तब्बल १२ वर्षानंतर भारतीय संघात स्थान मिळवणारा राहुल त्रिपाठी आहे तरी कोण? घ्या जाणून..

बीसीसीआयने (BCCI)  आयर्लंड दौऱ्यासाठी (India tour of Ireland) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघांमध्ये  २६ आणि २८ जून रोजी दोन टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. तर पहिल्यांदाच हार्दिक पंड्या भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. तर सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पिछाडीवर आहे. या मालिकेसाठी जेव्हा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली, त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण आयपीएल २०२२ स्पर्धा गाजवणाऱ्या राहुल त्रिपाठीला या संघात स्थान देण्यात आले नव्हते. चाहत्यांनी सोशल मीडियावर आक्रोश देखील व्यक्त केला होता. याची दखल घेत, बीसीसीआयने अखेर आयर्लंड दौऱ्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. ३१ वर्षीय राहुल त्रिपाठीला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तब्बल १२ वर्ष वाट पाहावी लागली आहे. (Rahul Tripathi)

तब्बल १२ वर्ष पाहावी लागली आहे वाट..

क्रिकेटपटू म्हटलं तर संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. एकदा संघात स्थान मिळालं की, संघात स्थान टिकवून ठेवणं देखील तितकीच मोठी गोष्ट असते. काही क्रिकेटपटू आहेत ज्यांना खूप लवकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळते. तर राहुल त्रिपाठीसारखे काही क्रिकेटपटू असताना ज्यांना १२ वर्ष वाट पाहावी लागते. राहुल त्रिपाठीने २०१० मध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. तर २०१७ मध्ये त्याला आयपीएल स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली. गेल्या काही हंगामात त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे.  आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती. १४ सामन्यात त्याने २७.९२ च्या सरासरीने ३९१ धावा केल्या होत्या.

एमएस धोनी सोबत आहे खास कनेक्शन..

राहुल त्रिपाठी आणि माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी (Ms Dhoni) यांचे खास कनेक्शन आहे. राहुल त्रिपाठीचा जन्म झारखंडमधील रांची येथे झाला आहे. तर एमएस धोनीचा जन्म देखील रांची येथे झाला होता. आता सध्या राहुल त्रिपाठी आपल्या कुटुंबासह मुंबईमध्ये राहतोय.

अशी राहिली आहे राहुल त्रिपाठीची कारकीर्द..

राहुल त्रिपाठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतो. तर आयपीएल स्पर्धेत तो सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचा कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने प्रथम श्रेणीतील  ४७ सामन्यात ७ शतक आणि १३ अर्धशतकांच्या मदतीने २५४० धावा केल्या आहेत. तर लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने १ शतक आणि ८ अर्धशतकांच्या साहाय्याने  १२०९ धावा केल्या आहेत.

काय वाटतं? भारतीय संघासाठी खेळताना राहुल त्रिपाठीला आपली छाप सोडण्यात यश येईल का??

सबस्क्राईब करा

* indicates required