सैराटच्या नावानं चांगभलं! पहा सैराटचे ट्रेलर
गेल्या सहा महिन्यापासून एक-एक टीझर आणि गाणी रिलीज करत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचवलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ’सैराट’ येत्या शुक्रवारी म्हणजेच 29 तारखेला रिलीज होतोय. तर या सिनेमा बद्दल अधिक उत्सुकता वाढवणारं ट्रेलर आज रिलीज करण्यात आलेलं आहे.
पहिल्या टीझर आणि सॉन्ग प्रोमोज मधून एका निखळ प्रेमकथेची पार्श्वभूमी तयार केल्यानंतर हे ट्रेलर या प्रेमीयुगुलाला सामोर्या येणाऱ्या अडथळ्यांची कल्पना देऊन जाते. येत्या 29 तारखेला जाऊन नक्की पहावा असा हा सिनेमा वाटतोय.
या चित्रपटाला अजय-अतुल यांचे संगीत आहे. चित्रपटातली चारही गाणी चांगली जमून आली आहेत. या चित्रपटाच्या ’याड लागलं’ या गाण्यासाठी हॉलिवूडमधल्या सोनी स्टेजवर 66 आर्टिस्टच्या सिम्फनी ऑर्केस्ट्रासोबत रेकॉर्डिंग केलं आहे. असं करणारा तो मराठीतला नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीतला पहिला चित्रपट ठरला आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता नागराज मंजुळेचा फॅन्ड्री नंतर हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या रिंकू राजगुरू हिला यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारात स्पेशल मेन्शन मिळालं आहे.
आता जनता या चित्रपटाला डोक्यावर घेते का नाही हे 29 तारखेला कळेलच.




