computer

सामनाच नाही तर विराटने भारतीय प्रेक्षकांची मनेही जिंकली आहेत...काय घडलं कालच्या सामन्यात ??

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला. पण या सामन्यात घडलेल्या एका प्रसंगाने आपल्या 'किंग कोहली' बद्दल आदर द्विगुणित केलाय राव. विराटने जबरदस्त खुलाडू वृत्ती दाखवली आहे.

तर झालं काय, भारताची बॅटिंग चालू झाली, सलामीच्या जोडीनं १०० पेक्षा अधिक धावा जोडल्या. रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर विराट खेळायला आला. विराटची खेळी चालू असतानाच स्टीव स्मिथ बाऊँड्रीजवळ फिल्डींग करत होता. तेव्हा काही भारतीय प्रेक्षकांनी त्याला चिडवायला सूरवात केली. विराटच्या हे लक्षात येताच त्याने सरळ भारतीय प्रेक्षकांना टाळ्या वाजवायची खूण करून स्टीव स्मिथला प्रोत्साहन द्यायला सांगितले.

स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोघे sandpaper gate प्रकरणामुळे एका वर्षासाठी निलंबित होते. आता sandpaper gate प्रकरण काय आहे ते थोडक्यात सांगतो. लाकूड, लोखंड गुळगुळीत करण्यासाठी जो सँडपेपर वापरला जातो तो या लोकांनी बॉलवर घासला होता. त्यांना असं करून बॉल स्विंग करायचा होता, पण ऐन मोक्याच्या क्षणी हे लोक पकडले गेले राव.

ऑस्ट्रेलियन टीमचे पट्टीचे खेळाडू स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर दोघे यात दोषी आढळले. वर्षभरासाठी त्यांच्यावर बंदी आणली. यावर्षी ते परत टीममध्ये खेळत आहेत. पण काही केल्या त्यांनी केलेलं कर्म त्यांचा पिच्छा सोडत नाहीय. या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या समर्थकांनी त्यांना चीटर चीटर म्हणून चिडवलं होतं. हे तर काहीच नाही भाऊ, दोन क्रिकेट फॅन्स तर चक्क सँडपेपरच्या वेशात आले होते. हा फोटो पाहा.

कालच्या सामन्यात भारतीयांनी पण हेच केलं, पण विराटने स्टीव स्मिथची बाजू घेतली. त्याने भारतीय प्रेक्षकांना ज्या प्रकारे समजावलं ते खरंच कौतुकास्पद आहे. विराट एक कॅप्टन म्हणून हळू हळू मुरत चालला आहे याचीच ही निशाणी समजावी का??