computer

बोभाटाची बाग - भाग ९ : सीतेची वेणी उर्फ ऑर्किड....२५००० ऑर्किड पैकी एक आपण चक्क आवडीने खातो!!

आज इतका गच्च पाऊस पडतोय आणि आम्ही तुम्हाला बागेत फिरायला घेऊन जातोय हे जरा जास्तच होतंय नाही का? पण आज आम्ही ज्या फुलाची आणि  तुमची ओळख करून देतोय ती या पहिला पाऊस पडताच बहरून येतात. आपली गावाकडली माणसं या फुलांना सीतेची वेणी म्हणतील तर शहरातून आलेले पाहुणे या फुलांना पाहिल्यावर  'ओह ! ऑर्कीड ' असं म्हणतील. आम्ही मात्र त्यांना 'आमरी'  म्हणतो. बर्‍याच जणांना 'ऑर्कीड' ला आमरी म्हणतात हे माहिती नसेल. हे नाव तसं समूहवाचक आहे, कारण या जातीची जगभरात २५००० फुलं बघायला मिळतात. आपल्या पश्चिम घाटात ३०० हून अधिक आमरीचे प्रकार बघायला मिळतात. 

आधी ज्या सीतेच्या वेणीचा उल्लेख केला ते ऑर्कीड पावसाळ्यातच बघायला मिळतं. ऐन, फणस, आंबा, मोह , शिसम या झाडांवर ही फुलं बहरून येतात. लांब, गुलाबी, जांभळट, जांभळट-पांढर्‍या रंगाचे गच्च गुंफलेल्या माळा पावसाचे स्वागत करत असतात. Rhincostylis Retusa असं शास्त्रीय नाव असलेल्या या फुलांना आसाम मेघालयात प्रेमाचं प्रतिक समजलं जातं. लग्नात नवरा नवरीच्या केसांत ही फुलं माळतो. 

या सर्व ऑर्कीड प्रजातीचे एक वैशिष्ट्य असं आहे की ही फुलं अनेक दिवस, अनेक आठवडे झाडावर टिकून राहतात, कोमेजत नाहीत. त्याचं कारण असं की या वनस्पतीचं परागीकरण फक्त विशिष्ट जातीचे किटकच करू शकतात. साहजिकच परागीकरणाला पुरेसा वेळ मिळावा यासाठी फुलांना फुलत फुलत झुरत राहणं आवश्यकच असतं. हे झालं परागीकरणाचं. पण पुढची पायरी आणखी कठीण असते. ऑर्कीडचे फळ शेंगेसारखे असते. त्यात पावडरीसारख्या अतिसूक्ष्म बिया असतात. या बियांना उगवून येणे थोडे कठीणच असते. बियांमध्ये स्वतःचे अन्न नसल्यामुळे अंकुर उगवणे बुरशीवर अवलंबून असते. 

एकूण आमरी किंवा ऑर्कीड या फुलांचा अभ्यास करायचा म्हटला तर अनेक वर्षं त्यात निघून जातील. आकर्षक रंग, परागीकरणाच्या तर्‍हा , किटकांना आकर्षित करुन घेण्याच्या क्लृप्त्या, हा सगळा फारच मोठा अभ्यास आहे. म्हणून आम्ही तुम्हाला काही खास गोष्टीच सांगणार आहोत.

बर्‍याच उद्यानात आता मानवनिर्मित ऑर्कीडच्या जाती बघायला मिळतात. त्यांची नावं पण निर्माताच ठरवतो. फिल्म स्टार शाहरुख खान, लेडी डायना यांच्या नावाचीही ऑर्कीड बघायला मिळतील.

आपल्या अनेक आवडत्या खाद्यपदार्थात एका ऑर्कीडच्या सुगंधाचा वापर केला जातो. ते ऑर्कीड म्हणजे व्हॅनिलाचं ऑर्कीड! व्हॅनिला हे वेलवर्गीय ऑर्कीड आहे. त्याची लागवड केरळात केली जाते. समस्या अशी आहे की परागीकरण करणारे किटकच आपल्याकडे नाहीत म्हणून ब्रशच्या साह्याने परागीकरण करावे लागते. त्यानंतर ज्या शेंगा वेलीवर येतात त्या सुकवून व्हॅनिलाच्या इसेन्सची निर्मिती केली जाते. 

(व्हॅनिला ऑर्कीड)

बघा. असा बागेतला एक फेरफटका काहीवेळा वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो.

 

लेखिका : अंजना देवस्थळे

सबस्क्राईब करा

* indicates required