computer

भारतीयांची मान अभिमानाने उंचावी अशा इस्त्रोच्या सात मोठ्या कामगिर्‍या

Indian Space Research Organization (इस्त्रो) ही भारताची अधिकृत अवकाशसंशोधन संस्था आहे.  १५ ऑगस्ट १९६९साली स्थापना झालेल्या या संस्थेचं मुख्य कार्यालय बंगळुरू येथे तर प्राथमिक अवकाशबंदर हे आंध्रातल्या श्रीहरीकोटा इथे आहे. डॉ. विक्रम साराभाईंना भारतीय अवकाश संशोधनाचे जनक मानले जाते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या संस्थेने आजवर खूप मोठ्या कामगिर्‍या केल्या आहेत. काल  एप्रिल २८,२०१६ रोजी झालेल्या ’नाविक’च्या पार्श्वभूमीवर आपण इस्त्रोच्या मुख्य यशस्वी कामगिर्‍यांचा मागोवा घेऊयात. 

१. इन्सॅट (Indian National Satellite System)

१९८३च्या ऑगस्टमध्ये इन्सॅट-१B च्या प्रक्षेपणासोबत ’भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली’ ( Indian National Satellite System)या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. दूरचित्रवाणी(टीव्ही) आणि रेडिओ या दोन्ही प्रणालींच्या प्रक्षेपणापणात इन्सॅटमुळे आमूलाग्र घडून आला आणि दोन्ही सेवा दूरदूरच्या खेड्यात जाऊन पोचल्या. या कार्यक्रमांतर्गतचे काही इन्सॅटस हवामानखात्याच्या संशोधनासाठीसुद्धा वापरले जातात. कल्पना-१ हा खास हवामानखात्याकडून वापरला जाणारा उपग्रह आहे. 

इन्सॅट अंतर्गत येणार्‍या उपग्रहांची देखभाल आणि  नियंत्रण कर्नाटकातील हासन आणि मध्यप्रदेशातील भोपाळ येथून केले जाते.

2. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान - पी. एस. एल. व्ही.

भारताने आपले सुदूर संवेदी उपग्रह सूर्याच्या कक्षेत सोडण्यासाठी ही प्रणाली विकसित केली. पीएसेलव्हीच्या मदतीने छोट्या आकाराचे उपग्रह भूस्थिर कक्षेतदेखील सोडता येतात. आजवर पीएसएलव्हीने सत्तरहून अधिक भारतीय व अभारतीय उपग्रह अवकाशात सोडले आहेत आणि एकट्या गेल्यावर्षीचा आकडाच १७ उपग्रहांचा आहे.

चंद्रयान, मंगळयान आणि अवकाशातील वेधशाळा - ऍस्ट्रोसॅट आणि नाविक या उपग्रहांचे प्रक्षेपण पीएसेलव्हीच्या मदतीने करण्यात आलं आहे. पीएसेलव्हीने आपला पहिला उपग्रह सप्टेंबर २०,१९९३ साली अवकाशात सोडला.

3. चंद्रयान

चंद्रयान हे भारताने चंद्रावर पाठवलेलं पहिलंवहिलं आणि मानवरहित अंतरिक्ष यान. तत्कालिक पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी २००३ मध्ये या कार्यक्रमाची घोषणा केली.  २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरीकोटा येथून हे चंद्रयान अवकाशात सोडण्यात आले आणि पुढे ऑगस्ट २००९पर्यंत ते कार्यरत राहिले. चंद्रयानामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक आणि चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग आहेत. त्यापैकी चंद्रावर आदळणारा भाग -’ मून इम्पॅक्ट प्रोब’  हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील 'शॅकलटन क्रेटर' येथे आदळला.  गंमत म्हणजे या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारला आहे. त्यामुळे तो चंद्रावर आदळल्यानंतर प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व अशाप्रकारे  चंद्रावर झेंडा फडकावणारा भारत जगातला चौथा देश ठरला आहे. 

४. मंगळयान

मंगळयान ही भारताची पहिलीच मंगळ मोहीम आहे. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोचण्यात यशस्वी होणारा भारत हा जगातला पहिला देश आहे. भारताच्या आधी रशिया, अमेरिका आणि युरोपियन स्पेस एजन्सी हे मंगळावर पोचले होते. भारत हा मंगळावर पोचणारा जगातील चौथी संस्था तर आशिया खंडातला प्रथम देश आहे. मंगलयान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून मंगळाच्या दिशेने ५ नोव्हेंबर, २०१३ रोजी प्रक्षेपित केले गेले. २५ दिवस हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिर होते  आणि २४ सप्टेंबर,  २०१४ या दिवशी ते यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावले. 

 

५. भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान (जी. एस. एल. व्ही)

भूस्थिर म्हणजे काय सांगायचं तर, आपण पृथ्वीच्या संदर्भाने बोलूयात.

पृथ्वीच्या कक्षेत फिरणारा एखादा उपग्रह जर पृथ्वीच्याच वेगाने फिरत असेल, तर तो एखाद्या पृथ्वीवरच्याच एखाद्या भूभागासोबतच प्रवास करत राहिल. आणि त्या विशिष्ट भूभागातील लोकांना तो त्यांच्यासोबतचा स्थिर  उपग्रह वाटेल. तो खरंतर फिरतोय याची त्यांना कल्पनाच येणार नाही. तर भारतभूमीसोबत असे भूस्थिर राहणारे उपग्रह सोडण्यासाठी लागणारे प्रक्षेपण यान म्हणजेच जी. एस. एल. व्ही. याचा दुसरा टप्पा चा भारताने ऑक्टोबर  १८,२०१४ रोजी प्रक्षेपित केला. हे तंत्रज्ञान भारताशिवाय अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान आणि रशिया या देशांकडे आहे.

६. नाविक - Indian Regional Navigation Satellite System

अमेरिकेच्या जीपीएस प्रणालीच्या तोडीस तोड अशी नेव्हिगेशन प्रणाली भारताने नाविक या उपग्रह मालिकेद्वारे साध्य केली आहेत. नाविक मालिकेमध्ये सात उपग्रह होते, त्यातला सातवा आणि शेवटचा उपग्रह एप्रिल २८,२०१६ रोजी अवकाशात सोडण्यात आला. कारगिल युद्धाच्या वेळेस अमेरिकेने भारताला जीपीएसची मदत करणं नाकारलं होतं, त्या पार्श्वभूमीवर नाविक फक्त नागरिकांनाच नाहीतर युध्दकाळात संरक्षणखात्यालाही चांगलाच उपयोगी पडेल.

या   नेव्हिगेशन तंत्रज्ञान अवगत असलेल्या मोजक्या देशांच्या पंक्तीत आता भारताचं नांवही आदराने घेतले जाईल.  

७. एकाच रॉकेटमधून तब्बल १०४ उपग्रह अवकाशात सोडले

१५ फेब्रुवारी २०१७ला इस्त्रोनं अभूतपूर्व कामगिरी फत्ते केली. एक नाही, दोन नाही, चक्क १०४ उपग्रह एकाचवेळी एकाच रॉकेटमधून अवकाशात सोडले. 

ही कामगिरी हा एक जागतिक विक्रम आहे. या आधी रशियानं एकावेळी सर्वाधिक ३७ उपग्रह सोडले होते, तर अमेरिकेच्या नासाने २०. इस्त्रोच्या धृवीय उपग्रहाची (PSLV) ही ३९वी अंतराळवारी होती. विशेष म्हणजे या १०४ पैकी १०१ उपग्रह हे अन्य देशांचे होते, जे व्यावसायिक तत्वावर इस्त्रोने लॉन्च केले.

या मोहिमेतही बहुचर्चित चांद्रयान आणि मंगळ मोहीमेत वापरण्यात आलेलं शक्तीशाली रॉकेट वापरण्यात आलं होतं . 

 

भारतीयांची मान अभिमानाने उंचावी अशा इस्त्रोच्या सहा मोठ्या कामगिर्‍या

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा : पाहा कसे सोडले २० उपग्रह आकाशात

इस्रो ने भारताच्या पहिल्या रियुजेबल स्पेस शटलची केली यशस्वी चाचणी

सबस्क्राईब करा

* indicates required