computer

तण खाई धण की तण देई धन? वाचा श्रावणाच्या कथेतल्या केना-कुर्डू भाजीबद्दल!!

बोभाटाच्या बागेत आज पुन्हा एकदा स्वागत आहे. पण वाचकहो, आज बागेतून तण काढून टाकण्याचा कार्यक्रम चालू असल्याने आम्ही जरा जास्तच कामात आहोत. पण या निमित्ताने थोडं तणाबद्दल बोलूया!  

तणाबद्दल 'तण नेई धन' इतकंच काय ते आपल्याला माहिती असतं. आता तण म्हणजे काय, तर आपल्याला नको असलेली पण जमिनीत सहज वाढणारी कोणतीही वनस्पती! म्हणजे तुम्ही शेतात तूर लावली असेल तर तुरीशिवाय बाकी सगळं तण! हा फरक आपण आपल्या स्वार्थापोटी केलाय म्हणा ना! निसर्गाला सगळ्याच वनस्पती सारख्या म्हणून पावसाच्या चार सरी येऊन गेल्या की बागेत तण माजणारच!  

बघा, मनुष्य स्वभाव कसा असतो. नको असलेली वनस्पती उगवली तर आपण लगेच 'माजली' असा शब्द वापरतो! एक गोष्ट मात्र नक्की, तणाइतकी जगण्याची प्रखर इच्छा फारच कमी बघायला मिळते. अगदी वणव्याने जळून गेलेल्या मातीतही पहिली वस्ती तणांची असते. तणांमध्ये औषधी वनस्पती असतात, अनेक भाज्या असतात, तरीपण त्या आपल्याला 'नकुशा' असतात. तण आपल्या बागेतली माती, पाणी, खत या 'फॅसिलीटीज' तण फुकटात वापरतं म्हणून तणाचा शक्य तितक्या लवकर नायनाट केला जातो. 

आज आपण एकदम 'श्रावण स्पेशल' तणांची माहिती घेऊ या. श्रावणाचा इथे खास उल्लेख करण्याचा उद्देश असा की यांपैकी एका वनस्पतींचा, म्हणजे केनाचा (आणि कुर्डुचा) उल्लेख चातुर्मासातल्या व्रतांच्या कहाण्यात 'केनाकुर्डुची भाजी करावी' असा असतो. 

(केना)

लांबट हिरवी पानं असलेल्या केन्याच्या पानाची कुरकुरीत भजी छानच होतात. थोडीशी कडसर चव असते खरी, पण खायला मजा येते! हे झाले जिभेचे चोचले पुरवणे. पण अत्यंत दुष्काळी भागात केना फॅमीन फूड म्हणून ओळखली जाते. आशियातल्या बहुतेक देशांमध्ये 'केना' आढळतेच, पण अमेरिकेतल्या शेतकर्‍यांना या भाजीने अगदी नको करून सोडलं आहे. अमेरिकेच्या Federal Noxious Weed List मध्येही केना आढळतो. आपल्याकडे मर्यादित स्वरुपात उगवणारा केना अमेरिकेत बायर कंपनीचे ' ग्लायकोफॉसेट' हे जहाल तणनाशक वापरून नाहीसे करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण केना त्यालाही दाद देत नाही. त्यामुळे त्याला 'वाँडरींग ज्यू' असं टोपण नाव आहे का काय? हा संशोधनाचा विषय आहे. पण याचे शास्त्रीय नामकरण Commelina benghalensis आहे, तर दुसरं फेमस नाव बंगाल डे फ्लॉवर असे  आहे. 

केन्यासोबत या मोसमात भरभरून उगवणारी भाजीच्या वर्गात मोडणारी वनस्पती म्हणजे कुर्डू. पण कुर्डूची गणना तणात होत नाही. म्हणून कुर्डूबद्दल नंतर कधीतरी वाचू या. तर आज तणाची इतकी माहिती पुरे. कारण श्रावणात भेटीला येणार्‍या इतरांसाठी वेळ राखून ठेवायला हवे!!

 

लेखिका : अंजना देवस्थळे

सबस्क्राईब करा

* indicates required