computer

बोभाटाची बाग - भाग १५ : पतंग- ज्योत, भुंगा-फूल यांची कविकल्पना खरी की प्रकरण दुसरंच काही असतं?

आमच्या बोभाटाच्या बागेत आम्ही काही दिवसातच कवी लोकांना येण्याची बंदीच करणार आहोत. आता तुम्ही नक्की विचाराल की या कवींनी काय घोडं मारलं आहे? तर त्याचं असं आहे की ही कवी मंडळी दिवसरात्र रोमँटीक कल्पनांचे चष्मे लावून फिरत असतात आणि साधा सृष्टीतला 'लेन-देन'चा व्यवहारही त्यांना अमरप्रेमासारखा दिसत असतो.

आता बघा, बागेत फुलपाखरं असतात आणि पतंग ही असतात. दिवसा हे लोक फुलपाखरांवर कविता करतात आणि रात्री पतंगांवर! त्यांचा प्रेमाचा आवडता सिध्दांत म्हणजे जीवाची तमा न बाळगता ज्योतीवर झेपावणारा पतंग! त्याला ते सच्च्या प्रेमाचं प्रतिक मानतात. या प्रेमप्रकरणातलं सत्य असं आहे की पतंग हे 'नॉक्टर्नल' म्हणजे रात्री फिरणारे जीव असतात. त्यांना ज्योतीचा प्रकाश दिसतो आणि ते तिकडे झेपावतात. बस्स! इतकंच. प्यार वगैरे काही नाही. पण हिंदी आणि उर्दूत 'शमा-परवाना'च्या अफेअरवर शेकडो शेर लिहिले गेलेत.

हे झालं पतंगाबद्दल. फुलाभोवती फिरणार्‍या भुंग्यांमध्ये पण या कवींना प्रेमाचा साक्षात्कार होतो. खरंतर इथेही असं काहीही नसतं. फुलांचे रंग आणि गंध मधमाशा-भुंगे यांना भुलवतात. येथपर्यंत सगळं काही रोमँटीक कवितेप्रमाणे चालू असतं. यापुढे मात्र जो सुरु होतो तो व्यवहार! फुलं काही भुंग्यांच्या प्रेमात पडलेली नसतात. त्यांना परागकण इकडून तिकडे नेणारा आणि परागकण आणणारा 'कुरीयरवाला' हवा असतो.

या व्यवहाराचं चोख उदाहरण आज तुमच्यासमोर या छोट्या व्हिडीओतून आम्ही दाखवतो आहोत. या व्हिडीओत तुम्हाला दिसत आहेत वॉटर लिलीची फुलं. आपण बाजारात ही फुलं 'कमळ' म्हणून विकत घेतो. पण ही कमळं नाहीत. कमळ म्हणजे लोटस हे त्याच्या दांडीवर पाण्याच्यावर उभे असते. या फोटोत दिसत आहेत ती कमळासारखी दिसणारी वॉटर लिली ची फुलं! ही पाण्यावर तरंगत असतात. भुंग्याला आकर्षण त्यातल्या गोड मधाचं म्हणजे फुलातल्या नेक्टरचं! तो नेक्टरचा कण हस्तगत करता करता भुंगा सापळ्यात अडकतो.

ज्ञानेश्वरीत 'कां कमळावरी भ्रमर। पाय ठेविती हळुवार। कुचुंबैल केसर। इया शंका' म्हणजे केसराला धक्का लागू नये म्हणून भुंगा केसरावर अलगद पाय ठेवतो असा उल्लेख आहे. पण प्रत्यक्षात घडते असे की हळूवार पाय ठेवणारा भुंगा त्या नेक्टरच्या मोहात पडून धडपडतो, पंख ओले-चिकट होतात आणि सुटका कठीण होते. चिकट नेक्टरमध्ये लडबडलेल्या काहीच भुंग्यांना सुटका मिळते. पण बहुतांश भुंगे त्या 'हनी ट्रॅप' मध्ये अडकून संपतात. आता हे सगळं कवी बघत असतो आणि त्याला ते ज्यामच रोमँटीक वाटत असतं. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर हा एक निसर्गसृष्टीत रोज घडत असलेला व्यवहार असतो, बाकी काहीही नाही. भुंग्यांना त्यांचं अन्न मिळवायचं असतं आणि फुलांना १०० टक्के परागीभवनाची खात्री करून घ्यायची असते.

असे हनीट्रॅप अनेक फुलांत बघायला मिळतात. या भुंग्यांना अडकवून परागीकरण करून घेणारं एक नेमकं उदाहरण म्हणजे सेरोपेगीआ जैनी (Ceropegia jainii) या फुलाचं! एखाद्या छत्रीसारख्या पाकळ्या असणार्‍या या फुलांना लांब दांडी असते. मधमाशी किंवा तत्सम किटक मधाच्या आशेने या दांडीच्या आत आत येत राहतो. पोकळ दांडीच्या आत आलेल्या किटकाला बाहेर पडायचा मार्ग मात्र मिळत नाही. त्यामुळे तो आतच अडकतो. पण या प्रकरणात वॉटर लिलीत अडकलेल्या भुंग्यासारखा जीव जात नाही. एकदा का संध्याकाळ झाली की ते फूल मान खाली घालतं आणि किटकाला जिवंत बाहेर पडण्याचा रस्ता मिळतो. या फुलांच्या परागीकरणाचा विशेष अभ्यास एका जैन नावाच्या अभ्यासकाने केला म्हणून या फुलाचे नाव सेरोपेगीआ जैनी!

तशी आम्हाला कवींची अ‍ॅलर्जी वगैरे काही नाही, कारण काही वेळा अज्ञानातच जास्त सुख असतं हे खरं आहे!!

सबस्क्राईब करा

* indicates required