क्रिकेटच्या मैदानावर फ्लॉप ठरत असलेला विराट, कमाईच्या बाबतीत करतोय जोरदार बॅटिंग: पाहा एका वर्षातील कमाई

आयपीएल २०२२ (ipl 2022) स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा माजी कर्णधार विराट कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. या हंगामात त्याला एकही मोठी खेळी करता आली नाहीये. तसेच तो दोन वेळेस गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला आहे. मात्र या निराशाजनक कामगिरीचा परिणाम त्याच्या कमाईवर झाला नाहीये. नुकताच स्पोर्ट्स बिजनेस वेबसाईट स्पोर्टीकोने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली ६१ व्या स्थानी आहे. या यादीत तो एकमेव भारतीय आणि एकमेव क्रिकेटपटू आहे.

स्पोर्ट्स बिजनेस वेबसाईट स्पोर्टीकोच्या अहवालानुसार, विराट कोहलीने जाहिरात, मानधन आणि बक्षिशातून मिळालेल्या रकमेतून त्याने २६२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यात त्याने २२ कोटी रुपये मानधन आणि बक्षिशातील रकमेतून कमावले आहेत. तर उर्वरित २४० कोटी रुपये हे जाहिरातीतून कमावले आहेत.

क्रिकेटच्या मैदानावर विराटची बॅट काही त्याला साथ देत नाहीये. तरीदेखील त्याची ब्रँड व्हॅल्यु कमी झाली नाहीये. तो सध्या उबर इंडिया, एमआरएफ टायर्स, विक्स, प्युमा, हीरो मोटोकॉर्प, एमपीएल, ब्लू स्टार आणि यांसारख्या मोठ्या ब्रँडचा ब्रँड अँबेसेडर आहे. गेल्या एक वर्षापासून विराट कोहलीला एकही शतक झळकावता आले नाहीये. तसेच आयपीएल स्पर्धेत देखील तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. 

स्पोर्टीकोच्या अहवालानुसार गेल्या १२ महिन्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स पहिल्या स्थानी आहे. त्याने गेल्या १२ महिन्यात ९८२ कोटींची कमाई केली आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी लिओनेल मेस्सी आहे. मेस्सीने गेल्या १२ महिन्यात तब्बल ९४४ कोटींची कमाई केली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required