नवीन ट्रॅफिक नियमानंतर या ९ जणांनी भरलेत सर्वाधिक दंड !!

नविन ट्रॅफिक नियम आल्यापासून सगळीकडे त्याचीच चर्चा आहे. अनेकांनी या निर्णयाचा धसका घेतला आहे. सोशल मीडियावर या संबंधीचे मीम्सपण खूप वायरल होत आहेत. कारण गोष्टच तशी आहे राव!! गाडीच्या किमतीपेक्षा दंडाची रक्कम जास्त आहे.
१ सप्टेंबरपासून हा नियम लागू झाला. तेव्हापासून अनेकांचे खिसे हलके व्हायला लागले. पण काहींना झालेल्या दंडाचे आकडे ऐकून बोटे तोंडात जातील राव!! आजपर्यंतचे सवार्धिक दंड कुणाकुणाला झाला हे आज आम्ही सांगणार आहोत.
1) २३,०००
गुरूग्राममध्ये पहिल्याच दिवशी एकाला तब्बल २३ हजारचा दंड बसला. नियम लागू होऊन अगदी काही तास झाले होते. आणि त्याला २३ हजारचा फटका बसला. त्याला ५ वेगवेगवेगळ्या कारणांसाठी दंड झाला होता. विना लायसन्स, विना रजिस्ट्रेशन, विना इन्शुरन्स, विना हेल्मेट गाडी आणि नो पॉल्यूशन सर्टिफिकेट विना गाडी चालवणे या सर्व गोष्टींसाठी त्याला दंड झाला होता.
2) २७,०००
दिल्लीत एका ३ सप्टेंबरला २७ हजारचा दंड झाला. याला तर चक्क फिटनेस सर्टिफिकेट नाही म्हणून पण दंड लावला होता राव!! तसेच पोलिसांशी गैरवर्तन केले म्हणून पण दंड लावण्यात आला होता.
3) ५९,०००
४ सप्टेंबरला दिल्लीतल्याच एका ट्रक ड्रायव्हरला ५९ हजारचा दंड भरावा लागला. याला तर वेगवेगळी दहा कारणे सांगून दंड भरायला लावला. त्यात विना लायसन्स सारख्या कारणापासून तर ट्रॅफिक तोडल्यापर्यंतचे नियम यासारख्या गोष्टी होत्या.
4) ३२,०००
गुरूग्राममधील एका ऑटोवाल्याला ३२ हजाराचा दंड बसला. आता एवढे पैसे कमवण्यासाठी त्याला किती दिवस रिक्षा चालवावी लागेल विचार करा! रेड लाइट सिग्नल तोडून जात असताना त्याला पोलिसांनी पकड़ले आणि वेगवेगळ्या नियमानुसार ३२ हजाराचा दंड लावून त्याचा खिसा खाली करून टाकला.
5) १६,०००
हरियाणाच्या एका स्कुटीवाल्याला सोळा हजारचा फाईन भरायला सांगितले. त्याने नकार दिल्यावर पोलिसांनी त्याची स्कुटी जमा करून टाकली. तो तरी काय करेल राव!! एवढ्या सोळा हजारांची त्याची स्कुटीसुद्धा नसेल.
6) ४७,०००
ओडिशामधील ऑटो ड्रायव्हरला ४७ हजारांचा दंड लावण्यात आला. एवढ्या रकमेत तर तो दुसरी रिक्षा घेऊन घेईल राव!! पण एकदाचा दंड बसला म्हणजे तो भरावाच लागतो. दारू पिऊन रिक्षा चालवत आहे असा ठपका त्याच्यावर पोलिसांनी ठेवला होता. तसेच इतर दुसरे नियम तोडले यासाठी त्याला एवढी मोठी रक्कम भरावी लागली.
7) ८६,५००
ओडिसामध्ये एका ट्रक ड्रायव्हरला नव्या नियमानुसार ८६ हजार ५०० रूपयांचा दंड आकारण्यात आला. प्रमाणापेक्षा जास्त ओझं घेऊन ट्रक चालवणे, विना लायसन्स चालवणे असे ठपके त्यावर ठेवण्यात आले होते. जवळपास ५ तास विनवण्या केल्यावर ७० हजार घेऊन त्याला सोडून देण्यात आले.
8) १,४१,०००
दोन दिवसांपूर्वी एकाने १ लाख ४१ हजार एवढा प्रचंड दंड भरला आहे. तो बिचारा ट्रक ड्रायव्हर आहे पण नियम तोडले तर शिक्षा होईलच!! नव्या नियमानुसार त्याच्या कडून संपूर्ण दंड वसूल करण्यात आला आहे.
9) २,००,०००
हा आहे आतापर्यँत सर्वात जास्त दंड भरलेला गडी! भावाने डायरेक्ट 2 लाखाचा दंड भरला आहे. दिल्लीतल्या ट्रक ड्रायव्हरला एवढा प्रचंड दंड भरावा लागलेला आहे. वेगवेगळे नियम लावून त्याच्या दंडाची रक्कम २ लाख ठरली. आतापर्यंतचा रेकॉर्ड मात्र त्याने स्वतःच्या नावावर केला आहे राव!!
तर मंडळी हे आहेत आतापर्यंत दंड भरलेले सर्वात जास्त आकडे. तुम्ही नियम पाळून वाहन चालवा नाहीतर पुढच्या वेळी या यादीत तुमचा नंबर नको दिसायला...
लेखक : वैभव पाटील.