फळ विक्रेत्याचा मुलगा ते भारताचा स्पीड स्टार!! पाहा उमरान मलिकचा प्रेरणा देणारा प्रवास...

भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक दिग्गज फलंदाज दिले आहेत. मात्र जेव्हा वेगवान गोलंदाजांचा उल्लेख केला जातो त्यावेळी भारतीय संघ कुठेतरी कमी पडतो. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ब्रेट ली, शोएब अख्तर सारखे वेगवान गोलंदाज होऊन गेले,जे गोलंदाजीला येताच फलंदाजांना घाम फुटायचा. मात्र आता भारतीय संघात देखील अशा एका गोलंदाजाची एन्ट्री झाली आहे. जो ताशी १५० किमी  या गतीने गोलंदाजी करू शकतो. हा गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून वेगवान गोलंदाज उमरान मलिक आहे. आज २२ नोव्हेंबर म्हणजेच उमरान मलिकचा वाढदिवस आहे. 

उमरान मलिक (Umran Malik ) सध्या भारतीय संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर  आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत यादरम्यान त्याला २ गडी बाद करण्यात यश आले आहे. उमरान मलिकचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे. त्याने भारतीय संघासाठी नेट गोलंदाज म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली होती.(Umran Malik Birthday Special)

अशी झाली सुरुवात...

उमरान मलिकचा जन्म १९९९ मध्ये झाला होता. त्याचे वडील अब्दुल राशिद हे फळ विक्रेता आहेत.  हालाखीची परिस्थिती असताना देखील त्यांनी उमरान मलिकला कसलीही कमतरता जाणवू दिली नाही. त्यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की," मी त्याला कुठल्याही गोष्टी साठी नकार दिला नाही. मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नकोस असे देखील मी त्याला म्हटले होते." उमरान मलिकच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात गल्ली क्रिकेटपासून झाली होती. तो सुरुवातीला टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा. २०२० मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला नेट गोलंदाज म्हणून संधी दिली होती. यादरम्यान त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

आयपीएलमध्ये  केली आहे जोरदार कामगिरी...

उमरान मलिक एक उत्तम वेगवान गोलंदाज आहे. त्याच्याकडे स्विंग नाहीये मात्र त्याच्या गोलंदाजीत जो वेग आहे, जो इतर कुठल्याही भारतीय गोलंदाजाकडे नाहीये. तो सलग ताशी १५० किमी पेक्षा अधिकच्या गतीने गोलंदाजी करू शकतो. आयपीएल २०२२ स्पर्धेत तर या गोलंदाजाने आपल्या वेगवान गोलंदाजीने फलंदाजांचा घाम काढला होता. त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना दिल्ली कॅपिटल्स विरुध्द झालेल्या सामन्यात ताशी १५७ किमी गतीने चेंडू टाकला होता. हा आयपीएल २०२२ स्पर्धेतील सर्वात वेगवान चेंडू ठरला होता. 

उमरान मलिक सारख्या वेगवान गोलंदाजाने जर हवेत चेंडू स्विंग करण्याची कला शिकून घेतली, तर तो नक्कीच भविष्यातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज बनू शकतो. हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सुरुवातीचा टप्पा आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात  तो चांगली कामगिरी करू शकतो.

सबस्क्राईब करा

* indicates required