मराठी पाऊल पडू दे पुढे - ‌‌‍शिप ब्रेकींग - भाग दोन !!!

मराठी पाऊल पडू दे पुढे - ‌‌‍शिप ब्रेकींग - भाग एक !!!

 

शिप ब्रेकींगच्या दुसर्‍या भागात आधी आपण त्या व्यवसायाला आवश्यक अशी पार्श्वभूमी समजून घेणार आहोत. सर्वप्रथम शिप ब्रेकींग म्हणजे आपण नक्की काय करणार आहोत?  हे आधी व्यवस्थित समजून घेऊ या. या व्यवसायात अनेक व्यक्ती एकाच वेळी काम करत असतात, त्यांचे वेगवेगळे "रोल" असतात आणि आपण या शृंखलेत कुठे आहोत ते आधी बघू या !!

शिप ब्रेकर : हा जहाज परदेशातून विकत घेतो आणि धक्क्याला लावतो. सर्व सरकारी परवानग्या-परवाने ही त्याची जबाबदारी असते. जहाज आणण्यासाठी लागणारा पैसा हा त्याचा असतो. थोडक्यात हा नाटकाचा निर्माता आहे असे समजू या! हा रोल आपला नाही.

लेबर कंत्राटदार: प्रत्यक्ष जहाज कापणे  हे काम त्याचे असते. त्याच्या हाताखाली शेकडो मजूर काम करत असतात. कटींग साठी लागणारे सर्व सामान उदाहरणार्थ-क्रेन्स-विंच-गॅसचे मोठे बाटले वगैरे वगैरे. हा रोल पण आपला नाही.

या नंतर नंबर लागतो आपला म्हणजे व्यापार्‍यांचा!! जहाज तोडताना जे शेकडो प्रकारचे भंगार निर्माण होते त्याची खरेदी करून विक्री करणारे ट्रेडर हा आपला रोल आहे. यासाठी थोडेसे भांडवल आणि ज्याप्रकारचे भंगार खरेदी करायचे आहे त्या भंगार प्रकाराची माहिती!!

ब्रेकिंगसाठी येणारी जहाजे वेगवेगळ्या आकाराची-वजनाची-वेगवेगळ्या उपयोगाची असतात. मुंबईत येणारी जहाजे मध्यम आकाराची असतात. मोठी जहाजे गुजरातमध्ये भावनगरजवळ अलांग येथे ब्रेकींगसाठी घेतली जातात. जहाजाचा पुढचा भाग ज्याला इंग्रजीत ’बो’ म्हणतात, त्याला बोलीभाषेत नाल किंवा नाळ म्हणतात. तर मागच्या भागाला स्टर्न किंवा आपल्या भाषेत धमोसा म्हणतात. या दोन्हींच्या मधल्या भागात कर्मचार्‍यांना राहण्यासाठी केबीन असतात. सगळ्यात वरच्या मजल्यावर ब्रिज आणि कम्युनिकेशन रूम असतात. या रुममधून जहाज चालवले जाते. या राहण्याच्या केबीन्स वगळता उरलेली जागा जहाजाच्या प्रकारानुसार वापरलेली असते.

या मध्यम आकाराच्या जहाजांत असतात कार्गो जहाजे, रीफर जहाजे, फिश फॅक्टरी जहाजे आणि टँकर जहाजे. कार्गो जहाजावर अनेक कंटेनर ठेवण्याची व्यवस्था असते. रीफर जहाज हे संपूर्ण वातानूकुलीत असते. रीफर जहाज नाशवंत मालाची वाहतूक करतात त्यामुळे संपूर्ण जहाजाची रचना अवाढव्य रेफ्रीजेरेटर सारखी असते. बाल्टीक समुद्रात मच्छीमारी करून, माशाचे तेल जहाजावर काढून पॅक केले जाते-अशा जहाजाला फिश फॅक्टरी म्हणतात. यांखेरीज तेल किंवा गॅसची ने -आण करणारी टँकर जहाजे असतात. तूर्तास ही माहिती पुरेशी आहे.

आता, आपण बघू या आपल्याला व्यवसायाची संधी कुठे मिळते ते !!

जहाजाची कापणी करण्यापूर्वी जहाजातील ज्वालाग्राही आणि पेट घेऊ शकतील असे सर्व सामान बाहेर काढले जाते. पहिला नंबर लागतो तो - जहाजात शिल्लक असलेल्या इंधनाचा म्हणजे डिझेल- फर्नेस ऑइल आणि लुब्रिकंट ऑइलचा !!

हे सर्व तेलाचे प्रकार हातोहात विकले जातात. आमचा सल्ला मानाल तर, नव्या माणसाने या तेलाच्या व्यापारात न पडलेलेच बरे असते. या व्यापारासाठी लागणारे परवाने पेट्रोलपंपाचे  मालक यांच्याकडे असतात. यासाठी कस्टम आणि एक्साइजच्या अद्यावत कर प्रणालीची माहिती असावी लागते किंवा सगळे कायदे धाब्यावर बसवून काम करण्याचे धाडस असावे लागते. पुढे मागे अनुभव गाठीशी लागला की लुब्रीकंट ऑइलच्या विक्रीत हात घालायला काही हरकत नाही.

आपण सुरुवातीला हात घालू या केबिन्सच्या व्यवसायात. शिप ब्रेकरच्या दृष्टीने केबिन हा त्याच्या कामातला अडथळा असतो. केबिन्स म्हणजे बहुमजली तरंगते हॉटेल असते असे समजा. कर्मचार्‍यांच्या रहाण्याच्या जागा- फर्निचर-दरवाजे- भिंती-किचन-बेकरी-अन्नधान्य साठवण्याची कोल्ड स्टोअर्सकपडे धुण्याच्या अवाढव्य लाँड्र्या-ब्रिज रुम -कम्युनीकेशन रुम वगैरे सगळे केबिन्सच्या अंतर्गत येते.

या केबिन्समधल्या लाकूड-कपडे- प्लॅस्टीक-कागद-कार्पेट आणि इतर अनंत वस्तूंची वासलात लावणे शिपब्रेकरच्या दृष्टीने एक कटकटच असते. पण त्याची कटकट म्हणजे आपली संधी असे समजा आणि कामाला लागा. एक महत्वाची बाब अशी की केबिनचा सौदा यशस्वी पार केला तर तुमची लायकी 'जनरल मॅनेजमेंट' या विषयात एमबीए केल्याइतकी वाढेल.

केबिन्ससाठीची पूर्वतयारी -

केबिन एरिया विकत घेण्यसाठीआधी केबिन्सचा अंदाज घ्यावा लागतो. त्या साठी शिपब्रेकरची परवानगी घेऊन मुकादमासोबत जहाजावर चढावे लागते. जहाज एका मैदानासारख्या धक्क्यावर उभे असते. त्याच्याएका बाजूला  चौकोनी भगदाड पाडून एका hold मध्ये प्रवेश मिळतो. या hold मधून वर जाणार्या लोखंडी शिड्या असतात. काही वेळा वरून दोरीची शिडी सोडली जाते.

महत्वाची सूचना: अशी visit करताना पायात बूट आणि डोक्यावर टोपी असणे अत्यावश्यक आहे. चप्पल सॅंडल्स टाळावे. दमा बीपी वगैरे असलेल्या लोकांनी वर जाऊच नये.

 पहिला प्रवेश gangway मधून केबीनकडे जातो. आता येथे आपल्या निरिक्षणाची कसोटी असते . 

केबिन्समध्ये काय पाहावे ? 

केबिनचा साइज आणि एका मजल्यावरच्या केबिन्सची संख्या नोंदून ठेवणे आवश्यक आहे.

केबिनचे दरवाजे: दरवाज्याचे मटिरिअल काय आहे ते आधी बघावे. प्लायवुड? ब्लॉकबोर्ड? पार्टिकल बोर्ड?  नक्की काय आहे ते बघावे. दरवाज्याच्या कड्या-कुलपे कोणत्या मालाची आहेत ते तपासावे. पितळ? स्टेनलेस स्टील?  याचा अंदाज घ्यावा.

आता केबिन्सच्या आतील बाजूचे निरिक्षण करावे.

केबिनच्या भिंती- भिंतीचे मटेरियल बघावे. प्लायवुड की ब्लॉकबोर्ड ? सिमेंटशीट ? भिंतीच्या अटॅचमेण्ट्स म्हणजे इलेक्ट्रिकल फिटिंग बघावे. भिंतीवर घड्याळ-पंखे-स्पीकर-फोन-कड्या-कोयंडे हे सगळे तपासून घ्यावे .

वॉश बेसीन - टॉयलेटचे नळ पितळेचे आहेत का? क्रोम प्लेटेड आहेत की स्टेनलेस स्टीलचे आहेत याची- छाननी करावी.

पायाखाली कार्पेट कसले आहे ? प्लास्टिक की कॉटन ?

जर तुम्ही अगदी तळाजवळच्या मजल्यावर असाल तर केबिन्सचे रंगरूप मनास येण्यासारखे नसते. जसे तुम्ही वरच्या मजल्यावर जाल तसे तिचे रूप बदलत जाते. कारण सोपे आहे, वापरणार्‍याच्या  हुद्द्याप्रमाणे केबिनच्या दर्जांत बदल होत असतो. पण शेवटी हे सगळे तोडमोड करूनच बाहेर पडते.

एक मुद्दा जो आपण पाहिला नाही तो आहे फर्निचरचा!! खुर्च्या वगळता बाकी सर्व फर्निचर भिंतीला जोडलेले असते. पलंग आणि टेबल या सर्वाना दोनच पाय असतात. म्हणजेच 50% अधिक फर्निचर पुन्हा उपयोगात येणारे नसते.

आता आपण इतर केबिन्सकडे जाऊ या!

सर्वात आधी किचन बघू या. इथे बहुतेक सगळे स्टील किंवा ऍल्युमिनियममध्ये बनवलेले असते.  सोबत बेकरी असेल तर मैदा मळण्याची मशीन्स असतात. मोठ्या प्रमाणात अन्न शिजवण्याची भांडी आणि इतर बरीच क्रोकरी असते. येथे असलेले ओव्हन भंगारात टाकण्यायोग्यच असतात. पण मेटल चा विचार केला तर मेटल भरपूर असते.

या नंतर कोल्ड स्टोरेज मध्ये जाऊ या.

येथे चारी बाजूस अल्युमिनियमचा पत्रा असतो आणि त्यामागे वॉटरप्रूफ प्लायवूड असते. ते नसले तर देवदाराच्या लांब रुंद फळ्या असतात. स्टोअरमधे उरलेला माल केबिनवाल्याचा असतो.  पण डबाबंद माल वगळता बाकी ताबडतोब फेकण्याचा असतो. कोल्ड स्टोअरेजच्या आत थंडावा करणारी यंत्रणा म्हणजे पाइप्स आणि कंप्रेसर असतात. त्याची नोंद घेऊन आपण आता लॉंड्री मध्ये जाऊ या. इथे मोठी इंडस्ट्रियल मशीन असतील तर त्याला भाव चांगला मिळतो. पण आधुनिक वॉशींग मशिन्स असतील तर फार कमाईचा चान्स नाही.  पण मेटल भंगार म्हणून मिळेल.

आता शेवटी ब्रिजरूम मध्ये जाऊ या ! इथे भरपूर मेटल असलेले साहित्य असते. काही वस्तू फार मौल्यवान असतात. पण लक्षात घ्या, त्याची किंमत विकत घेताना भंगाराचीच असते.

आता हा फ़ेरफ़टका संपला !  महत्वाचा प्रश्न असा आहे की यात धंदा कुठे आहे ??

आधी लूज सामान म्हणजे केबिनमध्ये पडलेल्या अगणित छोट्या मोठ्या वस्तू बघू या!! याची यादी करणे अत्यंत कठीण आहे. पण आपण एक अंदाज करू शकतो. एका मध्यम आकाराच्या जहाजात साधारण एक दीड टन रद्दी कागद, साताठशे किलो प्लास्टीक आणि अर्धा एक टन चिंधी निघते. या प्रत्येक आयटमचा छोटा व्यापारी धक्क्यावर उभाच असतो. हे सर्व सामान हातोहात विकले जाते.

यानंतर  दरवाजांचा नंबर लागतो. ब्लॉकबोर्डचे दरवाजे वजनाने भारी असतात. एका दरवाजाला सातशे आठशे ग्रॅम पितळ चिकटलेले असते. हे दरवाजे पुन्हा वापरण्यासारखे असतात.  प्रत्येक दरवाजा नगावर विकला जातो. दरवाजे जर पार्टीकल बोर्डचे असतील तर ते वजनावर विकले जातात. पार्टीकल किंवा ज्याला भुसा बोर्ड म्हणतात ते वॉटरप्रूफ नसतात. म्हणून त्याची वासलात धक्क्यावरच करावी. आता हातात राहिले केबिन वॉलचे प्लायवुड आणि इतर लाकडी पट्ट्या वगैरे. हे देखील वजनावरच विकले जाते. एक महत्वाची बाब येथे लक्षात घेण्याची आहे ती अशी की, केबिन हातात आल्यावर सर्व लाकूड या सदरात मोडणार्‍या सर्व वस्तू तातडीने विकणे महत्वाचे असते.

हातात राखून ठेवावे ते फक्त मेटल !! नजर निगराणी ठेवावी लागते ती मेटलव र!! एक किलो मेटल म्हणजे वीस किलो लाकूड असा फॉर्म्युला लक्षात ठेवले की झाले !!


लाकूड-कागद-प्लास्टीक हातावेगळे झाले की मेटल जमा करण्याचे काम सुरु होते. इलेक्ट्रीकल पॅनेल्स, लाँड्री- किचन-ब्रिज रुम-कोल्ड स्टोअरेज-स्टेअरकेस हे सर्व मोड करून आपल्या गोदामात नेणे अत्यावश्यक आहे.

लेखन मर्यादा लक्षात घेता इतकी माहिती पुरेशी आहे . तुमचे अनेक प्रश्न असतील तर ते जरूर विचारा!! सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे मिळतील .

त्यानंतर आपण वळू या शिप ब्रेकींग या व्यवसायातील इतर संधींकडे !!!

 

(महत्वाची टीप : 'बोभाटा' चा आणि या व्यवसायाचा कोणाताही आर्थिक किंवा इतर व्यवहार किंवा हितसंबंध नाहीत हे येथे नमूद करणे आवश्यक आहे. )

 

आणखी वाचा :

मराठी पाऊल पडू दे पुढे - ‌‌‍शिप ब्रेकींग - भाग एक !!!​​​​​​​

मराठी पाऊल पडू दे पुढे - भाग एक - ‌‌‍पडतर मालाचा व्यापार !!!
मराठी पाऊल पडू दे पुढे - भाग दोन - ‌‌‍इंडस्ट्रीयल सरप्लस !!!

सबस्क्राईब करा

* indicates required