हॅप्पी बर्थडे चॅम्प : ३० वर्षीय विराटची 'विराट' अचिव्हमेंट...

जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या विराट कोहली नावाचा अस्सल हिरा आज वयाच्या ३१व्या वर्षात पदार्पण करतोय. इतक्या कमी वयात सर्वांच्या लाडक्या 'चिकू'ने क्रिकेट क्षेत्रात आणि चाहत्यांच्या मनात आपलं जे भक्कम स्थान निर्माण केलंय ते नक्कीच अद्वितीय म्हणावं लागेल. ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेल्या विराटला लहानपणापासूनच क्रिकेटचं बाळकडू मिळालंय. सचिनकडे बघत क्रिकेट खेळणारा विराट आज देशाचा अभिमान बनलाय.. 

विराटने आपल्या वनडे कारकीर्दीत आतापर्यंत १७६ सामन्यात ५२.९३च्या सरासरीनं ७५७० धावा ठोकल्या आहेत. यात २६ शतकं आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे. तर
टेस्ट क्रिकेटमध्ये विराटने ४८ सामन्यात १३ शतके आणि १२ अर्धशतके पूर्ण केली आहेत. टेस्ट क्रिकेमध्ये २ डबल सेंच्युरीज करणारा तो एकमेव फलंदाज आहे. याप्रमाणेच २०६ टी-२० सामने खेळताना विराटने ६४६१ धावांचा आकडा गाठलाय. या प्रकारातही विराटने ४ सेंच्युरीज आणि ४६ हाफ सेंच्युरीज केल्या आहेत..

१८ वर्षांचा असताना विराटच्या रणजी पदार्पणाच्या मॅचवेळीच त्याच्या वडिलांचं निधन झालं. पण विराटने तशा परिस्थितीतीतही ९० धावांची उत्कृष्ट खेळी करून दिल्लीच्या संघाला विजय मिळवून दिला होता. यावरून आपण त्याच्या खेळाबद्दलची निष्ठा ओळखू शकतो. विराट मैदानावर उतरतो ते विक्रम रचायलाच. त्याच्या नावावर असलेल्या विक्रमांची यादी खूपच मोठी आहे. आणि म्हणूनच कदाचित त्याला सचिनचं प्रतिरुप मानलं जातं.

२०१४ पासून विराट भारतीय कसोटी संघाचा कप्तान तर २०१२ पासून वनडे संघाचा उपकप्तान आहे. 'विराट कोहली फाऊंडेशन' नावाची त्याची स्वतःची चॅरीटी संस्थाही आहे. नेहमीच हे विराट नावाचं आक्रमक वादळ मैदानात आपल्या वेगळ्या स्टाईल आणि अॅटीट्युड सोबत घोंगावत असतं आणि तसंच ते राहील यात शंका नाही. 

विराट.. तुझी धावांची भूक अशीच कायम राहूदे.  तुझ्या ३०व्या वाढदिवसाच्या बोभाटा.कॉम  कडून तुला खूप खूप शुभेच्छा...

सबस्क्राईब करा

* indicates required