आयला !! तब्बल ९००० रुपयांची मिठाई....एवढं काय खास आहे या मिठाईत ??

राव, रक्षाबंधनला आता काही दिवसंच उरलेत. त्यानिमित्ताने राख्या आणि मिठाईने बाजार फुलले आहेत. अशात लोकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या जात आहेत. गुजरातच्या एका मिठाईच्या दुकानात अशीच एक भन्नाट आयडिया वापरून एक खास मिठाई बनवण्यात आली आहे. राव, या मिठाईची किंमत बघून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही.
या मिठाईत एवढं काय खास आहे भौ ?
आधी किंमत सांगतो. या मिठाईची किंमत आहे प्रती किलो तब्बल ९००० रुपये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल – ही मिठाई आहे की सोनं. तर मंडळी, या मिठाई मध्ये खरंच सोनं आहे. २४ कॅरेट अस्सल सोन्याचा वापर करून या मिठाईला तयार करण्यात आलंय. अर्थात सोन्याची मिठाई असल्याने ती तेवढीच महाग सुद्धा आहे.
गुजरातच्या सुरत भागात “२४ कॅरेट मिठाई मॅजिक” नावाच्या दुकानात ही मिठाई मिळते. तसं पाहायला गेलं तर पेढे किंवा तत्सम गोड पदार्थांवर चांदीचा वर्ख लावण्याची पद्धत आहे. पण या गोल्डन मिठाईवर चक्क सोन्याचा वर्ख लावण्यात आलाय. दुकानदाराचा तर असाही दावा आहे की सोनं हे शरीरासाठी आरोग्यदायी असतं. याचा विचार करूनच या रक्षाबंधनला खास मिठाई तयार केली गेली आहे.
सुखा मेवा आणि वरती सोन्याचा वर्ख वापरून बनवलेली ही मिठाई गुजरात बरोबर देशभर प्रसिद्ध झाली आहे. दुकानात सोन्याची मिठाई बघण्यासाठी गर्दी होत आहे. फक्त बघेच नाहीत तर विकत घेणारेही कमी नाहीत बरं.
मंडळी, भारतात महागडी मिठाई हे नवीन प्रकरण असलं तरी जगभर अशा महागड्या पदार्थांची कमी नाही. ‘जगातील १० सर्वात महागडी आईस्क्रीम्स’ या लेखात आम्ही १० महागड्या आईस्क्रीम्स बद्दल माहिती दिली होती. या यादीत अशा काही आईस्क्रीम्स आहेत ज्यांना बनवताना २४ कॅरेट सोन्याचा वापर केला आहे. चला तर मंडळी या निमित्ताने हा लेखही बघून घ्या !!
आणखी वाचा :
२४ कॅरेट सोनं म्हणजे काय ? KDM चे दागिने म्हणजे काय ? राव, तुम्हाला सोन्याबद्दल किती माहित आहे ?
हॉलमार्क म्हणजे नक्की काय ? सोन्याचा कस नक्की कसा पाहतात ?