computer

या जंगलात १५ माकडं मृत आढळली... आपलीही परिस्थिती हीच होणार नाही ना ??

मंडळी, फार पूर्वीपासून असं म्हटलं जात आहे की तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होईल. हे खरं ठरण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आज जी घटना आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती पुढील भविष्याची रंगीत तालीम होती असं म्हणायला हरकत नाही.

मध्यप्रदेशचं जोशी बाबा जंगल. जवळच असलेल्या देवास येथून एक मुलगा बकऱ्यांना जंगलात चरण्यासाठी घेऊन गेला होता. तिथे गेल्यावर त्याला तब्बल १५ मृत माकडं आढळली. त्याने गावकऱ्यांना याबद्दल सांगितलं. गावकऱ्यांकडून ही बातमी वनविभागापर्यंत गेली.

वनविभागाच्या एका टीमने तातडीने त्या जागी तपासणी केली. नेमका कोणत्या कारणाने माकडांचा जीव गेला होता हे त्यांनी शोधून काढलं. माकडांचा जीव पाण्याआभावी गेला होता. गोष्ट इथेच संपत नाही.

हे घडलं तेव्हा तिथलं तापमान ४५ डिग्री सेल्सियस एवढं होतं. उन्हाळ्यात जंगलातली नदी पार कोरडी होती. पाणी फार मुश्किलीने मिळतं. अशावेळी जगण्यासाठी स्पर्धा ही होणारच. जोशी बाबा जंगलात माकडांचे आपापसात गट आहेत. जे उरलंसुरलं पाणी होतं त्यावर एका विशिष्ट गटाचा ताबा होता. दुसऱ्या एका गटाला ते लोक आसपासही भटकू देत नव्हते.

समोरचा गट ताकदीचा आहे हे बघून दुसऱ्या गटाने पण पाण्यापासून लांबच राहायचं ठरवलं. दोन्ही मार्गाने त्यांचं मरण निश्चित होतं. त्यांचा शेवट पाण्यावाचून तडफडून झाला. ज्या गुहेत ते राहायचे तिथे ९ मेलेली माकडं सापडली आहेत.

मंडळी, जागतिक तापमान वाढ, वृक्षतोड, प्रदूषण बघता असं वाटतं की पुढे जाऊन पाणी इतकं कमी होईल की माणूसही प्रत्येक थेंबासाठी असाच संघर्ष करेल. फक्त तो संघर्ष मोठ्याप्रमाणात असेल आणि जगाचा विनाश करणारा ठरेल.

या घटनेला बघून तुम्हाला काय वाटतं ? तुमचं मत नक्की द्या !!