computer

हरप्रितसिंग ब्रार: विराट कोहली आणि एबी डिव्हीलीयर्सची दांडी उडवणारा पंजाब क्रिकेटचा नवीन चेहरा !!

आयपीएलमध्ये सध्या अनेक नवोदित खेळाडू धुमाकूळ घालत आहेत. या खेळाडूंपैकी अनेक जण पुढे जाऊन भारतीय संघाचे नेतृत्व करतील. पंजाब क्रिकेट म्हटले म्हणजे सर्वात पुढे हरभजन सिंगचा चेहरा समोर येतो, पण आता पंजाबच्या एका नवोदित खेळाडूने रात्रीत हवा केली आहे. 

हरप्रितसिंग ब्रार असे त्याचे नाव आहे. हरभजन प्रमाणेच तो बॉलर असला तरी बॅटिंगच्या जोरावर ऐनवेळी सामना उलटावण्याची ताकद त्याच्यात आहे. पंजाब किंग्जकडून खेळत असलेल्या हरप्रितने गेल्या सामन्यात RCB विरुद्ध खेळताना विराट कोहली, एबी डिव्हीलीयर्स आणि ग्लेन मॅक्सवेल अशा तिन्ही महारथींना पॅवेलीयनमध्ये पाठवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. बॅटिंग करताना देखील त्याने १७ बॉल्सवर २४ धावा करत आपण दोन्ही गोष्टी करू शकतो हे दाखवून दिले.

हरप्रितचा क्रिकेटपटू होण्याचा प्रवास अनेक चढउतारांनी भरलेला आहे. तो लहान असताना त्याने एक क्रिकेट अकॅडमीचे बॅनर बघितले आणि क्लास लावण्याचा हट्ट धरला. अशा पद्धतीने त्याची सुरुवात झाली. पुढे जाऊन तो जिल्हा स्तरावर खेळू लागला. 

इथे त्याचे नाव चांगलेच गाजू लागले होते. पण अनेक वर्ष त्याची निवड राज्यस्तरीय स्पर्धेत देखील होऊ शकली नाही.  मग  त्याला एक गुरू भेटला. त्याने मोहालीत जाऊन सराव करण्याचा सल्ला दिला. मोहालीला जाऊन घाम गाळल्याचे फळ त्याला मिळाले. त्याची निवड पंजाबच्या अंडर २३ संघात झाली. 

हरप्रितचे लक्ष आयपीएल होते. त्यासाठी तो प्रयत्न करत होता. पण त्याला सातत्याने अपयश येत होते. तब्बल चार वेळा आयपीएलच्या ट्रायलमधून त्याला परत फिरावे लागले. शेवटी तो कंटाळून कॅनडाला निघून जायची तयारी करू लागला. पण योगायोगाने त्याला पंजाब संघात स्थान मिळाले.

२०१९ आणि २०२० असे दोन वर्ष तो पंजाब कडून विशेष कामगिरी करू शकत नव्हता. सातत्याने अपयश येत होते. पण यावर्षी त्याने सगळी कसर भरून काढत मॅन ऑफ द मॅच पटकावला आहे. एवढी वर्षे संयम ठेवल्यावर आज त्याला यश दिसू लागले आहे. पुढील सामन्यात त्याने अजून चांगली कामगिरी केली तर कदाचित भारतीय संघात खेळण्याचे त्याचे स्वप्न देखील पूर्ण होऊ शकते.

सबस्क्राईब करा

* indicates required