इंग्लंडमध्ये इतिहास रचायचा असेल तर भारतीय संघाला या ५ गोष्टींवर द्यावा लागेल अधिक भर...

सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेत रोहित शर्मा(Rohit Sharma), विराट कोहली(Virat Kohli) आणि केएल राहुल (Kl Rahul) या तिन्ही खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाहीये. पहिल्या दोन्ही सामन्यात डेविड मिलर (David miller) आणि दक्षिण आफ्रिकन संघाने भारतीय गोलंदाजांचा घाम काढला. आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवल्यानंतर मालिकेची स्थिती २-१ अशी आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत दोन हात करायचे आहेत. या मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडूंनी इंग्लंडला रवाना व्हायला सुरुवात केली आहे. या मालिकेतील एकमेव कसोटी सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात भारतीय संघाला कुठल्या ५ गोष्टींवर अधिक लक्ष द्यावं लागणार आहे, याचा आढावा आपण या लेखातून घेणार आहोत. (india vs England test series)

१) केएल राहुल मालिकेतून बाहेर झाला तर सलामीला कोण येणार?

केएल राहुल दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी २० मालिकेतून बाहेर झाला आहे. तो इंग्लंडमध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतो. स्विंग होणाऱ्या चेंडूंवर तो चांगली फलंदाजी करू शकतो. मात्र तो इंग्लंडला जाणार का? याबाबत बीसीसीआयने कुठलीही अधिकृत माहिती जाहीर केली नाहीये. केएल राहुलच्या अनुपस्थितीत शुभमन गिल हा योग्य पर्याय असू शकतो. तर मयांक अगरवालला देखील या संघात संधी दिली जाऊ शकते.

२) रोहित, विराट आणि पंतची निराशाजनक कामगिरी..

रोहित शर्मा, विराट कोहली आणि रिषभ पंत हे भारतीय संघातील महत्वाचे फलंदाज आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या फलंदाजांना साजेशी कामगिरी करता आलेली नाहीये. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघासाठी हवी तशी कामगिरी करू शकला नाही. तर विराट कोहलीला २०१९ पासून एकही शतक झळकवता आलं नाहीये. भारतीय संघाला जर इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका जिंकायची असेल तर, या तीनही फलंदाजांनी मैदानावर टीच्चून फलंदाजी करणं गरजेचं आहे.

३) इंग्लंड विरुद्ध कशी असेल गोलंदाजांची रणनिती?

इंग्लिश फलंदाज इंग्लंडच्या खेळपट्टीवर किती आक्रमक फलंदाजी करतात, हे संपूर्ण क्रिकेट विश्वाला चांगलच माहीत आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना योग्य रणनिती आखून मैदानात उतरावं लागणार आहे. नुकताच न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने शेवटच्या दिवशी अवघ्या ५० षटकात ३०० धावांचे आव्हान गाठले होते. तसेच भारतीय गोलंदाजी आक्रमण किती मजबूत आहे हे आपण गतवर्षी इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेत पाहिले होते. मात्र आता भारतीय खेळाडू वनडे आणि टी -२० क्रिकेट खेळून परतले आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना लाल चेंडूने गोलंदाजी करण्यावर अधिक भर द्यावा लागणार आहे. मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह सारखे वेगवान गोलंदाज भारतीय संघासाठी प्रमुख भूमिका बजावू शकतात.

) संघात जडेजा की अश्विन कोणाला मिळेल स्थान?

फिरकी गोलंदाज म्हणून आर अश्विन की रवींद्र जडेजा, कोणाला स्थान द्यायचे हा प्रश्न संघ व्यवस्थापकांसाठी नक्कीच डोकेदुखी ठरू शकतो. कारण दोघेही उत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र सध्याची कामगिरी पाहता रवींद्र जडेजा आयपीएल २०२२ स्पर्धेत पूर्णपणे फ्लॉप ठरला. तर आर अश्विनने गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे जर दोघांपैकी एकाला संधी द्यायची असेल तर अश्विन हे स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. तर रवींद्र जडेजाला मर्यादित षटकांसाठी संघात स्थान दिले जाऊ शकते.

५) सिराज की प्रसिद्ध कृष्णा?

भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये भारतीय संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र आयपीएल २०२२ स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीमध्ये ती धार पाहायला मिळाली नाही. त्याला केवळ ९ गडी बाद करता आले. तर प्रसिद्ध कृष्णाने १९ गडी बाद केले. त्यामुळे या दोन्ही गोलंदाजांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते. मात्र अनुभव पाहता मोहम्मद सिराजला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते.

असा आहे भारतीय संघ..

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), केएस भारत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी , जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा.

एकमेव कसोटी सामना १ ते ५ जुलै दरम्यान एजबस्टनच्या मैदानावर पार पडणार आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required