computer

बोभाटाची बाग : भाग १४ - बागेतला श्रावण म्हणजे तेरड्याचे रंग आणि पेवाचं फुटणं -जाणून घ्या !

या, आज आपण बोभाटाच्या बागेत फिरता फिरता मराठी भाषेचाही अभ्यास करू या! आश्चर्य वाटायला नको. निसर्गाशी आपलं आयुष्य इतक्या सहजतेने जुळलेलं असतं की काही वेळा नेमकं सांगितल्याशिवाय ते लक्षातही येत नाही. 

बघा, पळसाला पाने तीन, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, अळवाची खाज अळवासच ठाऊक.. हे आणि असे अनेक वाक्प्रचार-शब्दप्रयोग- म्हणी यांचं मूळ झाडांशी, वृक्षांशी, वनस्पतींशी अगदी सहज जोडलं गेलं आहे. 

छोटी सी ये ज़िंदगानी रे
चार दिन की जवानी तेरी
हाय रे हाय
ग़म की कहानी तेरी...

हे गाणं तुम्ही ऐकलंय का? या गाण्याची कथा हुबेहूब जोडली गेली आहे बागेत उगवणार्‍या तेरड्याशी! पाऊस पडला की तेरडा घाईघाईने उगवतो. ज्या घाईने उगवतो त्याच वेगाने पानांचा पसारा वाढतो. पानं आपापल्या जागेवर स्थिरस्थावर होत आहेत नाही तेवढ्यात जांभळ्या रंगाची, वार्‍याची झुळूक आली की कानातल्या डूलासारख्या हलणार्‍या फुलांचा बहर येतो आणि लगेच काही दिवसांत फळही धरतं. या फळाची गंमत अशी की अगदी पावसाच्या थेंबाच्या आघाताने ते उलगडतं आणि बिया मातीत जमा होतात. थोड्याच दिवसांतच शो खतम! तेरडा दिसेनासा होतो. बस्स! पुन्हा आपली भेट पुढच्या पावसाळ्यात!  

हे सगळंच घाईघाईत म्हणून त्याला इंग्रजीत Impatiens balsamina म्हणतात आणि मराठीत तर 'तेरड्याचा रंग तीन दिवस 'ही म्हण आपण ऐकतच असतो. 

मराठीत अनेक वेळा ' पेव फुटणं ' हा वाक्प्रचार तुम्ही ऐकला असेलच! बातम्यांचं पेव फुटलं, अफवांचं पेव फुटलं.. थोडक्यात सांगायचं तर, कमीतकमी वेळात जास्तीतजास्त फैलावणार्‍या, पसरणार्‍या, व्हायरल  होणार्‍या कशाशीही 'पेव फुटणे ' हा शब्दप्रयोग जोडला जातो. त्याचं कारण आहे 'पेव' ही वनस्पती. वर्षभर पेवाची मुळं जमिनीखाली निद्रीस्त असतात. पाऊस पडला की उगवून इतक्या जलद गतीने पसारा वाढवतात की त्या वेगाला बघून आपण  'पेव ' फुटणे हा शब्दप्रयोग करायला सुरुवात केली.

Costus Speciosus असं शास्त्रीय नाव असलेली वनस्पती आल्याच्या जातीची आहे. झुडुपाच्या जातीत तिचं वर्गीकरण होतं. पावसाळ्यातही सहज सूर्यप्रकाश मिळावा म्हणून या वनस्पतीच्या पानांची रचना आवर्ती असते. ही रचना बघितल्यावर जुन्या इमारतीतल्या स्पायरल स्टेअरकेसचीच आठवण होते. बरं, ही सगळी धडपड कशासाठी? तर बागेत "आमच्या सर्वत्र शाखा आहेत" हे सांगायची घाई या वनस्पतीला असते. पावसाळ्यात थोड्याच दिवसांत या झुडुपाचं रान माजतं. याच घाईगर्दीच्या काळात गुलाबी दांड्यावर पांढरी शुभ्र फुलंही उगवतात. सगळं काही झटपट! इतकंच नाही तर पावसाळा संपला की लगेच अवतार समाप्तीची घोषणा! नंतरच्या पावसाळ्यात पुनश्च हरीओम! चार पाच महिन्यांचं आयुष्य आपल्या नजरेस येतं, पण बँकेत ठेवलेल्या फिक्स्ड डिपॉझीटसारखी मुळं आत जिवंतच असतात. 

हे तर अगदी सरसकट वापरले जाणारे भाषेचे प्रयोग. पण महाराष्ट्रातल्या आदिवासी बोलीभाषांमध्ये असे अनेक नमुने वाचायला मिळतात. पण ते नंतर कधीतरी!!

 

लेखिका : अंजना देवस्थळे

सबस्क्राईब करा

* indicates required