computer

शनिवार स्पेशल : बंगालमध्ये शस्त्रास्त्रांचा पाऊस कुणी, का, कसा पाडला आणि हाती येऊनही गुन्हेगार कसा पळाला याची सविस्तर माहिती!!

मंडळी, आमीर खानचा ‘सरफरोश’ हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात अर्थच नाही. कारण ज्यांनी सरफरोश बघितला असेल त्यांच्या मनात तो चित्रपट, त्यातली पात्रं कायमची घर करून बसली असतीलच. ते शस्त्रास्त्रांचं स्मगलिंग, मिरची सेठ, बाला ठाकूर, आदिवासी नेता विरन, मुंबईतून मदत करणारा सुलतान आणि या सर्वांना पुरून उरणारा मुंबई पोलीसचा अजय सिंग राठोड.

मंडळी, बोभाटाच्या शनिवार स्पेशलमध्ये अशाच एका प्रचंड मोठ्या शस्त्रास्त्रांच्या स्मगलिंगची स्टोरी आम्ही तुमच्या समोर मांडत आहोत. खेदाची गोष्ट इतकीच आहे की सरफरोशची सगळी पात्रं या कथेत आहेत, फक्त अजय सिंग राठोड मात्र नाहीय.

चला तर वाचूया १९९५ ची “पुरुलिया आर्म्स-ड्रॉप केस”.....

१७ डिसेंबरची मध्यरात्र

पुरुलिया जवळच्या पश्चिम बंगालमधल्या एका खेड्यात रात्री अगदी कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या आवाजाने गावकऱ्यांची झोप उडाली. त्याच दिवशी दुपारी आनंदमार्गीयांनी केलेल्या एका हत्येमुळे गावात भीतीचे वातावरण होतेच. काहीवेळातच जमिनीला हादरे बसतील असे आवाज आले आणि विमान निघून गेले. रात्रीच्या काळोखात बाहेर पडून नक्की काय झालं आहे याचा शोध घेण्याचे धैर्य गावकऱ्यांमध्ये नव्हते.

पहाटेच्या अंधारात एक वृद्धा घराबाहेर पडली. अंधारात तिला हत्तीसारखे काही तरी दिसले. म्हणून तिने मुलांना जागे केले. थोड्यावेळात धैर्य एकवटून मुलं जेव्हा “हत्ती” बघायला गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ती आकृती हत्तीची नसून पॅराशुट मध्ये गुंडाळलेल्या लाकडी खोक्यांची होती. थोड्याच वेळात गाव जमा झाले. आणखी दोन लाकडी पेटारे आसपासच पडलेले आढळले. गावकऱ्यांनी ते लाकडी पेटारे उघडले आणि त्यांची बोबडी वळली. या लाकडी पेटाऱ्यांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात बंदुका, दारुगोळा आणि इतर शस्त्र नजरेस पडले. तोपर्यंत कोणीतरी पोलिसांपर्यंत खबर पोचवली होती. पोलिसांनी गावकऱ्यांना बाजूला करून जेव्हा एकूण शस्त्रसामुग्री बघितली तेव्हा या प्रकरणाचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले.

काय काय होते त्या पेटाऱ्यांमध्ये ?

पंचनामा केल्यावर एकूण २२८ एके-५६ रायफल्स, १० रॉकेट लाँचर, १५० हून अधिक हँड ग्रेनेड्स, अनेक पिस्तुलं, आणि या सर्वाला पुरेल इतका दारुगोळा. एखाद्या लढाईला पुरेल इतकी शस्त्रसामग्री रात्रीच्या अंधारात ते विमान टाकून गेले. ही केस आपल्या हाताबाहेरची आहे हे लक्षात आल्यावर पोलिसांनी राज्यसरकारला पाचारण केले. अर्थातच ही केस राज्य सरकारच्या अखत्यारीच्या बाहेर असल्याने केंद्रसरकारने परिस्थितीचा ताबा घेतला... आणि अशी सुरु झाली पुरुलियाची “आर्म्स-ड्रॉप केस”..........

 

कोण होते सूत्रधार ??

प्राथमिक चौकशीत हे उघडकीस आले की हा बेकायदा शस्त्रसाठा वाराणसीहून कलकत्याला जाणाऱ्या ए.एन.-२६ या रशियन  बनावटीच्या विमानातून पुरुलियात टाकण्यात आला होता, पण हे कळेपर्यंत फार उशीर झाला होता. ते विमान कलकत्याला उतरून इंधन भरून कधीच ‘फुकेत’च्या (थायलंड) दिशेने रवाना झाले होते. “बैल गेला आणि झोपा केला”...

कुठून आले होते हे विमान ?

(प्रातिनिधिक फोटो)

ए-एन.-२६ च्या मार्गक्रमणाची माहिती एअर ट्राफिक कंट्रोल (ATC) कडून एकत्रित केल्यावर असे लक्षात आले की हे विमान लात्व्हीयाहून कराचीमार्गे भारतात आले होते. “फेरी फ्लाईट” अशी या विमानाची नोंद होती. फेरी फ्लाईट म्हणजे समान नसलेले, रिकामे विमान. कराचीहून हे विमान वाराणसीला उतरले. पण ते तपासण्याची तसदी पण कोणीच न घेतल्याने हे विमान रात्री १० वाजता कलकत्याकडे निघाले. एकूण विमान प्रवासाला लागणारा वेळ लक्षात घेता हे विमान ५५ मिनिटे उशिराने कलकत्याला पोहोचले. या ५५ मिनिटात विमान एअर ट्राफिक रूट बदलून पुरुलियाला गेले होते यात शंकाच उरली नव्हती. आता प्रश्न फक्त इतकाच होता की हा शस्त्रसाठा होता कोणासाठी?? आनंदमार्गीयांसाठी? ब्रम्हदेशातल्या क्रांतिकारी गटासाठी? की श्रीलंकेतल्या तमिळ टायगर्ससाठी??

आधी फक्त चर्चाच सुरु झाल्या..

विमान भारताच्या बाहेर निघून गेल्यामुळे हात चोळत बसण्याखेरीज भारत सरकारच्या हातात काहीच शिल्लक नव्हते. फक्त चर्चा, चर्चा आणि फक्त चर्चा ! पण या चर्चा दरम्यान एक गोष्ट उघडकीस आली की अशा प्रकारे शस्त्रपुरवठा होणार आहे आणि तो पुरुलियातच होणार आहे याची खबर MI5 या ब्रिटीश गुप्तहेर खात्याने बरेच दिवस आधी “रॉ”कडे पोहोचवली होती. रॉ ने ही बातमी ‘आयबी’कडे (Intelligence Bureau) वेळच्यावेळी पोहोच केली होती. पण करणार काय? सरकारी ढिसाळ कारभारात कोणी लक्षच दिले नाही. आंतरराष्ट्रीय वर्तुळात जेव्हा ही बातमी पोहोचली तेव्हा मात्र जलद हालचालींना सुरुवात झाली.

...आणि विमान पुन्हा परत आले !

(प्रातिनिधिक फोटो)

आपल्या सरकारी ढिसाळपणाची ख्याती इतकी मोठी आहे की ‘फुकेत’ला गेलेले ते विमान परतीच्या प्रवासात पुन्हा एकदा मद्रास विमानतळावर उतरले. पुन्हा एकदा भरपूर इंधन भरून हे विमान उड्डाणाला सज्ज होणार इतक्यात भारत सरकारला जाग आली. हे विमान अडवून मुंबई विमानतळावर उतरवावे असा आदेश आला. या पुढची कारवाई भारतीय वायू दलाच्या हातात असल्याने जलद हालचाली सुरु झाल्या. त्या विमानाच्या कॅप्टनला विमान मुंबई विमानतळावर उतरवण्याचे आदेश वायू दलाने दिले. पण हे वैमानिक इतके मुजोर होते की सुरुवातीला त्यांनी शिवीगाळच करायला सुरुवात केली. थोड्याचवेळात आकाशामध्ये वायुसेनेच्या दोन विमानांनी झेप घेतली आणि या विमानाला जेरबंद केले. आता त्या विमानाला मुंबई विमानतळावर उतरण्याखेरीज दुसरा उपायच नव्हता.

विमानतळावर होते कोण ??

झाल्या प्रकारची माहिती मुंबई पोलिसांना रात्री १ वाजून २० मिनिटांनी मिळाल्यावर कमिशनर “आर. एस. शर्मा” ताबडतोब विमानतळाकडे निघाले. अर्ध्या वाटेतच त्यांना मेसेज देण्यात आला की ‘मुंबई पोलिसांनी विमानतळावर येण्याची आवश्यकता नाही. आर. एस. शर्मा यांनी घरी परत जावे’. पुन्हा एकदा सरकारी श्रेय लाटण्याच्या भानगडीत जेव्हा विमानतळावर ए.एन.-२६ उतरले तेव्हा या तस्करांना अटक करण्यासाठी एकही अधिकारी विमानतळावर नव्हता. काही अधिकारी फक्त हे कोणते विमान आले आहे हे बघण्यासाठी फेरफटका मारून गेले. या संधीचा फायदा घेऊन या प्रकरणाचा सूत्रधार “किम पीटर डेव्ही” फरार होण्यात यशस्वी झाला आणि आयबीच्या हातात वैमानिक पीटर ब्लीच आणि ५ लात्व्हीयन विमान कर्मचारी लागले.

आयबी आणि रॉ या दोन्ही संस्थांनी मुंबई पोलीस आणि सीबीआय यांना श्रेय मिळू नये याचा आटोकाट प्रयत्न केला. परिणामी सीबीआयचे डायरेक्टर विजय रामाराव यांना शक्य तितके अडवण्यात करण्यात आयबी आणि रॉ यशस्वी झाले. इतके यशस्वी झाले, की काही काम नसल्यामुळे सीबीआयचे अधिकारी दुसऱ्या दिवशी एस्सेल वर्ल्ड बघायला निघून गेले.

मित्रांनो, आपण आतापर्यंत वाचला तो सगळा सरकारी गोंधळाचा पंचनामा. पण आता आपण बघूया कोण होते या कारनाम्याचे सूत्रधार.

पीटर ब्लीचने दिलेल्या माहितीनुसार या विमानात त्या रात्री एकूण ८ माणसं होती. वैमानिक पीटर ब्लीच स्वतः, त्याचे ५ कर्मचारी, सूत्रधार किम डेव्ही आणि कलकत्याचा एक व्यापारी दीपक.

सत्यनारायण गौडा उर्फ रँडी उर्फ रणधीर हा पुरुलियात उतरवलेल्या शस्त्रांचा ताबा घेण्यासाठी येणार होता. तर दीपक उर्फ दया मणिकम आनंद हा त्याचा साथीदार होता.

आता बघूया किम डेव्ही हे पात्र होते तरी कोण.

(किम पीटर डेव्ही)

खरं सांगायचं तर किम पीटर डेव्ही याचं नाव नील्स हॉल्क असं होतं. ज्या किम डेव्हीच्या पासपोर्टवर तो प्रवास करत होता तो किम डेव्ही न्युझीलंडचा नागरिक होता आणि त्याला मरून ३० झाली होती. थोडक्यात नील्स हॉल्क ही व्यक्ती या प्रकरणाची सूत्रधार होती.

नील्स हॉल्क हा डेन्मार्कचा नागरिक होता. ऐनवेळी पळ काढण्यात यशस्वी झाल्यामुळे नील्स हॉल्क उर्फ किम डेव्ही आजतागायत भारत सरकारच्या हाती लागलेला नाही. त्याने २०११ साली दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले आहे की या सर्व प्रकरणाची माहिती भारत सरकारला होती आणि सरकारच्या आदेशानुसारच हा शस्त्रसाठा आम्ही पुरुलियात आणून टाकला. पश्चिम बंगालमधून कम्युनिस्ट राजवटीला संपुष्टात आणण्यासाठी केंद्रसरकारने केलेला हा एक बनाव होता असे त्याचे म्हणणे आहे. भारतात आल्यानंतर या प्रकरणातील सर्व भारतीयांची नावे उघडकीस आणू असेही त्याचे म्हणणे आहे. त्याच्या बोलण्यात अर्थातच विश्वास ठेवता येण्यासारखं काही नाहीय.

पुढे काय झाले ?

सीबीआयने या प्रकरणाचा ताबा घेतल्यावर त्यांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की हा शस्त्रसाठा आनंदमार्गीयांसाठीच होता. सीबीआयचे म्हणणे कोर्टाने ग्राह्य धरले आणि पीटर ब्लीच व इतर लात्व्हियन पाच नागरिकांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर जे काही झाले ते सगळे आंतरराष्ट्रीय दबावाखाली घडले.

पकडलेल्या ५ लात्व्हियन नागरिकांनी तुरुंगात असताना रशियन नागरिकत्व स्वीकारले. ते रशियाचे नागरिक झाल्यावर रशिया सरकारने भारत सरकारवर दबाव आणला. परिणामी या सर्वांना माफी देण्यात येऊन २००० साली त्यांची सुटका करण्यात आली.  

(पीटर ब्लीच)

उरला प्रश्न पीटर ब्लीचचा. ब्रिटिश सरकारच्या म्हणण्याप्रमाणे पीटर ब्लीचने या आर्म्स-ड्रॉपची माहिती MI5 ला सर्वात आधी दिली होती. MI5 ने ही माहिती रॉ पर्यंत पोहोचवली होती. पीटर ब्लीच किम डेव्हीने दिलेल्या धमकीमुळे या प्रकरणात सामील झाला होता. अशाप्रकारे ब्रिटन सरकारने भारत सरकारवर दबाव आणल्यानंतर राष्ट्रपतींच्या अधिकाराखाली पीटर ब्लीच २००४ साली बाहेर पडला.

तर मंडळी, इतकं रामायण घडल्यानंतरही रामाची सीता कोण हे सरकारला कळलेलेच नाही. पुरुलिया आर्म्स-ड्रॉप मध्ये आपण किती बेपर्वा आहोत हे सिद्ध झालं आहे. किम डेव्हीसारखा अतिरेकी श्रेय लाटण्याच्या स्पर्धेत सहज पलायन करू शकतो हे लज्जास्पद सत्य आहे. पळून गेलेला किम डेव्ही आजही नाकाने कांदे सोलतोय हे तर आपल्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.

या सर्व प्रकरणाला २५ वर्ष उलटून गेली पण पुरुलिया आर्म्स-ड्रॉप कोणासाठी होता हे अजूनही कळलेले नाही.