चांगले नव्हते. सेरेनाने दुखापत होऊनही खेळण्याचा प्रयत्न केला, पण ती खेळू शकली नाही. पहिल्याच सेटमध्ये तिने आघाडी घेतली होती. पण फॉरहेड शॉट खेळताना पाय घसरून ती पडली आणि अशाप्रकारे एका जगज्जेत्या खेळाडूला दुर्दैवी पद्धतीने स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

सामना झाल्यावर तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "या पद्धतीने सामना आणि स्पर्धा सोडावी लागणे याबद्दल वाईट वाटत आहे. मैदानावर पाय ठेवताना आणि मैदान सोडताना मी फॅन्सचे प्रेम अनुभवू शकत होते आणि माझ्यासाठी जग जिंकण्यासारखे होते." अशा शब्दात तिने आपले मन मोकळे केले आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required