computer

महाराष्ट्रात सहलीसाठी जायची ८ बेष्ट ठिकाणं? तुम्ही कुठे जाणार आहात??

मंडळी, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु होत आहेत आणि तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार की या सुट्टीत जायचं कुठे ? भारत हा अशा अनेक ठिकाणांनी भरलेला आहे जिथे तुम्हाला उन्हाळा अगदी सुखात घालवता येईल. बोभाटा प्रत्येक राज्यातल्या अशा ठिकाणांची यादी घेऊन आलं आहे. आजच्या पहिल्या लेखाची सुरुवात आपल्या महाराष्ट्रापासून करत आहोत.

चला तर पाहूया उन्हाळ्याच्या सुट्टीत भेट देता येतील अशी महाराष्ट्रातील ८ ठिकाणं !!

१. मालवण

आपल्या यादीतलं पाहिलं ठिकाण आहे मालवण. मालवण ओळखला जातो तो सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी आणि मालवणी पदार्थांसाठी. संपूर्ण सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी तुम्हाला निदान १ पूर्ण दिवस तरी नक्कीच काढावा लागेल. त्यानंतर तुम्ही मालवणी जेवणावर ताव मारू शकता. याखेरीज मालवण मधले समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत. तारकर्ली किनारा, निवती किनारा आणि देवगड किनारा. या समुद्र किनाऱ्यांवर तुम्हाला भटकंती करता येईल. तुम्हाला बोटिंग आणि स्कुबाडायव्हिंग आवडत असेल तर मालवण मध्ये तेही मिळेल.

२. आंबोली

आंबोली थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात अशाच एका जागेच्या शोधात आपण असतो. महाबळेश्वर आणि माथेरानशिवाय तुम्ही आंबोलीची निवड करू शकता. आंबोली भागात माधवगड किल्ला, आंबोली धबधबा, शिरगावकर पॉईंट, सनसेट पॉईंट ही ठिकाणं भेट देण्यासारखी आहेत.

३. काशीद

अलिबागपासून ३० किलोमीटरवर असलेलं काशीद हे मुरुड-जंजिऱ्यासाठी ओळखलं जातं.  मुरुड-जंजिरा दुर्गाशिवाय काशीद मध्ये आणखी दोन किल्ले आहेत – कोर्लई किल्ला आणि रेवदंडा किल्ला. किल्ल्यांची सफर झाल्यावर तुम्ही फणसडचं अभयारण्य पाहू शकता.

४. लोणावळा आणि खंडाळा

पिकनिकसाठी लोणावळा आणि खंडाळा ही जुळी ठिकाणं सगळ्यात प्रसिद्ध आहेत. मुंबई आणि पुणेकरांसाठी ही अगदी जवळची ठिकाणं आहेत. ट्रेकिंग, कॅम्पिंग आवडणाऱ्यांसाठी हा भाग उत्तम आहे. तुम्हाला किल्ले आवडत असतील तर जवळच विसापूर, कोरेगड, राजमाची, लोहगड हे किल्ले आहत. लोणावळ्यापासून जवळच भाजाची लेणी पण आहेत. खंडाळा भागात भुशी धरण बघता येईल.

५. महाबळेश्वर

उन्हाळा घालवण्यासाठी पहिलं नाव लक्षात येतं ते म्हणजे महाबळेश्वर. महाबळेश्वर मध्ये तुम्ही काय काय करू शकता ते पाहू. व्हील्सन पॉईंट येथे सुर्योदयाचं अप्रतीप दृश्य पाहू शकता, माउंटन बायकिंग करता येऊ शकते, तापोळा ते बामणोळी पर्यंत बोटिंग करू शकता. रॉक क्लायम्बिंगचा पर्याय पण उपलब्ध आहे. ट्रेकिंगचं वेड असणाऱ्यांसाठी पण ही जागा ‘परफेक्ट’ आहे. अवघ्या २३ किलोमीटरवर प्रतापगड आहे. महाबळेश्वर ठरलं तर प्रतापगड चुकवून चालणार नाही.

६. अलिबाग

अलिबाग तसं मुंबईकरांना जवळचं. बोटीने आपण अलिबागला सहज पोहोचू शकतो. उन्हाळ्यात शहरी वातावरणापासून लांब जायचं असेल तर अलिबाग उत्तम पर्याय ठरेल. अलिबाग मध्ये समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत. नागाव, अक्षी, वरसोली, मांडवा या भागातल्या किनाऱ्यांना तुम्ही भेट देऊ शकता. तुम्हाला रेवदंडा किनाऱ्यावर कॅम्पिंग पण करता येईल. एवढंच नाही तर सागरगड आणि कोलाबा किल्ला पण आहेच.

७. माथेरान

महाबळेश्वर लांब वाटत असेल तर मुंबई आणि पुणेकरांसाठी माथेरान सोयीचं आहे. माथेरान भागातले वेगवेगळे पॉईंट्स पाहता पाहताच तुमचा दिवस कसा जाईल कळणार नाही. किल्ला पहायची आवड असलेल्यांसाठी या भागात कलावंतीण दुर्ग आणि प्रबळगड हे दोन किल्ले आहेत. त्यापैकी कलावंतीण दुर्ग सर करताकरता भल्याभल्यांना आपले पूर्वज आठवतात राव. शहरी वातावरणातून काही हटके करायचं असेल तर कलावंतीण दुर्ग एकदा तरी सर करायलाच हवा.

८. पाचगणी

लोणावळा-खंडाळा प्रमाणे महाबळेश्वरचा जुळा भाऊ म्हणजे पाचगणी. महाबळेश्वर पाचगणी पासून अवघ्या १५-२० किलोमीटरवर आहे. थंड वातावरण आणि निसर्गरम्य दृश्याने पाचगणी समृद्ध आहे. प्रत्येक हिलस्टेशनवर असतात तशा प्रेक्षणीय पॉईंट्सवरून तुम्ही इथला निसर्ग पाहू शकता. यापैकी हत्तीच्या सोंडेसारखा दिसणारा पॉईंट प्रसिद्ध आहे.

 

तर मंडळी, कशी वाटली ही यादी. मग या उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोणत्या ठिकाणाची निवड करताय ?

 

आणखी वाचा :

उन्हाळ्याच्या सुटीत या ठिकाणी जायचा विचारही करू नका..

उन्हाळ्यात मोबाईल वापरताना या ६ गोष्टी लक्षात ठेवा !!

कडाक्याच्या उन्हात हे जरूर सांभाळा...!!

उन्हाळा लागणे म्हणजे का ? त्यावरचे घरगुती उपाय बघून घ्या राव !!

कापड्यांवरचे डाग घामाचे नाहीत बरं...जाणून घ्या कशाने हे डाग पडतात आणि ते काढायचे कसे !!

 

सबस्क्राईब करा

* indicates required