अवघ्या ७ दिवसात पाकिस्तानने केली पराभवाची परतफेड; ही आहेत भारतीय संघाच्या पराभवाची ५ प्रमुख कारणे..

आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) स्पर्धेतील सुपर ४ फेरीत भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) दोन्ही संघ आमने सामने आले होते. एक आठवड्यापूर्वी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघाला पराभूत केले होते. आता पाकिस्तान संघाने पराभवाचा वचपा काढत भारतीय संघाला पराभूत केले आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद १८१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाने शेवटच्या षटकात जोरदार विजय मिळवला. एक वेळ अशी होती जेव्हा भारतीय संघ या सामन्यात मजबूत स्थितीत होता. पुन्हा एकदा पाकिस्तान संघ पराभवाच्या वाटेवर होता. मग असं काय घडलं की, भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला? भारतीय खेळाडूंकडून काय चुका झाल्या? चला जाणून घेऊया. (Reasons behind Indian team defeat against Pakistan)

१)नाणेफेक गमावली..

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या महत्वाच्या सामन्यात नाणेफेक गमावली. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी यावे लागले होते. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद १८१ धावा केल्या. मात्र दुसऱ्या डावात ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरली.

२) टॉप ऑर्डरमध्ये विराट कोहली वगळता अन्य फलंदाज ठरले फ्लॉप..

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी ५४ धावांची भागीदारी केली होती. त्यानंतर टॉप ऑर्डरमध्ये विराट कोहलीला वगळता कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. विराट कोहलीने या सामन्यात ३६ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ षटकाराचा मदतीने अर्धशतक पूर्ण केले. तसेच या सामन्यात ४४ चेंडूंमध्ये ६० धावांची खेळी केली. रिषभ पंत १४ तर हार्दिक पंड्या एकही धाव न करता माघारी परतला.

३) भारतीय संघाची गोलंदाजी सुरू असताना वाढले दवांचे प्रमाण...

१८२ धावांचा बचाव करण्यासाठी जेव्हा भारतीय संघातील गोलंदाज मैदानावर उतरले, त्यावेळी परिस्थिती भारतीय गोलंदाजांसाठी अनुकूल नव्हती. दवांचे प्रमाण वाढल्याने गोलंदाजांना चेंडू टाकण्यात अडचणीचा सामना करावा लागत होता. तर दुसऱ्या डावात चेंडू सहजरित्या बॅटवर येत होता. हेच कारण आहे की, पाकिस्तानी फलंदाजांनी सहजरित्या धावा केल्या.

४) अर्शदीप सिंगने सोडला सोपा झेल :

एकवेळ अशी देखील आली होती, जेव्हा भारतीय संघ या सामन्यात मजबूत स्थितीत होता. मात्र अर्शदीप सिंगने १७.३ षटकात रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर आसिफ अलीचा सोपा सोडला. त्यावेळी आसिफ अलीने केवळ १ धाव केली होती. मात्र त्यानंतर आसिफ अलीने ८ चेंडूंमध्ये २ चौकार आणि १ षटकाराचा साहाय्याने १६ धावा केल्या. 

५) भुवनेश्वर कुमारचे १९ वे षटक..

पाकिस्तान संघाला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या २ षटकात २६ धावांची गरज होती. त्यावेळी गोलंदाजी करण्यासाठी अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमार गोलंदाजीला आला होता. सर्वांना वाटत होते की, भुवनेश्वर कुमार चांगली गोलंदाजी करून कमी धावा खर्च करेल. मात्र सर्व उलट झाले आणि त्याने १९ धावा खर्च केल्या. त्यामुळे पाकिस्तान संघ मजबूत स्थितीत आला. भुवनेश्वर कुमारने या सामन्यात ४० धावा खर्च केल्या.

काय वाटतं भारतीय संघ आणि पाकिस्तान संघ पुन्हा एकदा आशिया चषक २०२२ स्पर्धेतील अंतिम सामन्यात आमने सामने येणार का? कमेंट करून नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required