computer

सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सेलेब्रिटी करतात हे ९ उपाय!

सेलेब्रिटी, खासकरुन सिनेमात करणाऱ्या लोकांना चेहऱ्यावर वाढतं वय दिसून चालत नाही. मेकअपने वार्धक्याच्या काही खुणा लपवता येतात, पण तरीही ते वय इकडून तिकडून डोकावत राहातं. त्यात आपल्या सौंदर्याच्या कल्पना आणि नैसर्गिक सौंदर्य यात तफावत असेल तर प्लास्टिक सर्जरी असे काहीबाही उपाय करुन सेलेब्रिटीज नेहमी वय आणि सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करतात.  मग काय,  ग्रेसफुली एजिंग वगैरे तर्क बाजूला पडतो आणि सिनेस्टार आणि काही लोक  थेरपी आणि ट्रीटमेंट वापरुन तरुण दिसायचा प्रयत्न करतात. 

ते नक्की काय करतात  हे जाणून घ्यायचंय? वाचा तर मग.  अर्थात हे आहेत काही उपाय. पैसे घालवून वाट्टेल ते करणाऱ्या पब्लिकसाठी कितीही केलं तरी कमीच आहे. हो ना?
 

१. हायड्रोक्विनोन

त्वचेवरचे म्हातारपणाचे सगळे डाग मिटवणारं हे एक पॉवरफुल क्रिम आहे. म्हणजे  चेहरा 'स्पॉटलेस' करणारे  एक प्रकारचे ब्लीच आहे म्हणा ना. काही वर्षांपूर्वी गोरेपणा मिळवून देणाऱ्या क्रीम्समध्येही ब्लीच आहे अशी बातमी आली होती.  

२. ग्लायकॉलिक ऍसिड

हा घटक असलेले सगळे लोशन आणि क्रीम एकदम जादू करतात. चेहऱ्यावरच्या पुटकुळ्या, काळे डाग आणि सुरकुत्या हां हां म्हणता या ॲसिडमुळे पुसट होतात. ह्याच्या वापराने एक्सफोलियेशन होते म्हणजे मृतपेशी निघून जातात आणि त्वचा एकदम  तजेलदार दिसते. 

३. लेझर टेक्नॉलॉजी

सगळ्यात पटकन फरक दाखवणारा म्हणजे अगदीच 'रेडिमेड' टाईपचा उपाय. त्वचेवरचे डाग, सुरकुत्या आणि ओंगळवाणे केस झटक्यात घालवायचे असतील तर लोक ही झटपट लेझर ट्रीटमेंट घेतात.  ही टेक्नॉलॉजी वेळ कमी खाते, कष्ट कमी करते आणि हवे तसे रिझल्ट देते. जरी या प्रकारे कृत्रिम सौंदर्य मिळत असलं तरी बऱ्याच स्त्रिया लेसरने अंगावरचे केस कायमचे काढून टाकतात. यामुळं केस अगदीच नाहीसे होत नसले तरी बरेच कमी होतात. 

४. मायक्रोडर्माब्रेजन

नाव उच्चारायला बरंच अवघड आहे पण सगळ्यात प्रसिद्ध अशी ट्रीटमेंट आहे ही. झिंक प्रकारातल्या पदार्थाने त्वचेचा पहिला थर एक्सफोलियेशन प्रकाराने काढून टाकला जातो आणि नंतर येणारी नवीन त्वचा 'म्हातारपणाच्या खुणांनी' मुक्त झालेली असते. म्हणजे 'नो एजिंग स्पॉट्स' बरं का!

५. केमिकल पील

शब्दशः अर्थ घेऊ नका हो. कोणत्याही ॲसिडचा वापर करून त्वचा उचकटून काढायची नसते. घाबरू नका. ही ट्रीटमेंट म्हणजे खराब किंवा काळवंडलेल्या त्वचेला काढून तिला परत तजेलदार करण्याची प्रक्रिया आहे. वरवरचा त्वचेचा रापलेला थर काढून टाकला जातो आणि मग दिसते एकदम तरुण चमकदार त्वचा.. 

६. ऑस्ट्रियामधली सिक्रेट वेट लॉस क्लिनिक्स

रग्गड पैसे असेलेले लोक हेही करून बघतात. आठवतंय ना परिणीता चोप्रा काही महिन्यांचा ब्रेक घेऊन एकदम बारीक होऊन आली होती. ती गेली होती ऑस्ट्रियाला. तिकडे काही दिवस राहूनच ही ट्रीटमेंट पूर्ण करता येते. तिथं डिटॉक्स करून तुम्हांला एका विशिष्ट डायटवर ठेवलं जातं. काही इंजेक्शन्सचा कोर्स देखील असतो. याने वजन तर कमी होतंच, शिवाय मिळते ती 'मिलियन डॉलर स्किन' म्हणजेच अतिशय सुंदर त्वचा. अर्थात हे करतात कसे हे त्यांचे सिक्रेट आहे. 

७. बोटॉक्स

चेहऱ्याचे अवयव जसे हवे तसे लहान मोठे करून घेण्यासाठी लागणारे साधन म्हणजे बोटॉक्स. यात हव्या त्या ठिकाणी इंजेक्शन्स  देऊन तुम्हाला हवे तसे रूप बदलून देतात. अगदी ओठांचे चंबू म्हणजे सध्याचे, सेल्फीसाठी कम्पलसरी असेलेले, फेमस 'पाऊट' सुद्धा बोटॉक्सच्या साहाय्याने पेरफेक्टली बांसवून घेता येतात, गालाचे उंचवटे भरता येतात आणि बरंच काही करता येतं.  हो, पण कधीकधी आयेशा टाकिया आणि अनुष्का शर्मासारखा पोपटही होतो बरं!!

 

आणखी वाचा :

चिरतारुण्याचे नवे रहस्य - 'बोटॉक्स' !!

८. प्लास्टिक सर्जरी

आता ही तर वर्षानुवर्षे चालत आलेली परंपराच आहे जणू. आपला मायकल जॅक्सन माहीतच असेल. जन्माने आफ्रिकन वर्णाचा मायकल शेवटच्या क्षणी यमालासुद्धा ओळखता आला नसावा. प्लास्टिक सर्जरी करून त्यानं आपलं रूप पालटलं होतं. ज्यांना चेहराच बदलून घ्यावासा वाटतो त्यांच्यासाठीच ही सोय झालेली आहे. आपल्याकडे नाकाच्या सर्जरी करुन घेणाऱ्या श्रीदेवी, शिल्पा शेट्टी आणि कितीतरीजणी आहेत. 

९. स्कीन टाईटनिंग

काही केलं तरी डोळ्यांजवळच्या, विशेषत: मानेजवळच्या सुरकुत्या वय दाखवून देतातच. मग स्कीन टाईटनिंग करुन घ्यावंच लागतं. ते केलं नाहीतर सतत देवानंदसारखे बंद गळ्याचे कपडे घालावे लागतात आणि केलं तर रेखासारखं एव्हरग्रीन दिवा म्हणून जग तुम्हांला ओळखतं. 

 

पाह्यलंत? म्हणूनच इतकं वय झालं तरी हे लोक फिट आणि फाईन दिसत असले तरी "दिखावेपे ना जाओ, अपनी अकल लडाओ"!!

सबस्क्राईब करा

* indicates required