computer

मिल्खा सिंग यांना 'फ्लाईंग सिख' हा खिताब कसा मिळाला? वाचा ही गोष्ट!!

प्रसिद्ध धावपटू आणि भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवणारे मिल्खा सिंग यांचे निधन झाले. मिल्खा सिंग यांचे करियर अनेक मोठ्या गोष्टींनी भरलेले आहे. त्यांच्या धावण्याच्या तुफान वेगामुळे त्यांना फ्लाईंग सिख म्हटले जाते. पण त्यांना हे नाव कसे पडले यामागे मोठी रंजक गोष्ट आहे.

मिल्खा सिंग यांना फ्लाईंग सिख हा खिताब १९६० साली मिळाला होता, तोही चक्क पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुब खान यांच्याकडून!! १९६० साली भारत आणि पाकिस्तान संबंध चांगलेच ताणले गेले होते. फाळणीच्या जखमा ताज्या होत्या, अशा परिस्थितीत पाकिस्तानने मिल्खा सिंग यांना लाहोर येथे इंटरनॅशनल ऍथलिट स्पर्धेत भाग घेण्यासाठी आमंत्रण दिले. मिल्खा सिंग यांच्या मनात पाकिस्तानबद्दल प्रचंड राग होता, त्यांनी आपण जाणार नाही अशी भूमिका घेतली. पण त्यांच्या जवळच्या माणसांनी तसेच खुद्द जवाहरलाल नेहरू यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर ते जायला तयार झाले. मिल्खा सिंग खुल्या जीपमध्ये वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात गेले. त्यांना विजयासाठी शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण प्रवासात दोन्ही बाजूचे रस्ते खचाखच भरले होते.

आता स्पर्धेचा दिवस उगवला. त्यांची स्पर्धा पाकिस्तानी धावपटू अब्दुल खालिकशी होता. अब्दुल खालिकची ओळख 'एशियाचे वादळ' अशी होती. या स्पर्धेत मिल्खा सिंग यांचा कितपत निभाव लागेल अशी सर्वाना शंका होती. स्टेडियम पूर्ण भरलेले होते. ही एक साधारण स्पर्धा नव्हती  हा प्रश्न दोन प्रतिस्पर्धी देशांच्या प्रतिष्ठेचा होता.

स्पर्धा सुरू झाली आणि सर्वांचे श्वास रोखले गेले. मिल्खा सिंग आणि अब्दुल खालिक दोन्ही तुल्यबळ प्रतिस्पर्धी जोरात धावत होते. पण शेवटी मिल्खा सिंग यांनी अब्दुल खालिकला मात देत विजय मिळवला. भारताची मान त्यांनी पुन्हा उंचावली. हा सामना पाहण्यासाठी मैदानात पाकिस्तानी राष्ट्रपती अयुब खान मैदानात उपस्थित होते.

स्पर्धा संपल्यावर मिल्खा सिंग यांच्या गळ्यात मेडल टाकत असताना अयुब खान पंजाबीत म्हणाले, 'मिल्खाजी आज तुम्ही पाकिस्तानात येऊन धावले नाहीत तर थेट उडाले आहात, तुम्ही खरोखर फ्लाईंग सिख आहात.' तेव्हापासून मिल्खा सिंग यांना फ्लाईंग सिख म्हणूनच ओळखले जाऊ लागले.

सबस्क्राईब करा

* indicates required