computer

बुटातून बियर पिऊन विजय साजरा करण्याची ही 'शोई' पद्धत काय आहे? वाचा शोई आणि तिचे किस्से!!

T20 वर्ल्डकप जिंकल्यावर ऑस्ट्रेलियन संघाने नेहमीप्रमाणे मोठा जल्लोष केला. या संघातील दोन खेळाडूंनी केलेल्या वेगळ्या पद्धतीच्या जल्लोषाने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टोयनिस या दोन खेळाडूंनी चक्क स्वतःच्या बुटामध्ये बियर प्यायली.

या गोष्टीची चर्चा झाली नसती तर नवलच! पण हे काय पहिल्यांदा होत आहे अशातला भाग नाही. ही एक सेलिब्रेशन करण्याची प्रचलित पद्धत आहे, याला शोई असे म्हटले जाते. ऑस्ट्रेलियात ही पद्धत चांगलीच प्रचलित आहे. तिथे गमतीने म्हटले जाते की एकवेळ बूट पायात फिट बसला नाही चालेल, पण बुटात बियर मावली पाहिजे.

२०१६ साली ऑस्ट्रेलियन मोटोजीपी रायडर जॅक मिलर याने आपल्या पहिला विजय याच पद्धतीने सेलिब्रेट केला होता. त्यानंतर फॉर्म्युला वन ड्रायव्हर डॅनियल रिकार्डो यानेसुद्धा ही बिअर बुटात टाकून पिण्याची शोई पद्धत अवलंबली होती.

आधी बुटात बिअरचा कॅन पूर्ण ओतायचा. हा बूट एकतर स्वतःचा असेल किंवा मित्र किंवा दुसऱ्या जवळच्या व्यक्तीचा असू शकतो. नंतर त्या बुटातील बियर पिऊन घ्यायची. हि गोष्ट विचित्र वाटत असली तरी ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलिया बाहेरही अनेक ठिकाणी आनंदाच्या क्षणी सर्रास केली जाते.

ऑस्ट्रेलिया टूरवर गेलेले विविध सेलेब्रिटी देखील ही शोई करताना दिसतात. २०१९ साली पॉपस्टार पोस्टमलोन तिथे गेला असता प्रेक्षकांमधून शोई, शोई असा आवाज झाल्यावर त्याने बुटात बिअर ओतून स्टेजवरच पिऊन दाखवली होती.

म्युझिक शो, स्पोर्ट्स इव्हेंट किंवा इतरही समारंभात असे करणे हे तिथे नेहमीचे आहे. जवळपास गेली वीस वर्षे एखादी गोष्ट जिंकल्यावर रावडीपणा मिरवण्यासाठी ही गोष्ट केली जाते. सहसा फॉर्म्युला वन रेसिंगमध्ये हे कृत्य नेहमी होताना दिसते. एका वेबसाईटनुसार पार्ट्यांमध्ये १९९० सालापासून, तर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये २००६ सालापासून हे शोई प्रकरण वाढले आहे.

अनेकांना हे आवडत नसले तरीही पब्लिकची इच्छा म्हणून करावे लागते. २०१६ साली तर ऑस्ट्रेलियाचा बजी नाईन नावाचा एक ग्रुप मलेशियात या शोईच्या नादात अटक झाला होता. अस्वच्छ आणि घामाने माखलेल्या बुटात बिअर पिणे अनेकांना जीवावर येते. पण रिकार्डोच्या प्रसंगानंतर हे प्रकार वाढले आहेत.

मसग्रेव्ज नावाची ग्रॅमी विजेती कलाकार म्हणते की, "एका फॅनने मला आग्रह केल्यावर मी नकार दिला होता." पण दुसऱ्या दिवशी ती काचेचा स्लीपर मेलबर्न येथील कार्यक्रमात घेऊन गेली आणि तिथे तिने त्यात टकीला टाकून पिला होता. यावरून समजते की हे प्रकार टाळण्यासाठी सेलब्रिटींना किती कसरत करावी लागते.

चांगल्या भाग्याला आपल्याकडे आणण्याची प्रथा म्हणून या शोईकडे बघितले जाते. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या या कृतीनंतर मात्र शोई या गोष्टीबद्दल अनेकांना कुतूहल निर्माण झाले होते. आयसीसीनेसुद्धा या गोष्टीबद्दल ट्विट केले आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required