४००० धावा करत विराट ठरलाय टी -२० क्रिकेटचा किंग! पाहा कोण आहे टॉप -५ फलंदाजांच्या यादीत...

टी -२० क्रिकेटमध्ये आक्रमक फलंदाजी करून सर्वोच्च धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहली प्रथम स्थानी विराजमान आहे. इंग्लंड विरुध्द झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात विराट कोहलीने टी -२० क्रिकेटमध्ये ४ हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तर भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या स्थानी आहे. आज या लेखातून आम्ही तुम्हाला टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप -५ फलंदाजांबद्दल माहिती देणार आहोत. चला तर पाहूया.

विराट कोहली (Virat Kohli):

टी -२० क्रिकेटमध्ये देखील विराट कोहलीची बॅट आग उकळतेय. काही महिन्यांपूर्वी त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरत होती. मात्र आशिया चषक २०२२ स्पर्धेनंतर त्याने जोरदार पुनरागमन केले. आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत देखील त्याने धावांचा पाऊस पाडला. इंग्लंड विरुध्द झालेल्या सामन्यात त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावा करण्याचा पराक्रम केला आहे. त्याने आतापर्यंत एकूण ११५ सामन्यांतील १०७ डावांमध्ये ४००८ धावा केल्या आहेत. यादरम्यान १२२ ही त्याची ही सर्वोत्तम खेळी राहिली आहे. तसेच त्याने आतापर्यंत १ शतक आणि ३७ अर्धशतके देखील झळकावली आहेत.

रोहित शर्मा (Rohit Sharma) :

टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हिटमॅन रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा देखील लवकरच ४००० धावांचा डोंगर सर करू शकतो. त्याला केवळ १४७ धावांची आवश्यकता आहे. २००७ पासून टी -२० क्रिकेट खेळत असलेल्या रोहित शर्माने आतापर्यंत १४८ सामन्यांमध्ये ३८५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २९ अर्धशतके आणि ४ शतके झळकावली आहेत. या टी -२० विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माला हवी तशी कामगिरी करता आली नाही.

मार्टिन गप्टील (Martin guptill):

न्यूझीलंड संघातील आक्रमक आणि विश्वासू फलंदाज मार्टिन गप्टील या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ३५३१ धावा केल्या आहेत. २००९ पासून टी -२० क्रिकेटमध्ये सक्रिय असलेल्या मार्टिन गप्टीलने एकूण १२२ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने २० अर्धशतके आणि २ शतके झळकावली आहेत.

बाबर आझम (Babar Azam) :

आयसीसी टी -२० विश्वचषक २०२२ स्पर्धेच्या सुरुवातीला बाबर आझमला कर्णधार पदावरून काढून टाकण्याची मागणी केली जात होती. मात्र नशिबाच्या जोरावर आता पाकिस्तान संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. बाबर आझमने आतापर्यंत पाकिस्तान संघासाठी ९८ सामने खेळले आहेत. या सामन्यातील ९३ डावांमध्ये त्याने ३३२३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि ३० अर्धशतके झळकावली आहेत.

पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) :

आयर्लंड संघाला टी -२० क्रिकेटमध्ये पुढे घेऊन जाण्यात पॉल स्टर्लिंगचा मोलाचा वाटा आहे. तो सलामीला येऊन तुफान फटकेबाजी करून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून देत असतो. त्याने आतापर्यंत आयर्लंड संघासाठी एकूण १२१ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३१८१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २१ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे.

काय वाटतं? असा कोणता युवा फलंदाज आहे जो विराटचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडून काढू शकतो? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required